रायलसीमा एक्सप्रेस नांदेडपर्यंत आणण्यासह विविध विषयावर चर्चा
नांदेड, अनिल मादसवार| रायलसिमा एक्सप्रेस रेल्वे नांदेडपर्यंत आणण्यासाठी नांदेड विदर मार्गाचे काम सुरु करण्याच्या अनुशंगाने आमचे प्रयत्न सुरु आहेत. लवकरच या समस्या सुटतील असा विश्वास खा प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केला आहे. यानुषंगाने दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक गजानन माल्या यांच्याशी चर्चा झाल्याचे खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी सांगीतले. नांदेडसह मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांना रेल्वेच्या सुविधा चांगल्या मिळाव्यात यासाठी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यानी सातत्यपूर्ण प्रयत्न सुरुच ठेवले आहेत. त्यामुळे अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत. याचअनुशंगाने काल खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यासह शिष्टमंडळाने दक्षिण मध्ये रेल्वेचे महाव्यवस्थापक गजानन माल्या यांची भेट घेतली.
यावेळी खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी माल्याच्या निदर्शनास या भागातील रेल्वेच्या अडचणी लक्षात आणून देताना तिरुपती निझामाबाद सुपरफास्ट ही रायलसीमा एक्सप्रेस नांदेड पर्यंत सोडावी अशी मागणी केली. यासाठी आपण रेल्वे बोर्डाशी चर्चा करु, नविन वेळापत्रक तयार करण्यात येईल आणि लवकरच ही गाडी नांदेड पर्यंत सुरु करण्यात येईल अशी माहिती दिली आहे.
याशिवाय नांदेड - विदर नव्या रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाली असली तरी कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली नाही त्यामुळे या कामाला लवकर सुरुवात करावी. हुजुर साहिब सचखंड गुरुदवारा हा आंतरराष्ट्रीय किर्तीचा असल्याने नांदेड येथील रेल्वे स्टेशनवर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध कराव्यात, मराठवाडा एक्सप्रेसला दोन वातानुकुलीत डब्बे जोडावेत, वर्धा- यवतमाळ- नांदेड रेल्वे मार्गासाठी निधी उपल्ब्ध असुनही कामाला गती नाही त्यामुळे या कामाला गती देण्याच्या मागणीसह अनेक मागण्या खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केल्या. या मागणीच्या अनुशंगाने माल्या यांनी सकारात्मक भूमिका घेत बोर्डाशी चर्चा झाल्यानंतर नांदेड -बिदर मार्गाच्या कामाला लगेच सुरुवात करण्यात येईल. मराठवाडा एक्सप्रेसला दोन वातानुकुलीत डब्बे जोडण्यात येतील, वर्धा- यवतमाळ- नांदेड रेल्वे मार्गाच्या कामाला गती देण्यात येईल अशी माहिती माल्या यांनी दिली.
राज्य राणी एक्सप्रेसचे 7 डब्बे नाशिकला उघडत असे ज्यामुळे नांदेड ते नाशिक या अंतरात या डब्यानाचा काहीही उपयोग होत नव्हता. ही बाब लक्षात घेऊन खा प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी नाशिक ला उघडणारे डब्बे नांदेड येथे उघडावेत व नाशिकपर्यंत प्रवाशांना त्या डब्यातून प्रवास करत यावा. यासाठीही भूमिका मांडली त्यानुसार महाव्यवस्थापक माल्या आणि कार्यवाही करण्यात येणार असे संगवून लवकरच हे डब्बे नांदेड येथे उघडतील व प्रवाशांना त्याचा फायदा होईल असे सांगितले. यावेळी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यासही रेल्वे संघर्ष समितीचे शंतनु डोईफोडे, अरुण मेघराज, हर्षद शहा, उमाकांत जोशी, किरण चिद्रावार, गंगाधर जोशी आदिंची उपस्थिती होती.