नांदेड| संस्कार भारती नांदेडच्या वतीने झुम व फेसबुक लाईव्हवर आभासी पध्दतीने ज्येष्ठ फिजीशीयन, हदयरोग व मधुमेह तज्ञ डॉ. अरुण मान्नीकर यांचे रविवार ६ जून २०२१ रोजी अभ्यासपूर्ण व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. हा कार्यक्रम नांदेड समिती अध्यक्ष दि.मा.देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली व संरक्षक प्रा. डॉ. दिपक कासराळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रांत महामंत्री सुधीर कुलकर्णी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
कोरोना म्हणजे काय? त्याचा प्रसार कसा होतो यावर डॉ. मान्नीकर यांनी सविस्तर विवेचन केले. कोरोनाचे विषाणू शरीरात नाक, तोंड व डोळ्याच्या माध्यमातून प्रवेश करतात. त्यामुळे या प्रवेशद्वारांची योग्य पध्दतीने काळजी घेऊन कोरोनास प्रतिबंध करण्यासाठी योग्य मास्क वापरणे, सतत हात धुणे, घरात हवा खेळती ठेवणे, सार्वजनिक वावरात योग्य अंतर ठेवणे याची अंमलबजावणी करून सतत काळजी घ्यावी, असे आवाहन केले.
स्वतःला व परिवारातील सर्वांना सुरक्षीत ठेवायचे असेल तर कोरोनाची प्राथमिक लक्षणे जाणवल्यास न घाबरता टेस्ट करणे, रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार घ्यावेत. ऑक्सीजन पातळी, शरीराचे तापमान योग्य पध्दतीने सतत तपासावे.शंका आल्यास वयस्कर व्यक्ती, तसेच ज्यांना मधुमेह, रक्तदाब, हृदय रोग, मूत्रपिंड विकार असतील तर इस्पितळात दाखल होऊन उपचार घेण्याचा सल्ला त्यांनी दिला. सध्याच्या काळात कोरोना प्रतिबंधासाठी जी लस मिळेल ती घ्यावी त्यामुळे कोरोना झाला तरी त्याची गंभीरता कमी होऊन माणसाच्या जीवाला धोका होत नाही हे सिध्द झाले आहे असे नमुद केले.
आपले आयुष्य खुप महत्वाचे आहे आणि कोरोनाचे नियम पाळूनच आपण मात करू शकतो, असा विश्वासही दिला. काळजी घ्या पण काळजी करू नका असा संदेश डॉ. मान्नीकर यांनी दिला. कार्यक्रमाच्या आरंभी संस्कार भारती ध्येयगीत कु. नेहा राजीव देशपांडे यांनी सुरेल आवाजात सादर केले. प्रास्ताविक व निवेदन सौ. अंजली जगदीश देशमुख यांनी केले. डॉक्टरांचा परिचय जयंत वाकोडकर यांनी करुन दिला. प्रमुख पाहुणे संस्कार भारती देवगिरी प्रांत महामंत्री सुधीर कुलकर्णी यांनी प्रसंगाशी सुसंगत काव्यवाचन करून शुभेच्छा दिल्या. शेवटी विश्वास अंबेकर यांनी आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपक्रम प्रमुख डॉ. जगदीश देशमुख, सौ. शर्वरी सकळकळे तसेच अभय शृंगारपुरे, डॉ. प्रमोद देशपांडे व राजीव देशपांडे यांचेसह संस्कार भारती नांदेड समिती सदस्यांनी परिश्रम घेतले होते. या कार्यक्रमाला संपूर्ण महाराष्ट्रातुन उत्तम प्रतिसाद मिळाला.