एमपीएससीने 2019 मध्ये निवड केलेल्या कर सहायक व लिपिक-टंकलेखकांच्या नियुक्त्या पंधरा दिवसात होणार - दत्तात्रय भरणे -NNL


मुंबई|
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन २०१९ मध्ये गट 'क' साठी घेण्यात आलेल्या कर सहाय्यक आणि लिपिक-टंकलेखक पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना पंधरा दिवसात नियुक्ती देण्यात येईल, अशी माहिती  सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत दिली.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट 'क' मध्ये सन २०१९ मध्ये कर सहायक,लिपिक टंकलेखक व दुय्यम निरीक्षक या तीन पदांसाठी पदभरती प्रक्रिया वेगवेगळ्या कारणांमुळे प्रलंबित आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणा-या पदभरती विहित वेळेत केल्या जाव्यात तसेच या प्रक्रिया एका ठराविक कालबध्द वेळेत करण्यासंदर्भात विधानसभा सदस्य डॉ.विनय कोरे यांनी प्रश्न उपस्थित केला. या चर्चेत सदस्य सर्वश्री चंद्रकांत पाटील, प्रकाश आबिटकर, नाना पटोले, योगेश सागर यांनी भाग घेतला.

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शासन निर्णय काढला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दि.९ सप्टेंबर २०२० रोजी अंतरिम आदेशान्वये एसईबीसी आरक्षणासह स्थगिती दिली होती. प्राप्त माहितीनुसार कर सहायकांची- १२६ आणि लिपीक टंकलेखकाच्या -१७९ पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना पंधरा दिवसात नियुक्ती देण्यात येण्याबाबत तसेच ३३ दुय्यम निरीक्षक मधील १७ जणांना नेमणूक आदेश दिले असून उर्वरित प्रक्रिया पूर्ण करून सर्वांच्या वेळेत नेमणूका करण्यात येतील. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गेल्या सहा महिन्यात साधारणत: तीनशे परीक्षांच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या आहेत, असेही सामान्य प्रशासन राज्यमंत्री श्री.भरणे यांनी सांगितले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी