नदीसमवेत आपलेही जगण्याचे प्रवाह समजून घेण्यासाठी येत्या रविवारी "पीस वॉक"चे आयोजन -NNL

⦁ स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत विशेष उपक्रम

⦁ रविवारी बंदाघाट येथे सकाळी 8 वा. आयोजन


नांदेड|
ज्या-ज्या भागातून नदी वाहत पुढे जाते त्या-त्या ठिकाणी संस्कृती बहरत जाते. याची अनुभूती घेतच मानवी पिढ्या विकसित होत आल्या आहेत. आपल्या नांदेड जिल्ह्याला गोदावरीचा समृद्ध वारसा मिळाला आहे. एका अर्थाने गोदावरी आपल्या सांस्कृतिक, वैचारिक, आध्यात्मिक विकासाचे शक्तीस्थळ आहे.

अनेक पिढ्या या काठावर घडल्या. या पिढ्यांचे शेवटचे अस्तित्वही तिने सामावून घेतले. आपल्या काठावरील अनेक धुरांचे लोट तिने तेवढ्याच संवेदनेने कवेत घेतले. गोदावरी म्हणजे चैतन्य. गोदावरी म्हणजे जन्मोजन्मीची सोबती. गोदावरी म्हणजे उत्साह. गोदावरी म्हणजे संयम. गोदावरी म्हणजे प्रतिबिंब ज्याचे-त्याचे. प्रत्येक प्रवाहाला ती आपल्यात सामावून घेत आली आहे. तिच्याकडे जसे आपण पाहू तसा साक्षात्कार ती आपल्याला देत राहते.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त गोदावरी नदीच्या कृतज्ञतेपोटी जिल्हा प्रशासनातर्फे "पीस ऑफ वॉक" हा एक अभिनव कार्यक्रम येत्या रविवारी घेण्यात आला आहे. शांतीचे अभ्यासक डॉ. जॉन चेल्लादुराई, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुरेश सावंत आणि साहित्यिक मनोज बोरगावकर यांच्या संवादातून आपल्या जगण्याचे प्रवाह व जीवनाचे आध्यात्मिक संदर्भ समजून घेतले जातील.

दिनांक 19 डिसेंबर, रविवार रोजी बंदाघाट नांदेड येथे सकाळी 8 ते 8.45 या कालावधीत आयोजित या अभिनव कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकुर-घुगे, मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने, यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमात अधिकाधिक नांदेडकरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी केले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी