हिमायतनगरचे पोलीस अधिकारी - ठाणे अंमलदार क्वार्टर मोजतेय अखेरच्या घटिका -NNL

नव्याने पोलीस वसाहत बांधण्याची आवश्यकता; भाड्याच्या इमारतीत राहण्याची आलीय वेळ    



हिमायतनगर, अनिल मादसवार|
येथील बोरगडी रस्त्यावर असलेल्या निजामकालीन पोलीस अधिकारी - ठाणे अंमलदार क्वार्टर मधील इमारती जीर्ण झाल्या असून, या इमारती धोक्याच्या झाल्या आहेत. कोणताही अधिकारी -कर्मचाऱ्यांना राहता येत नसल्याने या ठिकाणी ३ अधिकारी व ४० ते ५० कर्मचारी यांच्यासाठी नवीन पोलीस वसाहतीचे बांधकाम करण्यात यावे असा प्रस्ताव पाठविण्यात आला. परंतु  बांधकामाला अद्यापही मुहूर्त मिळाला नाही. त्यामुळे पोलिसांना भाड्याच्या इमारतीत राहावे लागते, तर काही जणांवर अपडाऊन करून नौकरी करण्याची वेळ आली आहे. हि बाब लक्षात घेता पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी, पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी तातडीने हिमायतनगर येथील पोलीस विभागाच्या ताब्यात असलेल्या जागेत नूतन वसाहती निर्मितीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळवून घेऊन निवासाचा प्रश्न सोडविण्याची गरज निर्माण झाली आहे.


 
सदरक्षणाय...खलनिग्रणाय ... या ब्रीद वाक्याला धरून ४६ ग्रामपंचायतीच्या जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी पार पाडत अनेक पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी मागील ५० वर्षापूर्वीच्या जीर्ण होऊ लागलेल्या निजामकालीन इमारतीत निवास करून कर्तव्य बजावले आहे. मागील काही वर्षापासून येथील पोलीस अधिकारी - ठाणे अंमलदार इमारत जीर्ण होऊन धोकादायक स्थितीत अखेरच्या घटका मोजत आहेत. त्या काळात येथे पोलीस अधिकारी ०१, कर्मचारी यांचे १७ निवासस्थान होते. ते मोडकळीस आल्याने येथे कोणत्याही अधिकारी अथवा पोलीस कर्मचारी यांच्या कुटुंबाला राहण्याजोगे निवासस्थान राहिले नाही. त्यामुळे त्यांना कुटुंबियांसह भाड्याच्या इमारतीत निवास करून आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो आहे.  

येथील पोलिस वसाहतीतील इमारतीचे बांधकाम अत्यंत जुनाट झाले असल्याने मोडकळीस आले आहे, या वसाहतीच्या सुरक्षाही भिंतीला तडे गेले असून, अनेक ठिकाणी कोसळलेली आहे. तर इमारतीचे दारे, खिडक्यांचे साहित्य सध्या चोरीला जात असल्याचे दिसते आहे. हि बाब लक्षात घेता पोलीस अधिकारी -कर्मचाऱ्यांच्या वसाहतीची होणारी अवकळा थांबवून जुने इमारती जमीनदोस्त करून नव्याने भोकराच्या धर्तीवर हिमायतनगर येथे ३ पोलीस अधिकारी, ४० ते ५० पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानसाठी वसाहतीचे बांधकाम केल्यास पोलिसांच्या कुटुंबीयांची होणारी अडचण दूर होईल.



याबाबत एप्रिल २०१२ रोजी हिमायतनगर येथील पोलीस ठाणे इमारतीच्या भूमिपूजन प्रसंगी तत्कालीन नांदेड जिल्ह्याचे विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप बिष्णोई यांनी अधीकारी - कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाच्या नवनिर्मित्तीसाठी पुढाकार घेऊन प्रस्ताव मागविला होता. त्यांनतर त्यांची बदली झाल्याने आजवर हिमायतनगर येथील पोलीस अधिकारी - कर्मचारी यांच्या निवासस्थानाच्या बांधकामाचा प्रश्न जैसे थेच आहे. आजघडीला नांदेड जिल्ह्याचे विशेष पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी, आणि पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी याबाबीकडे कटाक्षाने लक्ष देऊन सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करून बांधकामाचा मुहूर्त साधावा आणि पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे.

यासंदर्भात पोलीस निरीक्षक भगवान कांबळे यांचेशी संपर्क साधला असता ते म्हणाले कि, आमच्या पोलीस विभागाच्या अखत्यारीत हिमायतनगर येथे ताब्यात असलेल्या जागेबाबतचा संपूर्ण अहवाल आणि मोडकळीस आलेल्या इमारती आणि सध्या परिस्थिती बाबतचा संपूर्ण रिपोर्ट दि.१० जुलै २०२१ ला छायाचित्रासह पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे पाठविला आहे. त्यामध्ये मोडकळीस आलेल्या जुन्या इमारती पाडून नव्याने ३ अधिकारी व ४० ते ५० कर्मचाऱ्यांच्या निवासस्थाने बांधकाम करून देण्याचे नमुद्दे करण्यात आले आहे. याबाबतचा पुढील निर्णय आमचे वरिष्ठ अधिकारी घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करत आहेत.  

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी