हिमायतनगरचे तहसील कार्यालयाने नेमलेल्या महसूल पथकाचा नाकर्तेपणा उघड...!
हिमायतनगर, अनिल नाईक| विदर्भ - मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदी काठच्या काही रेती घाटावरून राजकीय वरदहस्त असलेल्या वाळू माफियांकडून शासनाचा महसूल बुडवत रेतीचा गोरखधंदा राजरोसपणे सुरु आहे. शासनाने नदीकाठावरील ७ रेती घाटाच्या लिलावाचे टेंडर काढले असताना देखील रेती चोर सक्रिय असल्याचे दिसते आहे.याकडे हिमायतनगर तहसिलने नेमलेले तिन्ही बैठे पथकाने दुर्लक्ष केल्याने रेतीचा गोरखधंदा सुरूच आहे. दि.१० च्या रात्रीला मिळालेल्या गुप्त माहिती वरून हदगाव उपविभागीय अधिकाऱ्याच्या पथकाने बोरगडी - हिमायतनगर रोडवर विनापरवाना रेतीची वाहतूक करताना ट्रैक्टर पकडून कार्यवाही केली आहे. यामुळे हिमायतनगर तहसीलच्या गौण खनिज विभागातील अधिकारी - कर्मचाऱ्याचा सुरु असलेला भोंगळ कारभार उघड झाला आहे. हि बाब लक्षात घेता कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी डॉ विपीन यांनी लक्ष देऊन हिमायतनगर तालुक्याला दिलेल्या महसूल उद्दिष्ठाच्या पूर्ततेसाठी शहर व ग्रामीण भागात ज्या ज्या ठिकाणी रेतीचे साठे आहेत, ते जप्त करून साठयासंबंधी पावत्यांची तपासणी करावी. जर खरेदी- विक्रीच्या पावत्या नसल्यास संबंधित शेतकरी, वाहनधारक व ज्यांच बांधकाम चालू आहे त्यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.
हिमायतनगर तालुका पैनगंगा नदीकाठावर आहे, या नदीकाठावर एकूण १२ शासकीय रेतीघाट तर रेती माफियांनी स्वतःच्या फायद्यासाठी निर्माण केलेले अनेक रेती घाट आहेत. शासनाच्या महसूल अधिकारी, तलाठी, मंडळ अधिकारी यांना हाताशी धरून महिनेवारी एका ट्रैक्टरला २० हजार हप्ता ठरवून रात्री - अपरात्रीला रेती, मुरुमाची चोरी केली जात आहे. खरे पाहता टेंडर भरून रॉयल्टी घेतल्यानंतर देखील गौण खनिज अधीनियमानुसार सकाळी सूर्योदय ते रात्री सूर्यास्तापूर्वी गौण खनिज काढण्याची परवानगी असते त्यामुळे रात्रीला उत्खनन करणे कायद्याने गुन्हा आहे. परंतु कोणतीही परवानगी नसताना या सर्व नियमांना बगल देऊन गौण खनिज काढून शासनाला चुना लावण्याचे काम हिमायतनगर तालुक्यातील गौण खनिज तस्कर करत आहेत. असा गैरप्रकार करणाऱ्या काही गौण खनिज तस्करांना राजकीय वरदहस्त असल्याने राजकीय नेत्यांच्या दबावाला बळी पडून तहसीलदार, नायब तहसीलदार, कार्यवाही करण्याचे सोडून त्यांना अभय देण्याचे काम करतात हे वास्तव सत्य आहे.
एखादे वाहनधारकाने हप्ता दिला नाहीतर त्याचेवर दंडात्मक कार्यवाही करून आम्ही इमाने इतबारे कर्तव्य पार पडतो असे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न हिमायतनगर तालुक्यातील सज्जावर कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्याकडून सुरु आहे. हिमायतनगर तहसील अखत्यारीत खाबुगिरी वृत्ती असलेल्या काही अधिकारी - कर्मचाऱ्यामुळे दगड, मुरूम, रेती सारख्या गौण खनिज विक्रीचा गोरखधंदा राजरोसपणे सुरु आहे. हिमायतनगर तालुक्यात सुरु असलेल्या गौण खनिज तस्करीच्या धंद्याला लगाम लावण्यासाठी हिमायतनगर शहरासह ग्रामीण भागात रस्त्यावरील ठिकठिकणांचे सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केल्यास हा गौण खनिजाचा धंदा करणारे वाहने कशी चालविली जातात हे समोर येणार आहे.
हिमायतनगर तालुक्यातील पैनगंगा नदीकाठावर कामारी, पिंपरी, दिघी, विरसनी, रेणापूर बे, घारापुर, धानोरा ज, डोल्हारी, बुदली बे, पळसपूर, शिरपल्ली, कोठा ज असे १२ रेती घाट आहेत. त्यापैकी ७ रेती घाटाच्या लिलावासाठी मंजुरी मिळली आहे. तर अन्य ५ रेती घाटाच्या लिलावालाही लवकरच मंजुरी मिळणार असल्याचे हिमायतनगर तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक सिद्धार्थ कुलदीपके यांनी दिली.
उपविभागीय अधिकारी पथकाच्या कार्यवाहीत संबंधित वाहनास सव्वा लाखाच्या दंडाची नोटीस
हिमायतनगर तालुक्याला ७ कोटीचे महसूल वसुलीचे टार्गेट
हिमायतनगर तहसील अंतर्गत येणारी सर्व सज्जानी मिळून यावर्षी ७ कोटीचा महसूल वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. अद्यापही हिमायतनगर तहसिलने ७ कोटींची वसुलीचे उद्दिष्ठ पूर्ण केलेले नाही. या वसुलीसाठी नियमानुसार मंडळ अधिकारी, तलाठी, व नायब तहसीलदार गौण खनिज तस्करावर कार्यवाही करत नसल्याने शासन व जनतेच्या डोळ्यात धूळफेक करून रेती, रुम व दगडा सारख्या गौण खनिजाची चोरी सर्रास होते आहे. त्यामुळे शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडत असून, वसुलीचे टार्गेट पूर्ण होत नसल्याची बाब समोर आली आहे. हे वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी तातडीने हिमायतनगर तालुक्यातील सर्वच रेती घाटाचे लिलाव करून महसूल वाढविणे गरजेचे आहे.
यावर्षी हिमायतनगर तालुक्यात अतिवृष्टीमुळे मोठ्याप्रमाणात रेती उपलब्ध झाली आहे. नदीपात्रात पाणी असल्याने रेती काढण्यासाठी येथील काही वाळू तस्करांनी नाविन्यपूर्ण शक्कल लढविली आहे. पाण्यातील रेती काढण्यासाठी आता बिहारी मजुरांची नेमणूक करण्यात आली असून, तराफ्याच्या माध्यमातून पाण्यातील रेती काढली जात आहे. यासाठी मजुरांना मोठ्या प्रमाणात मजुरी देऊन पाण्यातील रेती चोरीच्या मार्गाने काढून गरजूना ८ ते १० हजार रुपये ब्रास दराने विक्री केली जात आहे. विक्री केलेल्या रातीची पावती दिली जात नसल्याने बांधकामासाठी पैसे देऊन खरेदी केलेल्या रातीची पक्की पावती नसल्याने घरमालक व गुत्तेदार अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण जिल्ह्धिकारी डॉ विपीन यांनी नुकतेच सर्वानी रेतीच्या खरेदीची पावती आपल्याकडे ठेवणे बंधनकारक असल्याचे सांगितले आहे. जर खरेदी पावती नसल्याने कार्यवाहीचा सामना संबंधितांना करावा लागणार असल्याने शासनाला चुना लावून चोरीची रेती विकून मालामाल होण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या रेती दादांना चौकशी झाल्यास मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
रेती तस्करीसाठी उपयोगात येणारे अनेक वाहने विना नंबरची
हिमायतनगर तालुक्यात महसूलच्या झालेल्या कार्यवाहीत समोर आलेली अनेक रेती, दगड व मुरुमाची वाहने विना नंबरची असल्याचे आढळून आली आहेत. गौण खनिजाची चोरी करणारे एखादे वाहन दोन वेळा पकडले तर सदरचे वाहन जप्त होऊ शकते. त्यामुळे अनेक गौण खनिज तस्कर विना नंबरचे वाहनाचा उपयोग करत आहेत. हि बाब लक्षात घेता आरटीओ विभागाच्या अधिकाऱ्यांनी हिमायतनगर तालुक्यातील सर्व प्रकारच्या वाहनांची चौकशी करावी. आणि हिमायतनगर शहर व ग्रामीण भागात किती विना नंबरचे वाहने कार्यरत आहेत, आणि वाहतुकीचा कर बुडवत आहेत हे उघड होईल. त्यावेळी ती सर्व वाहने जप्त करून वाहनाची मुद्दत संपल्यास ती वाहन रस्त्यावर चालविण्यास संबंधितांना प्रतिबंध करावे जेणेकरून कोणत्याही अपघाताच्या घटना होणार नाहीत असेही मत अनेक जाणकार नागरिक व्यक्त करत आहेत.