1 ऑगस्ट रोजी लोक अदालतीचे आयोजन - NNL

 एसबीआय बँकेची कर्ज प्रकरणे मांडण्याचे शंकर येरावार यांचे आवाहन


नांदेड|
भारतीय स्टेट बँकेने कर्ज वसुलीसाठी कर्जदारांविरोधात न्यायालयात दाखलं केले खटले. दिर्घकाळा पासून प्रलंबित आहेत. जे खटले तडजोडपात्र आहेत. असे खटले आपसी सामंजस्याने मिटविण्यासाठी रविवार, दि. 1 ऑगस्ट 2021 रोजी नांदेड, लातूर, उस्मानाबाद, बीड या जिल्ह्यांतील सर्व न्यायालयात लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. तेव्हा इच्छुक पक्षकारांनी आपली न्यायालयीन प्रकरणे मिटऊन घेण्यासाठी लवकरात लवकर न्यायालयात विनंती अर्ज सादर करावा, असे आवाहन भारतीय स्टेट बँकेच्या नांदेड क्षेत्रीय कार्यालयाचे मुख्य व्यवस्थापक शंकर येरावार यांनी केले आहे.

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांचे निर्देशानुसार ही लोक अदालत होणार असून यात विशेष म्हणजे यावेळेस ई-लोक अदालतीचेदेखील आयोजन करण्यात आले आहे. त्याद्वारे दूरचित्रसंवाद प्रणालीच्या माध्यमातून प्रकरणे तडजोड करून मिटविण्याची मुभा देण्यात आली आहे.

या लोकअदालतीत धनादेश अनादराची प्रकरणे, बँकेची कर्ज वसुली प्रकरणे, कामगारांचे वाद, विद्युत आणि पाणी देयकाबाबतची प्रकरणे, तडजोड पात्र फौजदारी प्रकरणे, आयकर कायद्यातील फौजदारी स्वरूपातील तडजोडपात्र प्रकरणे, मोटार अपघात नुकसान भरपाई देण्याबाबतची प्रकरणे, वैवाहिक वाद संपादन प्रकरणे व दिवाणी दावे तसेच उपरोक्त नमूद स्वरूपातील दाखल पूर्व प्रकरणे सुनावणी करिता ठेवण्यात येणार आहेत.

ज्या पक्षकारांना वर नमूद प्रकारची प्रकरणे दि. 1 ऑगस्ट रोजी लोकअदालतीत ठेवावयाची आहेत. त्या पक्षकारांनी संबंधित न्यायालयात आपापल्या प्रकरणात विनंती अर्ज लवकर सादर करावा. प्रकरण आपसी सामंजस्याने तात्काळ मिटवावे, असे आवाहन भारतीय स्टेट बँकेच्या नांदेड क्षेत्रिय कार्यालयाचे मुख्य व्यवस्थापक शंकर येरावार यांनी केले आहे. राष्ट्रीय लोक अदालतीचे फायदे : 1) प्रकरणात जमा केलेली संपूर्ण कोर्ट फी परत मिळते. 2) लोकअदालतीतील निवाड्यास कुठल्याही न्यायालयात आव्हान देता येत नाही. 3) आपसी सामंजस्याने वाद मिटल्यामुळे वेळ व पैसा दोन्हींची बचत होते. 4) लोक अदालतीमध्ये पक्षकारांना आपली बाजू स्वतः मांडण्याची संधी मिळते, अशी माहिती या प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी