नांदेड| भाजपाने सत्तेच्या काळात चुकीचे कायदे केले त्यामुळे मराठा समाजाचे आरक्षण पुढे सर्वोच्च न्यायालयात टिकू शकले नाही, मराठा समाजाचे आरक्षण असो अन्य प्रश्न असो यासंदर्भात सामान्य नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करून देऊन महाविकास आघाडीच्या विरोधात वातावरण तयार करण्याचा काम भाजपाकडून करण्यात येत आहे. परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे मराठा आरक्षण किंवा ओबीसीचा प्रश्न असेल ही सर्व प्रकरणे आता केंद्राकडे गेली आहेत. त्यामुळे भाजपाच्या भूलथापांना बळी पडू नका, असे सांगतानाच देगलूर - बिलोली मतदारसंघात आ. कै. रावसाहेब अंतापूरकर यांचे काम मोठे असून काँग्रेसला बदनाम करणार्या लबाडांना थारा देऊ नका असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केले आहे.
बिलोली तालुक्यातील 42 कोटींच्या विविध विकास कामांचा लोकार्पण व भूमीपूजन सोहळा तसेच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यास ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. बिलोली तालुक्यातील लोहगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण, बेळकोणी रस्त्याचे भूमिपूजन, सावळी येथील श्री सिद्धेश्वर मंदिर रस्त्याचे भूमिपूजन, बिलोली नगर पालिका इमारतीचे लोकार्पण या ठिकाणच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते झाले. त्यासोबतच आगामी विधानसभा पोट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिलोली, पाचपिंपळी व सगरोळी या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्यात आल्या.
यावेळी विधान परिषद प्रतोद आ.अमरनाथ राजूरकर, माजी पालकमंत्री डी.पी.सावंत, माजी मंत्री रमेश बागवे, अ.भा. काँग्रेस कमिटीचे चिटणीस पृथ्वीराज साठे, आ. मोहनअण्णा हंबर्डे, आ. माधवराव पाटील जवळगावकर, जि.प. अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष, माजी आ. वसंतराव चव्हाण, माजी आ. हनमंत पाटील बेटमोगरेकर, मारोतराव कवळे, जि.प.चे शिक्षण व बांधकाम सभापती संजय बेळगे, समाजकल्याण सभापती अॅड. रामराव नाईक, बिलोलीच्या नगराध्यक्षा सौ.मैथिली कुलकर्णी, देगलूरचे नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार, तालुकाध्यक्ष शिवाजी पाटील पाचपिंपळीकर, प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस जितेश अंतापूरकर, माजी महापौर अब्दुल सत्तार, उपमहापौर मसूद खान, अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष शमीम अब्दुल्ला, माजी सभापती किशोर स्वामी, प्रदेश सरचिटणीस केदार पाटील साळूंके, माजी नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.
ते पुढे म्हणाले की, देगलूर - बिलोली विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. येथील जनतेनी कै. रावसाहेब अंतापूरकर यांना मोठ्या मतांनी निवडून दिले होते. परंतु जनतेची सेवा करताना त्यांना कोरोनासारखा गंभीर आजार झाला. त्यातून ते बरेही झाले. दुर्देवाने पोस्ट कोवीडमध्ये त्यांचे निधन झाले. हा सर्वांसाठीच मोठा धक्का होता. त्यांनी विकास कामास सुरुवात केली होती. त्यांचे उरलेले स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी पालकमंत्री या नात्याने माझी असणार आहे.
महाविकास आघाडीच्या धर्मानुसार ही जागा काँग्रेस पक्षाचीच आहे. त्यामुळे या संदर्भात कोणीही संभ्रम निर्माण करण्याची गरज नाही, कांहीजण या मतदारसंघात मी 10-20 वेळेस आलो असे सांगत आहेत. पण त्यांनी इतक्यांदा येऊन नेमके काय दिवे लावले, ते एकदा सांगावे. विकासाचा कोणता निधी आणला. त्यांच्या येण्याने मतदारसंघाचे काय भले झाले असा प्रश्न विचारतानाच लबाडांच्या बोलण्याला बळी पडू नका, अशा लबाडांना गावाच्या बाहेरच रोखा, असे ते म्हणाले.
मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला आहे. त्यामुळे यामध्ये राज्य सरकार आता कांहीच करू शकत नाही. या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व मी स्वतः पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. हा प्रश्न आता केंद्र सरकार सोडवू शकते, हे माहीत असताना सुद्धा सामान्य माणसांना मात्र चुकीची माहिती सांगून त्यांचे डोके खराब करण्याचे काम भाजपाकडून केल्या जात आहे. जसा मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे तसाच ओबीसीचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण आणि मागासवर्गीयांच्या पदोन्नतीसंदर्भातील आरक्षण हा विषयात सुद्धा न्यायालयाच्या निकालामुळे केंद्रानेच लक्ष घालावे लागेल.
यावेळी बोलताना आ. अमरनाथ राजूरकर म्हणाले की, काँग्रेस पक्षासह महाविकास आघाडीच्या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची मोठी फळी ही पोट निवडणूक जिंकून देण्यासाठी कामास लागली आहे. सुभाष साबणे हे शिवसेनेचे आमदार होते. त्यांना शिवसेनेने भरपूर काही दिले आहे. त्यामुळे त्यांनी महाविकास आघाडीचा धर्म पाळून काँग्रेस उमेदवाराचा मनातून प्रचार करावा, अशी आमची विनंती आहे. परंतु शेवटी निर्णय त्यांनी घ्यावयाचा आहे.
यावेळी बोलताना माजी आमदार व जिल्हा बँकेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण म्हणाले की, पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याच्या विकासाचा रथ वेगात चालू आहे. देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीत त्याची फलश्रुती म्हणून काँग्रेस पक्षाला घवघवीत यश मिळेल, असे विश्वास व्यक्त करतानाच देगलूरची जागा जिंकून कै.अंतापूरकर यांनी खरा अर्थाने श्रद्धांजली वाहण्यात यावी. विविध ठिकाणी झालेल्या बैठकांमध्ये जि.प.चे बांधकाम व शिक्षण सभापती संजय बेळगे, तालुकाध्यक्ष शिवाजी पाटील पाचपिंपळीकर, मारोतराव पटाईत, यादवराव तुडमे यांची समयोचित भाषणे झाली. विविध ठिकाणी झालेल्या कार्यक्रमांचे सूत्रसंचलन दिलीप पाटील पांढरे व भीमराव जेठे यांनी केले.