स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्यात 75 ग्राहक मार्गदर्शन केंद्र स्थापन करण्याचा संकल्प - डॉ. विजय लाड -NNL

ग्राहकहित जपणाराच नवीन ग्राहक कायदा श्रीमती देशमुख - ग्राहक मार्गदर्शिकेचे प्रकाशन


नांदेड|
देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असल्याच्या पार्श्वभूमीवर, राज्यात या वर्षी किमान 75 ग्राहक मार्गदर्शन केंद्र स्थापन करण्याचा संकल्प ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे राज्याध्यक्ष डॉ.विजय लाड यांनी केला. 

पुढे बोलताना ते म्हणाले की, भारत विश्ववंदिता होण्यासाठी प्रत्येक ग्राहक सजग झाला पाहिजे, हे ध्येय समोर ठेऊन खारीचा वाटा म्हणून सध्या उपलब्ध असलेल्या संघटनेच्या 700 सदस्यांकडून येत्या 24 डिसेंबर, म्हणजे राष्ट्रीय ग्राहक दिनापर्यंत, प्रत्येकी किमान 5 शाळा, कॉलेजात जाऊन, विद्यार्थी ग्राहकांचे प्रबोधन करण्याचा हा उपक्रम राज्यभर राबवण्याचा मनोदय, त्यांनी नांदेड जिल्हा प्रशासनातर्फे नियोजन भवनात आयोजित केलेल्या जागतिक ग्राहक दिनाच्या कार्यक्रमात व्यक्त केला. यावेळी औरंगाबाद विभागाचे संघटक इंजि. बालाजी लांडगे यांनी "ऑनलाइन खरेदी करताना घ्यावयाची काळजी" या विषयावर सर्वसामान्यांना उपयुक्त असे समर्पक मनोगत व्यक्त केले. तसेच तक्रार करण्यासाठी भारत सरकार मिनिस्टर ऑफ कन्सुमर अफेअर्स, जागो ग्राहक जागो च्या 1800 11 4000 व 14404 या हेल्पलाईन चा उल्लेख केला.

नांदेड जिल्ह्याचे प्रबोधन प्रमुख प्रा. डॉ. दीपक कासराळीकर यांनी "फसव्या जाहिराती पासून ग्राहकांनी सावध राहिले पाहिजे" असे प्रतिपादन केले. जाहिरातीतील जग हे सुंदर असते पण वास्तव नसते. स्त्रिया आणि तरुण ग्राहक वर्ग हा त्यांचा बळी ठरतो. तक्रार करण्यासाठी अॅडवटाईझिंग स्टैंडर्ड कौन्सिल ऑफ इंडियाच्या हेल्पलाइन क्रमांकाचा 7710012345 त्यांनी उल्लेख केला. नांदेड जिल्ह्याचे अध्यक्ष अरुण बिडवई यांनी "सोने खरेदी करताना घ्यावयाची काळजी" या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले. अॅड. दीपाली डोणगावकर यांनी आपल्या मनोगतात "ग्राहक संरक्षण कायदा 2019 मधील ग्राहकांचे हक्क" प्रतिपादित केले.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून बोलताना श्रीमती कविता देशमुख म्हणाल्या की, "ग्राहक कायद्यात केलेल्या नविन तरतुदी ग्राहकहिताच्याच आहेत". या दरम्यान अॅड. शलाका ढमढेरे यांनी व अन्य उपस्थितांच्या प्रश्नांची उत्तरेही यावेळी त्यांनी दिली. यात ग्राहक आयोगात खोटी केस केल्यास त्यास दंड आकारला जातो. तर एकावर एक फ्री अशा दोन साड्या खरेदी केल्यास त्यातील कोणतीही एक साडी डॅमेज असेल तर ती साडी बदलून घेणे हा ग्राहकाचा अधिकार आहे. यानंतर वस्तुवरील एमआरपीबद्दल मार्गदर्शन। करताना वस्तुच्या किंमतीवर खाडाखोड करणे अथवा एमआरपीवर चिठी लावणे हे चुकीचे आहे. एमआरपी कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याची गरज आहे, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते "स्वामी विवेकानंद" व "ग्राहकतीर्थ व बिंदुमाधव जोशी" यांच्या प्रतिमांना माल्यार्पण व दीप प्रज्वलन करण्यात आले. तसेच उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमा दरम्यान जिल्हा पुरवठा कार्यालय व ग्राहक पंचायत महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने "ग्राहक मार्गदर्शिका-2022" चे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमास जिल्हा पुरवठा अधिकारी लतीफ पठाण, ग्राहक पंचायतचे औरंगाबाद विभाग संघटक, इंजि. बालाजी लांडगे, जिल्हाध्यक्ष अरविंद बिडवई, जिल्हा प्रबोधन प्रमुख प्रा. डॉ. दीपक कासराळीकर, अॅड. शलाका ढमढेरे, अॅड.दीपाली डोणगावकर, अॅड. विणा पोत्रेकर, प्रा.संध्या खरवडकर, पुष्पा संगारेड्डीकर, श्रीमती भागीरथी बच्चेवार, रंगनाथ उंबरकर, प्रशांत वैद्य, रमाकांत घोणसीकर, पुरूषोत्तम जकाते, गोपाळराव व्यवहारे, बाळासाहेब पानसे, इंजि. महेंद्र मठमवार, इंजि. गंगाधर साधू यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पेशकार फुलवळे यांनी केले तर आभार सहा.जिल्हा पुरवठा अधिकारी मिटकरी यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा पुरवठा निरीक्षक जायभाये, तांत्रिक सहाय्यक नवदीप जाधव यांच्यासह अनेक महसूल कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. जलपानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी