नांदेड| लोककल्याणासाठी आणि जनतेचे दु:ख कमी करण्यासाठी सदैव तत्पर असलेले खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या पाठपुराव्याने नांदेड जिल्ह्यातील तिघाजणांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधी मंजूर झाला आहे. ६ लाख ४७ हजार ७५७ रूपयांचा निधी संबंधित रुग्णालयासाठी मंजूर करण्यात आल्याचे पत्र या विभागाचे सचिव प्रदीपकुमार श्रीवास्तव यांच्या सहीनिशी प्राप्त झाले आहे.
गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना आर्थिक मदत देऊन त्यांना जीवनदान देण्यासाठी प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून भरघोस निधी मंजूर करून दिला जातो. यासाठी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी सतत पाठपुरावा केला आहे. यापूर्वी नांदेड जिल्ह्यातील अनेकांना या निधीतून अर्थसाहाय्य करण्यात आले. त्यामुळे अनेकांचे प्राण वाचू शकले तर अनेकजण दुःखमुक्त झाले आहेत. आता पुन्हा खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या पाठपुराव्याने नांदेड जिल्ह्यातील तीन रुग्णांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधी मंजूर झाला आहे.
नांदेड येथील ज्येष्ठ पत्रकार महेश विजयकुमार राजे यांची प्रकृती ठिक नव्हती. त्यांच्यावर पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय येथे उपचार करण्यासाठी तीन लाख रूपयांची मदत प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून करण्यात आली आहे. कंधार तालुक्यातील शेकापूर येथील भास्कर शिवाजी डफडे यांच्या उपचारासाठी दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल पुणे यांच्या नावे तीन लाख रूपयांचा मदत निधी मंजूर करण्यात आला आहे. नांदेड शहरातील विमानतळ परिसरातील कर्मवीरनगर येथील जमीर बशीर शेख यांना उपचारासाठी ४७ हजार ७५७ रूपयांचा प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधी मंजूर झाला आहे. तिन्ही व्यक्तींच्या मदतीचा निधी संबंधित रुग्णालयाच्या व्यवस्थापनाकडे देण्यात येणार आहे. या अनुषंगाने प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधी विभागाचे सचिव प्रदीपकुमार श्रीवास्तव यांच्या स्वाक्षरीनिशी निधी मंजुरीचे पत्र देण्यात आले आहे.