वाढोणा येथील ऐतिहासिक मंदिरातील श्री परमेश्वर मूर्ती -NNL


हिमायतनगर (वाढोणा) आणि परिसरात प्राचीन कालखंडात मोठ्या प्रमाणात मंदिरे बांधण्यात आली होती. परंतु आज त्यापैकी बरीच मंदिरे उध्वस्त झालेली आढळतात. अशा मंदिर स्थापत्याचे अवशेष मात्र या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतात. मंदिर स्थापत्याच्या भग्नावशेषावरुन आपणास प्राचीन मंदिर स्थापत्याची माहिती घेता येते. तसेच आज कांही प्राचीन मंदिरे चांगल्या स्थितीतही आढळतात; परंतु आज या परिसरातील मंदिरांचा आधुनिक पध्दतीने जिर्णोध्दार केल्यामुळे त्यांचे ऐतिहासिकत्व दिसून येत नाही. परंतु अशा मंदिराच्या जोत्यावरुन त्यांचे ऐतिहासिकत्व स्पष्ट होते. ऐतिहासिक मंदिरात हिमायतनगर (वाढोणा) येथील परमेश्वर मंदिर, शिवपती मंदिर, कालिका मंदिर, बालाजी मंदिर, लकडोबा मंदिर, विठ्ठल मंदिर, राम मंदिर व इतर मंदिराचा समावेशहोतो. हिमायतनगर (वाढोणा) व परिसरातील मंदिरे प्रामुख्याने कल्याणीचे चालुक्य आणि देवगीरीच्या काळातील आहेत.

मंदिर स्थापत्याचा प्रारंभ - भारतात सर्वप्रथम गुहा मंदिरे तयार करण्यात आली. यानंतर रचनात्मक मंदिराची निर्मिती झाली. रचनात्मक मंदिरांनाच वास्तु मंदिरे असेही म्हटले जाते. अशा मंदिरांच्या बांधकामासाठी दगड, माती, चूना आणि विटांचा उपयोग करण्यात आला. मंदिर स्थापत्याची परंपरा प्राचीन आहे. ऋग्वेदात यक्ष वास्तुचा उल्लेख आढळतो. म्हणजेच त्या काळात यक्षाला देवता मानले जात होते. तसेच या देवतेसाठी विशिष्ट प्रकारची वास्तू बांधण्यात येत असे. भारतात मौर्यकाळातील मंदिर स्थापत्याचे अवशेष मध्यप्रदेशातील सांची येथील उत्खननात मिळाले आहेत. यावरुन मंदिर स्थापत्याची प्राचीनता लक्षात येते. सातवाहन सम्राट हाल याने रचलेल्या गाथा सप्तशक्तीत सात वाहनकालीन मंदिराचे उल्लेख आढळतात. पण आजपर्यंत या काळातील मंदिर स्थापत्याचे अवशेष मिळालेले नाहीत. मंदिर बांधकामाची ही परंपरा पुढेही चालु राहीली. गुप्त कालखंडात मंदिर स्थापत्याचा विकास मोठ्या प्रमाणात झाला आणि विविध मंदिरे उभारण्यात आली. भारतात प्रामुख्याने शिव आणि विष्णू मंदिरे बांधण्यात आली. गर्भगृह, अंतराळ, मंडव व मुखमंडप आणि क्वचित प्रसंगी मंडपाला जोडून दोन अर्धमंडप असत. तसेच मंदिराला एक, दोन, तीन आणि क्वचित प्रसंगी चार गर्भगृह, स्तंभावर, छतावर व प्रवेशद्वारावर कोरीव नक्षीकाम आणि मूर्ती शिल्प आढळते. 

हिमायतनगर (वाढोणा) येथील मंदिरे - परमेश्वर मंदिरशिव आणि विष्णू मंदिराप्रमाणेच भारतात प्राचीन कालखंडात परमेश्वर देवतेचेही मंदिरे बांधण्यात आली. परंतु भारतात परमेश्वर मंदिरे अगदी अल्प प्रमाणात आढळतात. नांदेड जिल्ह्यातजी परमेश्वर मंदिरे आहेत, त्या परमेश्वर मंदिरात ब्रह्मदेवाच्या मूर्ती आहेत. परंतु हिमायतनगर (वाढोणा) येथील परमेश्वर मंदिरात ब्रह्मदेवाची मूर्ती नाही हे विशेष आहे. म्हणून नांदेड जिल्ह्यातील इतिहास संशोधकाचा असा समज होता की, हिमायतनगर (वाढोणा) येथील परमेश्वर मंदिर म्हणजेच ब्रह्मदेवाचे मंदिर आहे. परंतु या ठिकाणचे परमेश्वर हे परम + ईश्वर म्हणजेच परमेश्वर, देवाधीदेव आहेत.

