खा.शरदचंद्र पवार यांच्याकडे केली मागणी
नांदेड। नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला अ दर्जा प्राप्त करण्यासाठी राज्य सरकारने विविध सुविधा द्याव्यात तसेच शेती अवजारांसाठी एमटी लोन उपलब्ध करून द्यावा, शेतकर्यांना दिल्या जाणार्या पीक कर्जात वाढ करावी अशी मागणी नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांनी खा.शरदचंद्र पवार यांच्याकडे केली आहे.
महाराष्ट्रातील जिल्हा बँकांची माजी मंत्री खा.शरदचंद्र पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दि.21 फेब्रुवारी रोजी राज्य सहकारी बँक यांच्या पुढाकारातून सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष अनासकर, सहकारी खात्याचे आयुक्त कौडे, राज्य सहकारी बँकेचे सिईओ अजित देशमुख, नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष हरिहरराव भोसीकर, नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कदम व जिल्हा बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित केली होती.
या बैठकीत नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांनी विविध बाबींची मागणी केली. त्यामध्ये जिल्हा बँकेला अनिष्ठ तफावत 52.18 कोटी असू ते दूर करण्यासाठी वैद्यनाथच्या धरतीवर सरकारने पॅकेज द्यावे, सन 2018-19 पासून पीक कर्जावरील मिळणारे शासनाचे अनुदान जे की 19 कोटी आहे ते त्वरीत द्यावे, राज्य सहकारी बँकेने व शासनाने नांदेड जिल्हा बँकेला अ दर्जामध्ये आणण्यासाठी विविध सुविधा द्याव्यात, त्यामध्ये विद्युत बिल भरण्याची परवानगी, राज्य कर्मचार्यांचा पगार जिल्हा बँकेतून करावा, राज्य सहकारी बँकेतून चालणारे सर्व व्यवहार जिल्हा बँकेच्या माध्यमातून करण्याची सुविधा द्यावी तसेच ईतर व्यवहार करण्यासाठी परवानगी द्यावी.
शेतकर्यांना दिले जाणार्या पीक कर्जाची रक्कम वाढवावी, बिगर शेती एनपीए ची अट शिथिल करावी, एमटी लोन उपलब्ध करून द्यावे, शेतीचे अवजारे त्यामध्ये ट्रॅक्टर, इलेक्ट्रॉनिक्स मोटार व इतर साहित्य खरेदीसाठी परवानगी द्यावी. यासह विविध स्वरूपाच्या मागण्या खा.शरद पवार यांच्याकडे व राज्य शासनाकडे उपाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांनी केली आहे. या विविध मागण्यांना बैठकीला उपस्थित असलेल्या राज्यभरातील अध्यक्ष, उपाध्यक्ष, एमडी यांनी एकारात्मक भूमिका घेवून या बाबी जिल्हा बँकेसाठी आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.