हिमायतनगरात हप्ते देणाऱ्यां रेती माफियांना मुभा तर नव्याने धंदा करणाऱ्यांवर कार्यवाही -NNL

हिमायतनगर तहसीलच्या देखरेखीत होत असलेल्या कारभाराला लागाम लावावा

हिमायतनगर| शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात मागील महिन्याभरापासून नदी-नाल्याच्या काठावरून मोठ्या प्रमाणात रेतीची चोरी करून बांधकाम धारक गरजूना अव्वाच्या सव्वा दराने विक्री करत आहेत. हा सर्व प्रकार महसुलच्या तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांना माहित असताना देखील हप्ते देणाऱ्या रेती माफियासाठी रान मोकळे सोडले जात आहे. तर नव्याने या धंद्यात उतरलेल्यांची धरपकड करून आपला स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला जात असल्याची जोरदार चर्चा होते आहे. हा सर्व प्रकार उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांच्या लक्षात येत नसले काय..? असा प्रश्न आता समोर येऊ लागला आहे. याकडे जिल्हाधिकारी डॉ विपीन यांनी लक्ष देऊन हिमायतनगर तहसीलच्या देखरेखीत होत असलेल्या कारभाराला लागाम लावावा अशी रास्ता मागणी या भागातील पर्यावरण प्रेमी नागरीकातून पुढे येत आहे.

हिमायतनगर - उमरखेड तालुक्याच्या काठावरून पैनगंगा नदी वाहते आहे. या नदीमध्ये हिमायतनगर शहरासह ग्रामीण भागातून अनेक मोठे नाले वाहत येऊन मिसळणारे आहेत. त्या नाल्यातून आणि पाणी असलेल्या पैनगंगा नदीच्या पत्रातून गाढव आणि मजुराच्या सहाय्याने काही वाळू दादांनी रेतीची रात्रंदिवस उपसा सुरु केला आहे. तालुक्यातील डोल्हारी - गांजेगाव बंधारा, कोठा तांडा, कामारी, लाखाडी नदी, पिंपरी, विरसनी, दिघी, खडकी, टाकाराळा, आदीसह अन्य रेती घाटावरून चोरीच्या मार्गाने रेती काढली जात आहे. या गंभीर बाबीकडे महसूल प्रशासनाच्या अधिकारी - कर्मचाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे पाहावयास मिळते आहे. त्यामुळे रेतीची वाहतूक करणारे निर्ढावले असून, थंडीच्या लेटचा फायदा घेत रेतीचा उपसा व स्टोक करण्यावर अधिक भर दिल्याचे दिसते आहे. तर गरजूना रात्रीतून रेती टाकून दिवसा रेतीचा मोबदला घेतला जात आहे.

मागल्या १५ दिवसात हिमायतनगर तालुक्यात अनेक वेळा रेतीची विनापरवाना वाहतूक करताना अनेक वाहने पकडल्या गेली. मात्र ज्यांनी तडजोडीला थारा दिला नाही, किंवा जे या व्यवसायात नवीन आहेत अश्या प्रकारच्या २ जणांची रेतीची वाहने पकडून पोलीस ठाण्यात लावली असल्याची माहिती एका रेतीचा धंदा करणाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे. यावरून हिमायतनगर तहसील प्रशासनाचा कारभार केवळ बोटचेपी पद्धतीने चालतो कि काय...? अशी शंका येऊ लागली आहे. या शंकेला वावही आहे, कारण गतवर्षी उत्खननाचे सर्व नियम धाब्यावर ठेऊन कधी नव्हे तेवढा मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा पैनगंगा नदीतून आणी ग्रामीण भागातील नाल्यातून करण्यात आला होता.


त्यावेळी काही पर्यावरण प्रेमी नागरिकांनी आक्षेप घेऊन निवेदने दिली, तर काहींनी आंदोलन केल्यांनंतर महसूलच्या लोकांनी शेवटच्या टप्प्यात रेतीचे अवैद्य साठे जप्त करण्याची मोहीम चालविली. चार ते पाच दिवसात दोन पथकाने रेती या गौण खनिजाच्या चोरीला आळा घालण्याचा प्रयत्न केल्याचे दाखविण्यासाठी दिघी, कोठा तांडा, बोरगडी, धानोरा, आदींसह अनेक नदीजवळील रेती घाट परिसरात हजारो ब्रास रेतीचे ढिगारे जप्त केली. मात्र त्या जप्त रेती साठ्याचा अद्यापपर्यंत लिलाव करण्यात आला नाही. त्यामुळे जप्त केलेल्या रेतीसाठ्याच्या ठिकाणी रेती आहे कि..? चोरीला गेली याबाबत देखील साशंकता निर्माण झालेली आहे.

यावर प्रश्नचिन्ह निर्माण होण्यास तसे कारणही आहे, कारण दिघी येथील जप्त करण्यात आलेल्या एका रेती साठ्यातून चक्क येथील सरपंच व रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराने परस्पर रेती लांबविल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामुळे इतर ठिकाणच्या जप्त रेतीसाठ्याचे काय..? हाल असतील हे सांगणे सध्यातरी कठीण आहे. म्हणूनच कि काय...? महसूलच्या लोकांनी अद्यापपर्यंत मागील वर्षी जप्त केलेली रेतीसाठ्याचे लिलाव केले गेले नाहीत. असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक, रेतीअभावी घरकुलाचे बांधकाम रखडलेल्या लाभार्थ्यांना व पर्यावरण प्रेमींना पडला आहे.

यावर्षी तर दिवाळी नंतर सुरु झालेल्या रेतीचा गोरखधंदा पाहता यंदा तरी कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी डॉ.विपीन साहेब याकडे लक्ष देऊन रेतीच्या चोरीमुळे शासनाचा महसूल बुडणार नाही यासाठी कठोर पाऊले उचलून तालुक्याचा कारभार पाहणारे उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांना कार्यवाहीचे आदेश देऊन, पैनगंगा नदीकाठावरील सर्वच रेती घाटाचे रितशीर लिलाव करतील का..? याकडे तालुक्याचे लक्ष लागून आहे. जर रेती घाटाचा लिलाव झाला तर गरजूना अल्प दारात रेती उपलब्ध होईल आणि रखडलेल्या गोरगरिबांच्या घरकुलाचे स्वप्न पूर्ण होतील. अन्यथा भविष्यात नदीकाठावरील जनतेला तीव्र पाणी टंचाईच्या समस्ये बरोबर घरकुलाचे स्वप्न अधांतरित राहण्याची वेळ येईल यात शंका नाही.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी