नुकसानीच्या पंचनाम्याचे निवेदन देताच मंत्र्यांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना आदेश
नांदेड, अनिल मादसवार| हदगाव व हिमायतनगर तालुक्यात दिनांक 21/7/21 रोजी अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकरी बांधवांच्या शेती पिकाचे मोठ्या प्रमाणांत नुकसान झाले. त्यामुळे तत्काळ पंचनामे करून आर्थिक मदत देण्यासाठी आदेश व्हावेत असे निवेदन आज मुंबईत येथे सार्वजानिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री नांदेड अशोकराव चव्हाण, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार याना आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी दिले. त्यावर जिल्हाधिकारी डॉ.विपीन नांदेड याना तत्काळ पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती आमदार जवळगावकरांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना दिली आहेत.

दि.२०, २१ तारखेपासून शहरासह तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून, पावसाने हाहाकार माजविल्याने सर्वच नाले खळाळून वाहू लागले.अनेकांच्या शेती व घरात पाणी घुसल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडली नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत असले तरी, पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले हे मात्र खरे आहे. दमदार पावसामुळे आष्टी, जवळगाव, कामारवाडी, पारवा, कांडली, पोटा, सोनारी, टेभी, सवना ज, महादापूर, सरसम बु, वारंगटाकळी, धानोरा, कार्ला, पिछोण्डी, सिबदरा, वडगाव, मंगरूळ, सवना, पळसपूर, सोनारी, सिरपल्ली, घारापुर, एकंबा, सिरंजनी, शेलोडा, बोरगडी, धानोरा, हिमायतनगर, भागासह तालुक्यातील अनेक रात्रीपासून पावसाने दमदार हजेरी लावली होती. त्यामुळे या भागातील शेती व परिसर जलमय झाले होते. पुराचे पाणी वाहून जाण्यासाठी मार्ग काढलेला नसल्याने पुराच्या पाण्याचे अनेकांच्या शेतजमिनी चिरून मार्ग काढला आहे.

त्यातच हदगाव - हिमायतनगर रस्त्यावरील जवळगाव ते कामारवाडी मध्ये असलेल्या पुलाची कामे अर्धवट झालेली असल्याने येथून करण्यात आलेला पर्यायी रस्ता वाहून गेला. त्यामुळे पुलावरून आणि शेतीमधून पाणी थेट रस्त्यावर आल्याने गावात पाणी शिरले होते. यात शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, हळद, ज्वारी, तूर, मूग, उडीद, यासह अन्य पिकाचे नुकसान झाले आहे.त्यामुळे बळीराजा हवालदिल झाला असून, तात्काळ नुकसान भरपाई मिळावी म्हणून अनेकांनी मागणी केली होती. या मागणीची दखल घेऊन आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी सार्वजानिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री नांदेड अशोकराव चव्हाण, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार याना निवेदन देऊन अतिवृष्टीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी केली.
