काळाची आवश्यकता ओळखून राष्ट्र अन् धर्म रक्षणाची शिकवण देणे, हे गुरूंचे आजचे आद्य कर्तव्यच ! - NNL



साधकांना साधना सांगणे, हा जसा गुरूंचा धर्म आहे, तसेच राष्ट्र अन् धर्म यांच्या रक्षणासाठी समाजाला जागृत करणे, हाही गुरूंचा धर्मच आहे. आर्य चाणक्य, समर्थ रामदासस्वामी यांसारख्या गुरूंचा आदर्श आपल्यासमोर आहे. आज आपले राष्ट्र अन् धर्म यांची स्थिती अत्यंत विदारक आणि केविलवाणी झाली आहे. काळाची आवश्यकता ओळखून शिष्यांना आणि समाजाला साधना करत राष्ट्र अन् धर्म यांच्या रक्षणाची शिकवण देणे, हे गुरूंचे आजचे आद्य कर्तव्य आहे. ते कसे, याविषयी प्रस्तुत लेखात दिशादर्शन केले आहे.

ईश्वर आणि गुरु यांचे कार्य एकच !

‘गुरु म्हणजे जणू पृथ्वीवरील चालताबोलता ईश्वरच. भक्तांवर सदैव कृपेचा वर्षाव करणारा ईश्वर संतसज्जनांचे रक्षण अन् धर्मरक्षण यांसाठी असुरांवर शस्त्रांचा वर्षावही करतो. असुरमर्दन अन् धर्मरक्षण करणारे ईश्वराचे हे दुसरे रूप मात्र आपण विसरतो. अंतःकरणातून ईश्वराशी एकरूप झालेले गुरु ईश्वराच्या या क्षात्रकार्यापासून अलिप्त कसे राहू शकतील ?

राष्ट्र अन् धर्म रक्षणाची शिकवण देणार्‍या गुरूंचे कार्य आठवा !

1.आर्य चाणक्य - आर्य चाणक्य यांची तक्षशिला विद्यापिठात ‘आचार्य’ या पदावर नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी केवळ विद्यादानातच धन्यता मानली नाही, तर चंद्रगुप्तासारख्या अनेक शिष्यांना क्षात्र-उपासनेचा महामंत्र देऊन त्यांच्याकरवी परकीय ग्रीकांचे हिंदुस्थानवरील आक्रमण मोडून काढले अन् हिंदुस्थानला एकसंध बनवले.        

2. प्रभु श्रीराम- प्रत्यक्ष प्रभु रामरायाचे दर्शन झालेले समर्थ रामदासस्वामी केवळ रामनामाचाच जप करण्यात रममाण झाले नाहीत, तर समाजाने बलोपासना करण्यासाठी त्यांनी अनेक ठिकाणी मारुतींची स्थापना केली अन् शिवाजी महाराज यांना अनुग्रह देऊन त्यांच्याकडून ‘हिंदवी स्वराज्या’ची स्थापना करवून घेतली.

3. स्वामी वरदानंद भारती आणि महायोगी गुरुदेव काटेस्वामीजी- अलीकडच्या काळात होऊन गेलेले स्वामी वरदानंद भारती आणि महायोगी गुरुदेव काटेस्वामीजी, हेही असेच थोर गुरु होत. धर्म अन् अध्यात्म यांची शिकवण देण्यासह या महान पुरुषांची लेखणी तळपली ती राष्ट्र अन् धर्म यांच्या कर्तव्यांविषयी निद्रिस्त असलेला हिंदू समाज जागृत करण्यासाठी !

असे कितीतरी गुरु आहेत की, ज्यांनी स्वतःच्या आचार-विचारांतून आपल्या शिष्यांना अन् समाजालाही राष्ट्र अन् धर्म रक्षणाच्या पवित्र कार्याचा आदर्श घालून दिला आहे.

सर्वच गुरूंनी राष्ट्र अन् धर्म रक्षणाचे कार्य न करण्याची काही कारणे

1. बहुतांश गुरूंची तारक उपासनाच झालेली असल्यामुळे त्यांची वृत्ती तारक, तसेच सहिष्णु बनलेली असते. अशा गुरूंच्या मनात राष्ट्र अन् धर्म यांच्या रक्षणाचे विचार सहसा येत नाहीत.

2. काही गुरूंना गुरुपदावर बसवतांना त्यांच्या गुरूंनी ज्या शिकवणीचा प्रसार करण्यास सांगितलेला असतो त्यामध्ये राष्ट्र अन् धर्म रक्षणाचा विषयच नसतो; कारण त्या काळी त्याची तेवढी आवश्यकता पडलेली नसते. गुरूंचे आज्ञापालन म्हणून असे गुरु ‘जे त्यांच्या गुरूंनी सांगितले’, त्याचाच प्रसार करतात. त्यापलीकडे जाऊन राष्ट्र अन् धर्म रक्षणाच्या कार्याची आवश्यकता लक्षात घेत नाहीत.

3. काही गुरु हे ‘गुरु’ या पदाच्या योग्यतेचेच नसतात.

4. काही गुरूंना अहं असल्याने राष्ट्र अन् धर्म रक्षणाचे कार्य करणार्‍या संतांकडून शिकण्याची त्यांची वृत्ती नसते.

5. लोकेषणा आणि धनलालसा यांना बळी पडलेले भोंदू गुरु हे प्रबळ आसुरी शक्तींच्या कह्यात (ताब्यात) गेल्याने आसुरी शक्ती त्यांच्या मनात राष्ट्र अन् धर्म रक्षणाचे विचार येऊच देत नाहीत.

राष्ट्र अन् धर्म यांच्यावरील संकटांचा सध्याचा काळ !

प्रतिदिन वर्तमानपत्र वाचणार्‍यांना आजचा काळ कसा आहे, हे वेगळे सांगायला नको.

1. भ्रष्टाचारी राजकीय नेते करत असलेले घोटाळ्यांवर घोटाळे पाहून भारतमाता म्हणत असेल, ‘ब्रिटिशांच्या काळातही मी इतकी लुटली गेली नसेल !’

2. दारिद्र्यरेषेखालील जीवन जगणारी ६५ टक्के भारतीय जनता डोळ्यांत आसवे आणून म्हणत असेल, ‘देवा, आम्हाला पुढच्या जन्मी तरी भारतात जन्म नको रे देऊ !’

3. मूर्तीभंजन आणि मंदिरांचा होणारा विध्वंस पाहून देवता म्हणत असतील, ‘आम्ही हिंदुस्थानात आहोत कि मोगलीस्थानात ?’

केवळ इतकेच नव्हे, तर आतंकवाद्यांची देशावरील आक्रमणे, गोहत्या, धर्मांतर... यांसारख्या संकटांची एक ना असंख्य उदाहरणे देता येतील.

आज गुरूंनी राष्ट्र अन् धर्म रक्षणाची शिकवण का द्यायला हवी ?

1. साधकांना ईश्वरप्राप्तीसाठी साधना सांगणे, हा जसा गुरूंचा संपत्कालातील धर्म आहे, तसेच राष्ट्र अन् धर्म यांच्या रक्षणासाठी समाजाला जागृत करणे, हाही गुरूंचा आपत्कालातील धर्मच आहे.

2. गुरु शिष्याला जन्म-मृत्यूच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी साधना शिकवतात. परंतु जर राष्ट्र अन् धर्म सुरक्षित राहिले नाहीत, तर साधना तरी कशी करता येईल ? यासाठी शिष्यातच नव्हे, तर प्रत्येक देशबांधवामध्ये राष्ट्रीय चारित्र्य आणि धर्मप्रेम निर्माण करणे, हे गुरूंचे कर्तव्यच आहे.

3. मायेत राहून साधना करतांना स्वतःतील देवत्व, अर्थात ब्रह्मत्व जागृत झाल्याने गुरूंना ब्रह्मप्राप्ती होते. स्वतःतील ब्रह्मत्व जागृत ठेवतांनाच ‘दुसर्‍यात ब्रह्मत्व पहायचे’, हा गुरूंच्या साधनेचा पुढचा प्रवास असतो. मग ज्याच्यात ब्रह्मत्व पहायचे त्याच्याविषयी गुरूंना काहीच वाटणार नाही का ? धर्मबांधवांवर अत्याचार होत असल्यास त्यांच्याविषयी गुरूंचे मन कळवळणार नाही का ? राष्ट्र पीडित असल्यास गुरु स्वस्थ जीवन जगू शकतील का ?

थोडक्यात, काळाची आवश्यकता ओळखून राष्ट्र अन् धर्म यांच्या रक्षणासाठी साधना करण्याची शिकवण शिष्यांना आणि समाजाला देणे, हे गुरूंचे आजचे प्रमुख कर्तव्य आहे. राष्ट्र अन् धर्म रक्षण, ही त्यांची, तसेच शिष्य अन् समाज यांचीही काळानुसार आवश्यक अशी साधनाच आहे !

संकलक – श्री.दत्तात्रेय वाघुळदे, संपर्क क्र.:  ९२८४०२७१८०

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘गुरूंचे महत्त्व, प्रकार आणि गुरुमंत्र’


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी