सामर्थ्यवान व समृद्ध भारताच्या उभारणीत काँग्रेसचे मोठे योगदान - एच. के. पाटील -NNL

काँग्रेस पक्ष देशात पुन्हा जोरदार कमबॅक करेल !: बाळासाहेब थोरात

शिर्डीत उत्तर महाराष्ट्र काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न.


शिर्डी|
स्वातंत्र्यप्राप्तीसह मागील सत्तर वर्षात काँग्रेस पक्षाने राबवलेल्या विविध योजनांमुळे देश समृद्ध झाला आहे. मात्र सात वर्षापूर्वी सत्तेवर आलेला भाजपा हा सातत्याने खोटे बोलून देशवासियांची दिशाभूल करत आहे. जाती-धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्यांपासून देशाला वाचवण्यासाठी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याने अधिक जोमाने काम करावे, असे आवाहन प्रभारी एच. के. पाटील यांनी केले.

शिर्डी-कोपरगाव रोडवरील साईसृष्टी लॉन्स येथे उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा व डिजिटल आढावा बैठक पार पडली. यावेळी व्यासपीठावर माजी केंद्रीय मंत्री पल्लम राजू, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व सहप्रभारी बी. एम. संदीप, विधिमंडळ पक्षाचे नेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, प्रदेश कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे, आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार लहू कानडे, आमदार हिरामण खोसकर, आमदार शिरीष दादा चौधरी, माजी मंत्री पद्माकर वळवी, डॉ. शोभाताई बच्छाव, मा. खा. उल्हास पाटील, शरद आहेर, हेमलता पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, नाशिकचे डॉ. तुषार शेवाळे, शरद आहेर, धुळे जिल्हाध्यक्ष शाम सनेर, जळगाव जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, संदीप भैय्यासाहेब पाटील, नंदुरबार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष कीर्ती वळवी, अनुराधाताई नागवडे, महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, प्रदेश उपाध्यक्ष भा.ई. नगराळे, राहुल साळवे, किरण काळे, मा. आ. अनिल आहेर, दुर्गाताई तांबे यांच्यासह अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्रभारी एच. के. पाटील म्हणाले की, काँग्रेसला मोठी परंपरा आहे. स्वातंत्र्यप्राप्तीसह स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेसच्या माध्यमातून देशाची मोठी प्रगती झाली आहे. मात्र मागील सात वर्षापूर्वी आलेले भाजपाचे सरकार सातत्याने खोटे बोलत आहे. पंतप्रधान हे खोटे बोलून देश व जनतेची दिशाभूल करत आहेत. कोणतेही काम न करता फक्त जाहिरातबाजी करणाऱ्या या लोकांनी पंधरा लाख रुपये, दोन कोटी नोकऱ्याची खोटी आश्वासने दिली. या उलट देशात तीन काळे कायदे लावून शेतकरी विरोधी निर्णय घेतला. भाजपापासून देशाला वाचवण्याकरता काँग्रेस हाच सक्षम पर्याय असून काँग्रेस हा गोरगरिबांच्या विकासाचा पक्ष आहे. डिजिटल नोंदणीच्या माध्यमातून तरुणांना यामध्ये मोठी संधी असून महाराष्ट्रातून एक कोटी डिजिटल सभासद करावे असे आवाहन त्यांनी केले. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी तीन काळया कायद्याविरोधात राबवलेली शेतकऱ्यांची एक कोटी स्वाक्षरी मोहीम अत्यंत यशस्वी झाली होती. थोरात हे राष्ट्र बांधणी करणारे लोकाभिमुख नेतृत्व असून देशपातळीवर त्यांची मोठी मागणी आहे. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटकसह संपूर्ण देशामध्ये ते लोकप्रिय असल्याचेही पाटील म्हणाले

माजी मंत्री पल्लम राजू म्हणाले की, काम कमी आणि जाहिरात ज्यादा असलेल्या भाजपा सरकारने देशवासीयांना वाऱ्यावर सोडले आहे. कोरोना संकटात केंद्र सरकार पूर्णपणे असफल ठरले असून भारतामध्ये मोठी आर्थिक मंदी आली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या विरुद्ध सूडबुद्धीने काम केले जात आहे. या सरकारला अस्थिर करण्याचा केंद्र सरकारचा डाव असून शेतकरी, कामगार, कष्टकरी या सर्वांच्या विरोधी असणारा केंद्र सरकारला खाली खेचण्यासाठी सर्वांनी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहत बाळासाहेब थोरात यांना मोठी ताकद द्यावी.

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, जाती धर्माच्या नावावर मते मागून सत्तेवर आलेले भाजपा सरकार हे राज्यात अस्थिरता निर्माण करू पाहत आहे. महाविकास आघाडी सरकारने सत्तेवर येताच शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. अनेक संकटामध्ये जनतेच्या पाठीशी उभे राहिले. सोनियाजी गांधी यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारने देशातील प्रत्येक नागरिकाला रोजगाराचा कायदा, अन्नसुरक्षा कायदा, आरोग्य कायदा, शिक्षणाचा कायदा हे महत्त्वाचे कायदे दिले. काँग्रेस हा एक विचार असून अनेक संकटातून हा पक्ष पुढे आला आहे. इंदिराजी गांधींच्या काळातही पक्षाला संघर्ष करावा लागला मात्र पुन्हा काँग्रेस पक्षाने भरारी घेतली. आगामी नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये पूर्ण ताकदीनिशी काँग्रेसचे सर्व उमेदवार विजयी करण्यासाठी काम करा. काँग्रेस पक्ष संघटन वाढवणे अत्यंत गरजेचे असून गोरगरीब माणूस ही खरी काँग्रेसची ताकद आहे त्याला सोबत घ्या. येणाऱ्या काळामध्ये सोनियाजी गांधी व खा. राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशात जोरदार  कमबॅक करेल.

आ. प्रणिती शिंदे म्हणाल्या की, डिजिटल नोंदणी अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक बुथवर काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याला मोठी संधी आहे. प्रियंका गांधी यांनी ‘लडकी हु’ लड सकती हु’ हे अभियान सुरू केले असून महिलांना काँग्रेस पक्षामध्ये मोठी संधी आहे. तर सचिव बी. एम. संदीप म्हणाले की, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात काँग्रेसचे काम चांगले सुरू आहे. काँग्रेसला अधिकाधिक तरुणांपर्यंत घेऊन जात डिजिटल अभियान जास्त प्रभावी होण्यासाठी सर्व तरुण कार्यकर्त्यांनी काम करावे.

यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार लहू कानडे, आमदार हिरामण खोसकर, आमदार शिरीषदादा चौधरी, माजी मंत्री पद्माकर वळवी, माजी मंत्री डॉ. शोभाताई बच्छाव, मा. खा उल्हासदादा पाटील, डिजिटल नोंदणी अभियानाचे समन्वयक भा.ई. नगराळे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनीही मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी उत्कर्षा रुपवते, डॉ. एकनाथ गोंदकर, करण ससाने, सचिन गुजर, प्रा ज्ञानेश्वर गायकवाड, हेमंत ओगले, काँग्रेस प्रदेशचे सचिव सचिन गुंजाळ आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी सूत्रसंचलन केले तर धुळे जिल्हाध्यक्ष शाम सनेर यांनी आभार मानले. यावेळी जिल्हानिहाय विविध पदाधिकाऱ्यांचा आढावाही घेण्यात आला.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी