गुरुद्वारा बोर्डाचे सहायक अधीक्षक
समाजात वावरणाऱ्या, निरनिराळ्या व्यक्तित्वांविषयी सर्वांच्याच मनात एक कुतूहल असतो. काही व्यक्तीं आपल्या स्वभावाने म्हणा किंवा त्यांच्यात असलेल्या कलागुणामुळे इतरांना सहजपणे आकर्षित करून घेतात. सर्वांच्या मनात घर करून जाणारा असाच एक दिलखुलास हूरहूनरी व्यक्तित्व मला शीख समाजात अनुभवास मिळाला. त्यांच्या 41 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेची नोंद घेण्यासाठी हा लघु लेख मुद्दामपणे लिहित आहे.
गुरुद्वारा सचखंड बोर्डात वरिष्ठ सहायक अधीक्षक - 2 पदावर कार्यरत असलेले स. नारायणसिंघ नंबरदार हे दि. 28 फेब्रुवारीला 41 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होताहेत. वर्ष 1981 मध्ये अगदी ऐकोनीस वर्ष वयात ते सेवादार (सेवक) पदावर प्रथम रुजू झाले. नंतर, त्यांनी आपल्या कार्यशैली आणि कमातील चिकटीपणामुळे थेट बोर्डाच्या सहायक अधीक्षक पदापर्यंत मजल मारली. हे त्यांच्यातील कामाविषयीचा एक प्रणाणिक व्यासंगच असावा. नारायणसिंघ नंबरदार यांच्याशी माझा थेट संबंध गुरुद्वारा बोर्डातील नौकरी दरम्यान (वर्ष 1991 ते 1999) आला होता. त्यापूर्वी नारायणसिंघ मला एक चित्रकार म्हणून परिचित होते. पेंसिल स्केचवर्क पासून दुकानाच्या पाट्या रंगावण्याचा त्यांच्या परिश्रम काळ एक पार्ट-टाइम उद्योग म्हणून त्यांनी स्वीकारला होता. म्हणून त्यांची ओळख "पेंटर" म्हणून प्रसिद्ध होत गेली.
गुरुद्वारा बोर्डाची नौकरी पार पाडून ते रात्रीच्या वेळी पाच ते सहा तास दुकानाच्या पाट्या रंगवायचे. गुरुद्वारा बोर्डात मी त्यांच्यापेक्षा दहा वर्षें कनिष्ठ होतो. पण त्यांच्या स्वाभावामुळे त्यांच्यातला "सीनियर भाव" कधी त्रासदायक ठरला नाही. त्यांचा हसत खेळत आणि उपस्थित प्रसंगावर "जोक्स" करण्याचा स्वाभाव आजही सर्वांना आवडतो. एखाद्या विषयावर त्यांनी केलेले व्यंग किंवा टीका नेहमीच समोरच्या माणसाच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणारी असते. गुरुद्वारा बोर्डात ते अनेक पदांवर व अनेक विभागात कार्यरत राहिले आणि प्रत्येक ठिकाणी त्यांनी आपल्या सहकाऱ्यांशी मैत्रीची वागणूक देऊन आपल्या व्यवस्थापन कामाची छाप सोडली. त्यांनी योगदान दिलेला असाच एक उल्लेखनीय कार्य आठवतो की त्यांनी गुरुद्वारा बोर्डातर्फे साध्य "श्री दशम ग्रन्थसाहिब" ग्रंथाच्या पुन:र्मुद्रण कार्यात मोलाची भूमिका पार पाडली होती.
संपादन कार्यातील मुद्रणदोष शोधून काढण्याची त्यांनी दिलेली जवाबदारी सक्षमपणें पार पाडली होती. एवढचं नव्हे तर त्यांनी देशभरात त्या - त्या ठिकाणी भेटीं देऊन माहिती गोळा करण्याचे कार्यें केले ज्या - ज्या ठिकाणी श्री दशम ग्रन्थसाहिबांचे जुने किंवा हस्तलिखित स्वरुप विद्यमान होते. वर्ष 2008 मध्ये नांदेड मध्ये पार पडलेला श्री गुरु ग्रंथसाहिब गुरुतागद्दी त्रिशताब्दी सोहळ्याच्या तयारीत नारायणसिंघ यांचा खारीचा पण मोलाचा वाटा होता. तत्कालीन गुरुद्वारा बोर्ड प्रशासक व राज्याचे पोलीस महानिरीक्षक डॉ परविंदरसिंघ पसरीचा यांच्यातर्फे मुंबई येथे सुरु करण्यात आलेल्या तयारी कार्यालयात त्यांनी सतत चार वर्षे सेवा देऊन आपली कर्तबगारी बजावली होती. त्यावेळी बोर्डातर्फे काढण्यात आलेल्या जागृति यात्रेचे देशव्यापी मार्गचित्रण करण्यासाठी त्यांनी आपली कसाब दाखविली होती. शिवाय मागे श्री गुरु नानकदेवजी यांच्या 550 प्रकाशपर्वास समर्पित "कलतारण गुरु नानक आया यात्रा" वेळी सुद्धा त्यांनी आपल्या अनुभवाची पुनरावृत्ति करून दाखवली.
बोर्डाच्या अनेक उपक्रमात त्यांनी नेहमीच शांत व संयमी भूमिका पार पाडली व अनर्थक वादापासून त्यांनी स्वतःला दूरच ठेवले. खरं तर नारायणसिंघ नंबरदार हे आज बोर्डाचे अधीक्षक म्हणून सेवानिवृत्त व्हायला हवे होते. त्यांच्या जवळ मित्रमंडळीचा साठा अपर्याप्त असला तरी ते राजकीय पाठबळ मिळविण्यात कुठेतरी कमी पडले असावे असे माझे स्पष्ट मत आहे. नारायणसिंघ यांच्या सोबत बोर्डात जवळपास दहा वर्षे व नंतर सामाजिक जीवनात काम करतांनाचे अनेक अफलातून प्रसंगाची आठवण येत आहे.
नारायणसिंघ यांची महफिल नेहमी मित्रांचा थकवा दूर करणारी व मानसिकरित्या स्वस्थ करणारी ठरते याची अनेकांना प्रचिती घडून आली असावी. त्यांचे रंगमंचावर अभिनय करण्याचे स्वप्न आज पर्यंत सकारले गेले नाही याची एक मित्र म्हणून नेहमीच मला खंत राहील. नौकरीतील सेवानिवृत्ति नंतर पुढे भरारी घेण्यासाठी त्यांच्या समोर एक अफाट आकाश मोकळे आहे. आज प्रसंगी, स. नारायणसिंघ नंबरदार यांनी शेवट पर्यंत दिलखुलासपणे जगावे अशा सदिच्छा व्यक्त करतो.
.....स. रवींद्रसिंघ मोदी, पत्रकार व लेखक.