महाराष्ट्र समाज संघटनेने केली निवेदनाद्वारे मंत्र्याकडे मागणी
नांदेड/हदगाव| महाराष्ट्रामध्ये सर्वात अल्पसंख्य प्रमाणात असलेल्या दासरी, माला दासरी, होल्या दासरी आयावारू या समाजाकडे शासनाचे मागील अनेक वर्षांपासून अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. विविध जातीच्या नावाने हि नोंद असून हा सर्व समाज एकच असल्याने सर्वाना एकाच प्रवर्गामध्ये सामील करून न्याय द्यावा अशी मागणी दासरी - माला दासरी समाज संघटनेने हदगाव येथे आलेले जलसंपदा मंत्री जयंत पाटील व सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे.
दासरी, माला दासरी, होल्या दासरी आयावारू हा समाज विविध जातीच्या नावाने नोंद असून, तो एकच आहे आणि यांचा रोटी-बेटीचा व्यवहार अनादिकालापासून सुरु आहे. हा समाज नांदेड, यवतमाळ, परभणी, हिंगोली अशा महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये स्वातंत्र्याच्या अगोदर पासून वास्तव्यास आहे. हा समाज अल्पसंख्यांक म्हणजे केवळ दोन ते तीन हजार एवढ्या संख्येचा असून, त्यांच्यापर्यंत कोणतीही शासकीय सवलत अध्याप पोहोचली नाही. तसेच शेती नोकरी उद्योगासाठी भांडवल कोणाकडे नाही. पूर्वी हा समाज कुंकू, करदोडे, हळद इत्यादी विकून आपला उदरनिर्वाह करत होता. परंतु काळाच्या ओघात तेही उद्योग बंद पडले. दुसरा व्यवसाय करण्यासाठी कोणाकडे भांडवल उपलब्ध नाही. या समाजाला कोणतीही शासकीय सवलती, जात प्रमाणपत्राच्या अभावी मिळत नाही.
शासनाच्या गॅझेटमध्ये 40 नंबरला मालादासरी ही जात आहे, तरीपण जातीचे प्रमाणपत्र काहींना मिळाले तर काहींना अजूनही मिळाले नाही. तहसील द्वारे प्रमाणपत्रे मिळण्यासाठी मोठ्या अडचणीत येत आहेत. शासनाकडे वेळोवेळी निवेदन देऊन जातीच्या प्रमाणपत्राची वैधता ही होत नाही. कारण असे कि समाजाकडे इसवीसन 1950 च्या पूर्वीचा कुठलाही शासकीय पुरावा किंवा अन्य पुरावे अथवा शेती नसल्याने उपलब्ध होत नाहीत. कुठं उपलब्ध असली तरी त्याला ग्राह्य धरले जात नाही. हा समाज व्यापाराच्या निमित्ताने खेडोपाडी वाडी तांड्यावर पूर्वी भटकंती करीत होता. त्यामुळे पुरावे उपलब्ध नसल्याने जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यास अडचणी निर्माण होत आहेत.
पालकांच्या अज्ञानामुळे त्यांनी आपल्या पाल्याचे टी सी वर कोणी दासरी, माला दासरी, होल्या दासरी, आय्यावारू, अशा विविध जातीचा उल्लेख केलेला आहे. त्यामुळे त्यामुळे आजघडीला जात प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अडचणी येत असल्याचे दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे. सर्वात अल्पसंख्येने असलेल्या या समाजातील विद्यार्थ्यांना कुठल्याही शासकीय योजना, सवलत इत्यादी मिळत नाही. समाज गरीब असल्यामुळे शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. आमच्या या वंचित समाजाकडे लक्ष देऊन खालील मागण्या पूर्ण करून न्याय द्यावा अशी मागणी समाज बांधवांनी केली आहे.
या निवेदनामध्ये समाजातील विद्यार्थ्यांच्या टीसी वर चुकून पडलेली जात असे की दासरी मालदासरी, होल्या दासरी, आय्यावारू या सर्व जाती वेगवेगळ्या नसून एकच आहेत. हे गृहीत धरून फक्त माला दासरी हि मुख्य जात समजून सर्वांना माला दासरी हे प्रमाणपत्र विनाअट देण्यात यावे आणि जात प्रमाणपत्राची वैधता व्हावी. समाजातील गोरगरीब कुटुंबांना घरकुल शौचालय उद्योगासाठी भांडवल कर्ज उपलब्ध करून द्यावे. विद्यार्थ्यांना फी सवलत व शासकीय योजनेचा लाभ घ्यावा तसेच समाजातील गोरगरीब महिला पुरुषांना रोजगार उपलब्ध करून द्यावे. सुशिक्षित बेरोजगार तरुणांना उद्योगासाठी कर्ज व रोजगार भत्ता द्यावा. शासनाच्या नवीन गॅझेटमध्ये दासरी हे नाव लुप्त झाल्यामुळे त्या जागी (दासरे) हे चुकीचे पद्धतीने नाव नोंदविण्यात आले आहे. त्या ठिकाणी फक्त माला दासरी हेच नाव दुरुस्त करून टाकावे यासह अनेक मागण्या करण्यात आल्या आहेत.
मंत्री महोदयांना देण्यात आलेल्या या निवेदनावर दासरी - माला दासरी समाज संघटन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष मुरारी दमना यंगलवार, उपाध्यक्ष बी.व्ही.सादूलवार, कोषाध्यक्ष बी.एन.चेपुरवार, मार्गदर्शक सुरेश यंगलवार, यवतमाळचे जिल्हाध्यक्ष विनोद बोम्पीलवार, सचिव गजानन पोराजवार, सदस्य गोविंद चेपुरवार, चंद्रशेखर चेपुरवार, मारोतराव चेपूरवार, संजय यंगलवार दत्तात्रेय यंगलवार, राजू यंगलवार, प्रा.पांडुरंग सादूलवार, डॉ. सचिन सादुलवार, एन.व्ही.सादूलवार, हरी चेपुरवार, आदींसह अनेक समाज बांधवांच्या स्वाक्षर्या आहेत.