नांदेड जिल्ह्यात आणि परिसरात वाकाटक, राष्ट्रकूट, कल्याणीचे चालुक्य, वरंगळचे काकतिय व देवगिरीचे यादव या राजघराण्याच्या कालखंडात मोठ्या प्रमाणात मंदिरे बांधण्यात आली. हिमायतनगर (वाढोणा) येथे देखील अनेक मंदिरे बांधण्यात आली. या मंदिरांच्या मूळ गर्भगृहावर आणि मंडपावर नव्याने आधुनिक पध्दतीने बांधकाम करण्यात आलेले आहे. त्यामुळे येथील मंदिरे आज आपल्याला बाहेरुनप्राचीन मंदिर स्थापत्याचा एक उत्कृष्ट नमुना दिसतात. या परिसरातील देवगिरीच्या यादव घराण्याने इ.स. 1187 पासून ते इ.स. 1318 पर्यंत राज्य केले.

या काळात शिव आणि विष्णू या देवतेची पुजा आणि उपासना प्रचलित होती. येथील परमेश्वर मंदिराच्या बांधकाम पध्दतीवरुन हे मंदिर यादव काळात बांधण्यात आलेले असावे. कारण याच काळात उमरखेड येथील श्री तात्याजी पौळकर यांनी परमेश्वर देवतेची विधीवत प्रतिष्ठापना करुन सन 1309 मध्ये हे मंदिर बांधल्याचा उल्लेख सापडतो. हा कालखंड यादवांचाच आहे. या नगरचे अराध्य देवत आणि शक्तीस्थान असलेले परमेश्वर मंदिर हे या नगराच्या पश्चिमेस अगदी गावालगत असून पश्चिमेकडुन येणाज्या भाविकांना या नगरात प्रवेश करण्यापूर्वीच दृष्टिस पडते. या परमेश्वर मंदिराजवळ मंदिराच्याच आवारात बसस्थानक असल्यामुळे या नगरात आगमन होताच आपण मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ उतरतो आणि परमेश्वर मंदिर दृष्टिस पडते येथील परमेश्वर मंदिराचा आवार खुप मोठा असून या मंदिरास दोन मुख्य प्रवेशद्वार आहेत. परंतु मंदिराचे मुळ आणि मुख्य प्रवेशद्वार हे उत्तराभिमुख असून नविन आधुनिक पध्दतीने निर्माण केलेले प्रवेशद्वार पूर्वाभिमुख असून भव्य कमान वैशिष्ट्यपूर्ण दिसते. मुख्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यास मंदिर प्रांगणात एक भव्य बारव दृष्टिस पडते. ही बारव एक प्रवेशद्वार असलेली होती. परंतू आज प्रवेशद्वार बंद केलेले आहे. परमेश्वर मंदिर हे हेमाडपंथी असून उत्तराभिमुख आहे. 


मंदिराची दक्षिण उत्तर लांबी 23 फूट आहे तर पूर्वपश्चिम रुंदी 24 फूट आहे. गर्भगृह आणि मंडप असा या मंदीराचा पदविन्यास असावा. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर गर्भगृहात जाण्यासाठी आपल्याला प्रथम प्रवेशद्वारातून 5 फूटअंतर चालुन पुढे गेल्यानंतर डावीकडे 12 फूट पुढे आत चालुन पुढे जावे लागते. यानंतर पुन्हा उजवीकडे 12 फूट अंतर चालुन पुढे जावे लागते. पुन्हा उजवीकडे 5 फूट अंतर चालुन समोर गेल्यास गर्भगृहात प्रवेश करता येतो. परंतु या गर्भगृहात प्रवेश करीत असतांना प्रथम दोन पायऱ्या दुसऱ्या वळणाला एक पायरी, तिसऱ्या  वळणाला चार पायऱ्या खाली 10 फूट खोल उतरत मंदिरातील गर्भगृहात प्रवेश करता येतो. तसेच या मंदिराचे गर्भगृह जमिनीपासून 10 फूट खोल असून देखील कुठल्याही कृत्रिम प्रकाशाची आवश्यकता पडत नाही. हे या परमेश्वर मंदिराच्या बांधकाम शैलीचे नांदेड जिल्ह्यातील इतर मंदिराच्या तुलनेत वेगळे वैशिष्ट्य आहे. मंदिराची अशी रचना दक्षिण भारतात फारशी दिसून येत नाही. 

हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथील नागनाथ मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करण्यासाठी खाली उतरावे लागते; परंतु गर्भगृहातील प्रवेशासाठी येथील परमेश्वर मंदिराप्रमाणे वेगवेगळी वळणे घेत खाली उतरावे लागत नाही. विदर्भात असलेल्या उमरखेड तालुक्यातील मुळावा या गावी जगदंबा देवीचे मंदिर आहे. हे मंदिर आणि परमेश्वर मंदिर यात साम्य असल्याचे आढळून येते. परमेश्वर मंदिराचे मुख्य बाहेरील प्रवेशद्वार उत्तराभिमुख असून 5 फूट उंचीचे व 3 फूट 1 इंच रुंदीचे आहे. प्रवेशद्वाराच्या दगडी द्वारपट्टीवर गणेशशिल्प आहे. आतील गर्भगृहाचे प्रवेशद्वार 5 फूट 9 इंच उंच आणि 2 फूट 7 इंच रुंद असून हे आतील प्रवेशद्वार पूर्वाभिमुख आहे. मंदिरातील गर्भगृह 10.5 10.5 चौरस फूट आकाराचे आहे. गर्भगृहाचे शिखर अर्धगोलाकार असून ते मोठमोठ्या दगडी शिळांनी बनविलेले आहे. गर्भगृहाच्या वर आधुनिक पध्दतीचे उंच शिखर बांधलेले असून शिखराच्या बाह्य भागावर अनेक देवकोष्ठ आहेत. या देवकोष्ठात विविध हिंदू देवी देवताचे मूर्तीशिल्प दिसून येतात. 


गर्भगृहाच्या मध्यभागी स्थानक (उभ्या) स्थितीत एक संघ पाषाणात घडविलेली भारतीय कलेचा उत्कृष्ट नमुना असलेली एक अद्वितीय मूर्ती आहे. अशी मूर्ती (वाढोणा) हिमायतनगर व्यतिरिक्त दक्षिण भारतात कोठेही आढळल्याचा उल्लेख सापडत नाही. ही मूर्ती परमेश्वर देवता म्हणून ओळखली जाते. परमेश्वर मंदिरात असलेली परमेश्वर मूर्ती मंदिराच्या मध्यभागी असून पूर्वाभिमुख मूर्तीची उंची 136 सें.मी. आणि रुंदी 59 सें.मी. आहे. ही परमेश्वर मूर्ती चतुर्भुज असुन उजव्या वरच्या हातात त्रिशुल आहे व या त्रिशुळावर लहान आकाराचा फडा काढलेला नाग (सर्प) आहे. तर उजव्या खालच्या हातात रुद्गाक्षाची जपमाळ आहे. आणि डाव्या वरच्या हातात मोठा तीन फड्याचा नाग (सर्प) आहे तर डाव्या खालच्या हातात बिजपुरक आहे.

मस्तकावर आकर्षक आणि कोरीव मुकुट असून,मुकूटाच्या मध्यभागी दोन सुर्य आणि त्याखाली एक सूर्य अंकित केलेले दिसतात आणि मुकूटाच्या वर शिरोभागी शिवलिंग शिवपिंड आहे. तसेच ओठावर मिशा आहेत. मस्तकाच्या पाठीमागे प्रभामंडळ आहे. या प्रभामंडळाच्या उजव्या आणि डाव्या बाजुस मगर मुख आहेत. दोन्ही कानात मोठ्या आकाराची कुंडले आहेत. गळ्यात नेकलेसच्या आकाराचा मोठा कंठाहार आहे. दोन्ही दंडात बाजुबंद आहेत. चारही हातात कंगन आहेत. आणि चारही हाताच्या पाचही बोटामध्ये अंगठ्या आहेत. अंगाखांद्यावर जानवे, कमरेला उदरबंद आणि मेखला आहे. दोन्ही पायात तोडे व पैंजन आहेत. परमेश्वर मूर्तिच्या दोन्ही बाजुस सेविका आहेत. त्या दोन्हीही सेविकांची उंची 29 सें.मी. तर रुंदी 15 सें.मी. अशी समान आहे. त्या दोन्ही सेविका अलंकृत आणि आकर्षक आहेत.मूर्तिच्या पायथ्यास उजव्या खालच्या बाजुस नंदी असून त्या नंदीची उंची 14 सें.मी.व लांबी 18 सें.मी. आहे. तर मूर्तिच्या पायथ्याच्या डाव्या बाजुस मोरावर रुढ असलेले द्विभूज स्कंद कार्तिकेय आहेत. त्यांची उंची 16 सें.मी. आहे तर रुंदी 07 सें.मी. आहे. हे परमेश्वर देवतेचे मूर्तिशिल्प अखंड पाषाणात निर्माण केले आहे. 

 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी