कोविड-19 च्या नियमांचा पालन करून शांततेत जन्मोत्सव साजराकरा - भगवान कांबळे
हिमायतनगर| दि.१९ फेब्रुवारी रोजी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या आनंदाने साजरी केली जाणार आहे. यावर्षी कोविड-19 चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मोठया प्रमाणात एकत्र न येता छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरा करणे अपेक्षित आहे. त्या पार्श्वभूमीवर हिमायतनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान कांबळे यांच्या नेतृत्वाखाली दि.१८ रोजी शहरातून पोलीस स्टाफची पथसंचलन रैली काढण्यात आली.
शहरातील मुख्य रस्त्याने ३ अधिकारी, १५ कर्मचारी, आणि ११ होमगार्ड कर्मचाऱ्यांना घेऊन पथसंचलन करत शिवजन्मोत्सव सोहळा शांततेत साजरा करावा. कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव लक्षात घेता हा उत्सव साजरा करताना नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून राज्य शासनाने मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहे. त्यामुळे प्रभात फेरी, बाईक रॅली अथवा मिरवणुक काढण्यात येऊ नयेत. त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला/प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करुन त्याठिकाणी सोशल डिस्टन्सींगचे पालन करून छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करावी.
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या दिवशी आरोग्यविषयक उपक्रम शिबिरे, रक्तदान, आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेग्यु इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी. आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन करताना त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग तसेच स्वच्छतेचे नियम मास्क, सॅनिटायझर इक्यादी पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे. असे आवाहन पोलीस निरीक्षक भगवान कांबळे यांनी शहरात पथसंचलन कार्यक्रम झाल्यानंतर नांदेड न्यूज लाईव्हशी बोलतांना केले.