भोकर,गंगाधर पडवळे| तालुक्यातील वाहन अपघातात मयत झालेल्या तरुणाचा मृत देह गावी नेण्यासाठी बैल गाडीतून गुडघाभर चिखल तुडवीत मयताच्या नातेवाईकांना तारेवरची कसरत करावी लागली असून सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या मतदारसंघात रस्त्या अभावी मृत देहाची अशी परवड झाल्याने गावकऱ्यातून संताप व्यक्त होत आहे.
दि.२१जुलै २०२१ रोजी भोकर नांदा रस्त्यावरील कोळगाव शिवारात दोन दुचाकींचा समोरासमोर धडक झाल्याने या भीषण अपघातात संभाजी ढगे रा. इज्जतगावं ता.उमरी हा दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले होते. त्या गंभीर जखमीवर नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना त्या जखमींपैकी गजानन चन्नपा कुंटावार (वय २३) रा. नांदा या तरुणांचा उपचार दरम्यान मृत्यू झाला सदरील मयताचा मृतदेह अंत्यविधीसाठी दि.२२जुलै रोजी नांदेड वरून गावाकडे नेण्यासाठी आणत असताना अस्मानी संकटाशी सामना नातेवाईकांना करावा लागला.

त्याचे असे की दि.२० जुलै पासून सुरू असलेल्या सततधार पावसाने तालुक्यातील प्रमुख नदी सुधा व आदी नादिनाले दुथडी वाहत आहेत.भोकर ते नांदा गावाकडे जात असताना दरम्यानच्या रस्त्यात मौ. रेणापूर येथील लेंडी नदी मौ.कोळगाव येथील सुधा नदी व नांदा येथील नांदा नदी दुथडी वाहत आहेत.पूर सदृश स्थिती निर्माण झालेली असताना व या रस्त्यावरील पुलांची कामे अर्धवट असल्याने त्या पाण्यातून तो मृतदेह न्यावा कसा असा प्रश्न निर्माण झाला यामुळे सदरील तरुणाचा मृतदेह भोकर किनी मार्गे मसलगा शिवरातून गुढगाभर चिखलातून पाऊल वाटेने बैलगाडीतून नेताना नातेवाईकांना तारेवरची कसरत करावी लागली.
राज्याचे सा. बा.वि. मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या भोकर मतदारसंघातिल नांदा हे गाव असून त्यागावाला जाण्यासाठी असणाऱ्या प्रमुख रस्त्यावरील तिन्ही पुलांची कामे गेल्या काही वर्षापासून अर्धवट आहेत सदरील कामे पावसाळ्यापूर्वी पूर्णत्वास नगेल्याने या रस्त्यावरील रेणापूर,कोळगाव बु,कोळगाव खु,नांदा बु,गारगोटवाडी,दिवशी बु गावच्या नागरीकांना रस्त्या अभावी नाहक त्रास सहन करावा लागत आहे व अशा अस्मानी संकटांचा सामना करावा लागत आहे .
याच कारणाने नांदा येथील तरुणाच्या मृतदेहाची अशी परवड झाल्याने नातेवाईकांसह सदरील परिसरातील नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे तसेच त्या पुलांचे बांधकाम त्वरित करण्यात यावे अन्यथा आंदोलन छेडलं जाईल आशा इशारा परिसरातील नागरिकांनी दिला आहे.गुत्तेदार व प्रशासन यांच्या विरुद्ध लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा ईशारा नागरिकांनी दिला आहे.
