हिमायतनगर, अनिल मादसवार| तालुक्यात चोरटयांनी गेल्या तीन दिवसापासून लगातार चोरीच्या प्रकाराला सुरुवात केली आहे. याचा प्रत्यय पुन्हा आज तिसऱ्या दिवशी म्हणजे दि.०१ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीला हिमायतनगर - भोकर राष्ट्रीय महामार्गावरील पोटा बु.येथील सीएसपी केंद्र फोडून ५० हजारच्या रक्कमेसह इतर साहित्य लंपास केले आहे. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागात चोरट्याना पकडण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे आहे.
हिमायतनगर तालुक्याचे ठिकाण असून, येथील पोलीस ठाण्याचे अंतर्गत ४८ ग्रामपंचायती आहेत. पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील अनेक महिन्यापासून चॊरीचे सत्र हिमायतनगर शहरासह ग्रामीण भागात सुरु आहे. या चोरट्यांचा बंदोबस्त करण्यात हिमायतनगर पोलिसांना आत्तापर्यंत म्हणावे तसे यश आले नसले तरी हिमायतनगर आणि पारवा भागातील सोयाबीन चोरट्याना पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यानंतर काही दिवस चोरीच्या घटना थांबल्या मात्र पुन्हा थंडीच्या कडाक्याचा फायदा घेत चोरट्यानी शहरासह ग्रामीण भागात धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे.
दि.३० च्या रात्रीला सवना ज., जिरोना, महादापूर येथे ७ ठिकाणी चोरी करून सोन्या, चांदीचे दागीने व नगदी रक्कम चोरून नेली. त्यांनतर दि.३१ च्या रात्री चोरट्यानी हिमायतनगरात शहरातल्या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या खैरगावचे माजी सरपंच राजेश जाधव यांच्या घरात शिरकाव करून एलईडी टीव्हीसह इतर समान चोरून नेले. या घटनांचा तपास सुरु असताना पुन्हा दि.०१ च्या मध्यरात्रीच्या अज्ञात चोरटयांनी हिमायतनगर - भोकर राष्ट्रीय महामार्गावरील असलेल्या मौजे पोटा बु.येथील पंचायत समिती समभापतीचे सुपुत्र राहुल बापूराव आडे यांचे नावाने असलेल्या टीनशेडमधील सीएसपी केंद्र फोडून ५० हजारची नगदी रक्कम आणि २ कंप्युटर किंमत ६० हजार, १ लैपटॉप किंमत ४० हजार, १ कलर प्रिंटर १२ हजार, १ छोटी झेरॉक्स मशीन १० हजार, १ लैमिनेशन मशीन ८ हजार असा एकूण १ लक्ष ८० हजारांचे साहित्य लंपास केले आहे.
सीएसपी केंद्रचालक राहुल आडे हे दि.०१ च्या सायंकाळी ७ वाजता नेहमीप्रमाणे आपले दुकान बंद करून गावाकडे गेले होते. त्यानंतर रात्रीतून अज्ञात चोरट्यानी त्यांचे टीनशेडचे दुकानाचे पाठीमागून तीन वाकवून चोरट्यानी आत शिरून चोरी केली आहे. अशी माहिती बाबापुराव आडे यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली असून, याबाबत हिमायतनगर पोलिसात तक्रार देणार असून, या चोरीचा तपास लावून चोरट्यांचा बंदोबस्त करावा आणि इतर कुठेही चोरीच्या घटना होणार नाहीत यासाठी रात्रगस्त वाढवावी अशी मागणी करणार असल्याचे सांगितले.