खा. हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्याने मका, ज्वारी खरेदीसाठी ३१ जुलै पर्यंत मुदतवाढ -NNL


किनवट/हिंगोली|
किनवट तालुक्यात आधारभूत धान्य खरेदी योजनेंतर्गत सुरु करण्यात आलेल्या भरडधान्य मका आणि ज्वारी खरेदी करण्यासाठी ३१ जुलै पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून, याबाबत खासदार हेमंत पाटील यांनी केंद्रीय अन्न नागरी पुरवठा मंत्री पियुष गोयल आणि राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून मुदतवाढ करून घेतली आहे. 

हे केंद्र सुरु करण्यासाठी सुद्धा खासदार हेमंत पाटील यांनी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे सचिव विलास पाटील आणि राज्याच्या वित्त विभागाचे सचिव राजीव कुमार मित्तल व  अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सोनिक यांची भेट घेऊन .मागणी केली होती. या मागणीची तातडीने  दखल घेवून खरेदी केंद्र सुरु करण्याचे निर्देश सचिवांनी  संबंधितांना दिले त्यामुळेच हे केंद्र सुरु करण्यात आले होते. आधारभूत पणन २०२०-२१ अंतर्गत आदिवासी विकास महामंडळाने भरडधान्य खरेदी करण्यासाठी ज्वारी व मका उत्पादक  एकूण २ हजार ५२८ शेतकऱ्यांची ऑनलाईन  नोंदणी करण्यात आली आहे. 

यापूर्वी हे खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी खासदार हेमंत पाटील यांनी पाठपुरावा केला होता. त्यांनतर ९ जून पासून हे केंद्र सुरु करण्यात आले होते. परंतु अद्यापही काही शेतकरी शिल्लक असल्याने यासाठी मुदतवाढ मिळावी याकरिता मागणी वाढल्यानंतर खासदार हेमंत पाटील यांनी केंद्रीय अन्न नागरी पुरवठा मंत्री पियुष गोयल आणि राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री  छगन भुजबळ यांच्याकडे पत्रव्यवहार करून सात्यत्याने पाठपुरावा केला होता. त्यामागणीची दाखल घेऊन ३१ जुलै पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तालुक्यातून मका विक्रीसाठी ८८५ आणि ज्वारी करिता १६४३ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. मुदतवाढ मिळल्यामुळे मोठ्या प्रमाणात ज्वारी आणि मका खरेदी होण्याची शक्यता आहे.

यामुळे शेतकरी वर्गातून आनंद व्यक्त केला जात आहे. कोरोनामुळे शेतमालाला भाव मिळत नसून त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत .म्हणूनच शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी  या भागातील खरेदी केंद्र सुरू करावेत. आणि त्यांना मुदतवाढ देण्यात यावी याकरिता खासदार हेमंत पाटील सात्यत्याने  कार्य करत आहेत. मका आणि ज्वारी खरेदी सुरु होऊन नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांचा माल खरेदी केला जाईल असे यापूर्वीच राज्यशासनाने जाहीर केले आहे .

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी