जल जीवन मिशन अंतर्गत नळ जोडणीसाठी विशेष मोहिम - मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे -NNL

जिल्ह्यात गाव कृती आराखडा पंधरवडा 


नांदेड| ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबापर्यंत नळ जोडणीव्‍दारे पाणीपुरवठा करण्यासाठी जल जीवन मिशन अंतर्गत आज गुरुवार दिनांक 22 जुलै 2021 ते दिनांक 7 ऑगस्ट 2021 या कालावधीमध्ये गाव कृती आराखडा पंधरवडा अभियान राबविण्यात सुरवात करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिली आहे.

या संदर्भात आज जल जीवन मिशन,  राज्य पाणी व स्वच्छता विभागाच्या वतीने ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता, शाखा अभियंता, डाटा एंट्री ऑपरेटर तसेच जिल्हा कक्षाच्या सनियंत्रण मूल्यमापन सल्लागार यांना झूम ॲपद्वारे गाव कृती आराखडा, माहितीचे संकलन, मोहिम राबविण्याच्या प्रक्रिया, कोबो टूलव्‍दारे माहिती अपलोड बाबत प्रशिक्षण देण्यात आले.

दुसऱ्या टप्प्यात दिनांक 26 जुलै रोजी उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता), उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राम पंचायत), ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता, शाखा अभियंता, भूवैज्ञानिक, मनुष्यबळ विकास सल्लागार, सनियंत्रण व मूल्यमापन सल्लागार, पाणी गुणवत्ता सल्लागार तर तालुकास्तरावरील गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी पंचायत, उपअभियंता, शाखा अभियंता, गट समन्वयक, समूह समन्वयक यांना झूम ॲपद्वारे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

तालुका पातळीवर सर्व गट विकास अधिकारी यांच्याकडून दि. 28 व 29 जुलै रोजी प्रशिक्षणाचे आयोजन केले जाणार आहे. यामध्ये गाव कृती आराखडा बाबत सरपंच, ग्रामसेवक, जलसुरक्षक, पंप ऑपरेटर, आशा वर्कर, ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समितीचे दोन प्रतिनिधींना झूम ॲपद्वारे प्रशिक्षण देणार आहेत. गाव पातळीवर दिनांक 1 ते 3 ऑगस्ट या कालावधीत गाव कृती आराखडाच्या अनुषंगाने लागणारी माहिती कोबो टूल साधनाचा वापर करून संकलित करण्यात येईल. तर दिनांक 5 ते 7 ऑगस्ट दरम्यान प्राप्त माहितीवरून कृती आराखड्याची निर्मिती व गाव कृती आराखडा पडताळणी प्रक्रिया करुन दिनांक 15 ऑगस्ट 2021 रोजी होणाऱ्या ग्रामसभेमध्ये मंजुरीकरिता कार्यक्रम पत्रिकेवर ठेवण्यात येणार असल्याचेही मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सांगितले. 

गाव कृती आराखडा पंधरवड्यात जिल्हा कक्षातील तज्ञ, सल्लागार, तालुका पातळीवरील गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी पंचायत, उपअभियंता, शाखा अभियंता,  गावपातळीवर ग्रामसेवक, जलसुरक्षक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांनी सहभाग घेऊन गाव कृती आराखडा अभियान यशस्वीरित्या राबविण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. आर. पाटील व  ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पाटील यांनी केले आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी