महावितरण ने कामात सुधारणा करावी; खा. हेमंत पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिली ताकीद -NNL


हिंगोली|
हिंगोली जिल्ह्यातील महावितरण विभागाचे काम अत्यंत ढिसाळ असून  याबाबत त्यांना वारंवार सूचना करूनही कामात सुधारणा केली जात नाही. अन्य मार्गाने समज देण्यापेक्षा वेळीच कामामध्ये सुधारणा करावी अशी ताकीद महावितरणच्या अधिकाऱ्यांना खासदार हेमंत पाटील यांनी आज ( दि. ९) झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दिली. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली हि  बैठक पार पडली.  


हिंगोली जिल्हा नियोजन समितीच्या आज (दि.९) झालेल्या बैठकीला  हिंगोली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गणाजीराव बेले, आ. तान्हाजी मुटकूळे, आ. राजू नवघरे, आ. संतोष बांगर, विधानपरिषद सदस्य विप्लव बाजोरिया, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी राधा बिनोद शर्मा, जिल्हा नियोजन अधिकारी किरण गिरगावकर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्यासह जिल्हा नियोजन समिती सदस्य, जिल्हा परिषदचे सदस्य व अधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना खासदार हेमंत पाटील यांनी जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या सूचना केल्या यावेळी त्यांनी हिंगोली जिल्हा महावितरण विभागाला धारेवर धरत डीपी वाहतूक करण्याचा खर्च व एजन्सी कॉन्ट्रॅक्टरचे नंबर ग्रामपंचायतला लावावे. अश्या सूचना मागील बैठकीत करूनही त्या न लावल्याबद्दल संबंधित महावितरण अधिकाऱ्याना  जाब विचारला. 


तसेच शेतकऱ्यांसाठी वरदान असलेल्या सौर उर्जा पंप योजनेचे  पंप मोठ्या प्रमाणावर बंद आहेत. या प्रकरणाची चौकशी करावी. संबंधित एजन्सी धारकाचे नाव व मोबाईल नंबर शेतकऱ्यांना द्यावेत अशा सूचना दिल्या. शिक्षण विभागाच्या प्रश्नाबाबत बोलताना ते म्हणाले कि, जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने शाळांसाठी वर्गखोल्या बांधण्याचे काम प्राधान्यक्रमाने व शालेय शिक्षण समितीच्या पुढाकाराने करण्यात यावे. 


वसमत येथील जवाहर नवोदय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा नियोजन समितीकडून पिण्याच्या पाण्याची कायम स्वरूपाची व्यवस्था करून देण्यात यावी. हिंगोली जिल्ह्यातील महत्वाच्या तीर्थक्षेत्राचा दर्जा वाढविण्यात आलेल्या प्रस्तावातील त्रुटी त्वरित पूर्ण करून घ्यावेत असेही ते म्हणाले. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी स्पर्धा परिक्षेची, पोलीस  भरतीची तयारी करत आहेत त्या अनुषंगाने  प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर  खुल्या व्यायामशाळा युवकांसाठी सुरू करण्याचे निर्देश जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना दिले. तर कोरोना काळात हिंगोली जिल्हा प्रशासन यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांचे अभिनंदन खासदार हेमंत पाटील यांनी केले.  

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी