नांदेड| शेती ही निसर्गावर अवलंबून असल्यामुळे शेतक-यांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी खचून न जाता संघर्ष करावा. आत्महत्या करणे हा पर्याय नसून शेतक-यांनी नव्या उमेदीने शेतीकडे लक्ष देणे काळाची गरज आहे. शेतक-यांनी धावणारे पाणी आडवावे व अडवलेले पाणी जमिनीत मुरवून शेती फुलवावी असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर यांनी केले.
कृषी विभाग महाराष्ट्र शासन व जिल्हा परिषद कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने हरित क्रांतीचे प्रणेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात आज गुरुवार दिनांक 1 जुलै रोजी कृषी दिन साजरा करण्यात आला. यावेळी अध्यक्षीय समारोप करतांना त्या बोलत होत्या. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, परिवीक्षाधीन आयएएस अधिकारी आर.एस. कार्तिकेयन, कृषी व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब पाटील रावणगांवकर, समाज कल्याण सभापती अॅड. रामराव नाईक, शिक्षण व आरोग्य सभापती संजय बेळगे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, माजी सभापती माधवराव मिसाळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवशंकर चलवदे, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, जिल्हा परिषद सदस्य रोहिदास जाधव, भीमराव कल्याणे, मारोतराव लोखंडे, प्रा.डॉ. पंडागळे, प्रा.डॉ. देविकांत देशमुख, सचिन घाडगे आदींची उपस्थिती होती.
पुढे त्या म्हणाल्या, खरीप हंगामाच्या नियोजनासाठी जिल्हयाचे पालकमंत्री महोदय यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांची बैठक घेऊन नियोजन करण्यात आले आहे. पिक कर्ज, पिक विमा आदींसाठी कृषी विभागाच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत. जिल्हयातील शेतक-यांना खताची कमतरता पडणार नाही यासाठी प्रशासन सज्ज आहे. कोराना कालावधीत अनेक जण वर्क फ्रॉम होम केले. परंतु शेतकऱ्यांना असा पर्याय नव्हता. त्यांना प्रत्यक्ष शेतात जाऊनच या काळात काम करावे लागले. त्यामुळे आपल्याला वेळेवर अन्न मिळाले आहे. आज अनेक शेतकऱ्यांनी उत्कृष्ट पिके घेऊन, नावीन्यपूर्ण शेती केल्यामुळेच त्यांना आज पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे.
यात महिला शेतकरी देखील मागे नाहीत याचा मला सार्थ अभिमान वाटतो, असेही त्या म्हणाल्या. अशाच पद्धतीने इतर शेतकऱ्यांनी देखील शेती करुन उत्पादनात वाढ करण्याचे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर यांनी केले. प्रारंभी स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी सर्व उपस्थितांचा वृक्ष देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी राज्य शासनाच्या कृषि विभागाच्या वतीने देण्यात येणा-या विविध पुरस्कारांनी 49 शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
बळीराजाच्या पाठीशी प्रशासन - वर्षा ठाकूर-घुगे
कृषी क्षेत्राच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास अवलंबून असतो. शेतकरी हा देशाचा पोशिंदा असून बळीराजाच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रशासन बळीराजाच्या पाठीशी आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले. पारंपरिक शेतीबरोबरच शेतक-यांनी नव तंत्रज्ञानाची जोड द्यावी. नव-नवे प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन त्याची दखल घेतली जाणार आहे. पुरस्कार प्राप्त शेतकरी हे इतरांसाठी प्रेरणादायी ठरणार आहेत. या वर्षात जिल्हयातील शेतकऱ्यांनी विक्रमी उत्पादन घेण्यासाठी प्रयत्न करावेत. आपला उत्पादित माल विकण्यासाठी ई-तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, असेही त्या म्हणाल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर यांनी केले. याप्रसंगी समाज कल्याण सभापती रामराव नाईक, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ शरद कुलकर्णी, प्रा. डॉ. पंडागळे, प्रा. डॉ. देवीकांत देशमुख, सचिन घाडगे, आदींची भाषणे झाली. यावेळी पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राम कवडे तर उपस्थितांचे आभार गजानन हुड्डेकर यांनी मानले. यावेळी कृषी विभागातील कृषी अधिकारी यांना त्यांच्या कामकाजासाठी लॅपटॉपचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी कार्यालयाच्या वतीने शेतक-यांसाठी काढण्यात आलेल्या भित्तीपत्रकाचे विमोचन व दैनिक पुढारीने काढलेल्या कृषि विशेष पुरवणीचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. या कार्यक्रमाला अधिकारी, कर्मचारी, जिल्हयातील शेतकरी यांनी उपस्थिती होती.
जिल्हा परिषदेच्या कृषि विभागाच्या वतीने विविध योजना राबविल्या जातात.
आत्महत्याग्रस्त 110 शेतक-यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दहा हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात आले आहे. जिल्हा परिषद सेस निधीमधूनही शेतक-यांना विविध कृषि अवजारे देण्यात आली आहेत. शेतक-यांच्या उन्नतीसाठी कृषि विभाग तत्पर राहील असे मत कृषी व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब पाटील रावणगांवकर यांनी केले.
डॉक्टर डे निमित्त डॉक्टरांचा सन्मान
1 जुलै हा दिवस राष्ट्रीय डॉक्टर डे म्हणून साजरा करण्यात येतो. याचे औचित्य साधून जिल्हा परिषद सभागृहात प्रातिनिधीक स्वरुपात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बालाजी शिंदे, डॉ.शिवशक्ती पवार, डॉ.अनिल रुईकर, डॉ.प्रविण मुंडे आदींचा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे व पदाधिका-यांच्या हस्ते पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.