७ वर्षांपासून उखडलेला रस्ता झाला खड्डेमय
हिमायतनगर, अनिल मादसवार| वाशी, दुधड, टाकराळा, दरेसरसम, दगडवाडी आदी ठिकाणहून केवळ १० ते १५ किमी अंतरावर तेलंगणा स्टेट असून, या भागाकडे ये-जा करणाऱ्या नागरिकांना गत ७ वर्षांपासून खड्डेमय रस्त्यातून मार्ग काढताना नरक यातना भोगाव्या लागत आहेत. यामुळे प्रवाशी व वाहनधारक मेटाकुटीला आले असून, तेलंगणाला जोडणाऱ्या बॉर्डर रस्ताच्या दुरुस्तीकडे लोकप्रतिनिधींचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने रस्त्याला कोणी वाली आहे का...? असा संतप्त सवाल नागरिक विचारीत आहेत.
हिमायतनगर शहर हे तेलंगणा - मराठवाड्याच्या बॉर्डरवर आहे. निजामाच्या काळात हिमायतनगर तालुका मुधोळ मंडळ मध्ये समाविष्ट होता. त्याच ठिकाणहून हिमायतनगरचा कारभार चालत असे कालांतराने हिमायतनगर तालुक्याचा भाग जंगलापासून महाराष्ट्रात वर्गीकृत करण्यात आला. महाराष्ट्रात आल्यामुळे या भागाचा म्हणावा तसा विकास झालेला नाही, मात्र मागील २० वर्षांपूर्वी माजी केंद्रीय ग्रामविकास मंत्री सूर्यकांताताई पाटील यांनी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून ग्रामीण रस्ते मुख्य रस्त्याला जोडण्याच्या उद्देशीषने सिरपल्ली ते वाशी रस्त्याचे काम मंजूर करून आणले होते. काहीवर्षे हा रस्ता चांगला झाला होता, मात्र त्या ठेकेदारने ५ वर्ष देखभाल दुरुस्तीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने आता या रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले असून, रस्त्यात खड्डा कि खड्ड्यात रस्ता हे वाहनधारकांना कळेना झाले आहे.
अगोदरच जंगलाचा भाग आदिवासी पट्ट्यात येत असल्याने या भागातील शेतकरी, सामन्यांना शासनाकडून आवश्यक त्या सुविधा मिळत नाहीत. हिमायतनगर शहर तेलंगणा राज्याचा सीमेलगत असल्यामुळे या तालुक्यातील हिंदू, मुस्लिम, वडार, गोल्लेवार, मुन्नेरवारलू, पदमशाली, कोमटी, आदिवासी, बंजारा व इतर १८ पगड जाती धर्माचे ६० टक्के लोक तेलगू भाषिक आणि तेलंगणाच्या संपर्कातील आणि नात्यासंबंधाचे आहेत. त्यामुळे बहुतांश व्यवहार, साहित्य खरेदी व विक्रीसाठी कुबिर, म्हैसा, निझामाबाद, आदिलाबाद, इछोडा, निर्मल या ठिकाणी व्यापारी, शेतकरी वर्गाची ये - जा सुरु असते. हिमायतनगर तालुक्यातील बहुतांश शेतमजूर दसर्यानंतर तेलंगणा राज्यात ८ महिने कामासाठी स्थलांतरित होतात. हिमायतनगरच्या जंगलाचा ८० टक्के भाग तेलंगणाला राज्याला लागून असून, महाराष्ट्र हद्दीतील हे रस्ते जीवघेणे बनले आहेत. तर तेलंगणातील रस्ते एकदम चकाचक असून, भारतात हे दोन्ही राज्य असताना महाराष्ट्रातील रस्त्याची अशी अवस्था का...? असा सवाल या भागातील नागरिक विचारीत आहेत.
रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिकांना तेलंगणात ये - जा करताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो आहे, अनेकदा या रस्त्याने बरेचशे अपघात झाले. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी एखाद्याचा बळी गेल्यानंतर रस्त्याचे काम केले जाईल का..? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. तर काही नागरिकांनी तर लोकप्रतिनिधींचं नावाने बोटे मोडत केवळ निवडणुकीत मतदान मागण्यासाठी आल्यानंतर राजकीय नेते या भागाकडे फिरकत नाहीत असा आरोप खासदार आणि आमदारावर केला आहे. हि बाब लक्षात घेता तेलंगणा बॉर्डरला जोडणाऱ्या वाशी - एकघरी - पार्डी - हिमायतनगर आणि इतर जंगलच्या भागातील रस्त्याचे कामे मार्गी लागतील काय..? याकडे प्रवाशी, वाहनधारक व जंगलच्या काठावर राहणाऱ्या नागरिकांचे लक्ष लागून आहे.
या रस्ता कामाला खासदार हेमंत पाटील यांनी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून मोठा निधी मंजूर करून आणला, मात्र प्रत्यक्षात अजूनही कमल सुरुवात झाली नाही. त्यामुळे या रस्त्याचे भाग्य कधी उजळणार असा प्रश्न या भागातील जनता विचारीत आहे.