सहाय्यक पोलीस निरीक्षक नामदेव मद्दे यांची धडक कारवाई
माहूर| महाराष्ट्र राज्यात गुटखा बंदी असतांना तीर्थक्षेत्र माहूर शहरात खुलेआम गुटख्याचा साठा करून चोरट्या मार्गाने विक्री होत आहे. हि बाब हेरून माहूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नामदेव मद्दे यानि दि १५ रोजी १:०० वाजेच्या सुमारास अवैध गुटखा साठ्यावर छटा टाकून २ लाख रुपयाचा गुटखा साठा जप्त केला आहे. हि कारवाई स.पो.नि.नामदेव मद्दे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पथकाने केल्यामुळे अवैद्य धंदे चालकाच्या खळबळ उडाली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार माहूर शहराच्या प्रवेशव्दार जवळ असलेल्या विक्की धाब्यावर मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा करून ठेवल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून दि.१५ जूनच्या मध्यरात्रीनंतर १ वाजेच्या सुमारास स.पो.नि. नामदेव मद्दे यांनी त्यांचे सहकारी लेखनिक पो.कॉ. साहेबराव सगरोळीकर, पो.कॉ.सुशील राठोड, पो.कॉ.ज्ञानेश्वर वेलदोडे याना घेऊन छापा टाकला. यावेळी धाब्याची झाडाझडती घेतली असता विजय कबीरदास कांबळे वय-४९ हा इसम त्या ठिकाणी ४ नायलॉन पोत्यामध्ये प्रीमियम नजर कंपनीचा प्रतिबंधित गुटखा अंदाजित किंमत १ लाख ६८ हजार रु., ४ नायलॉन पोत्यामध्ये एन-५० प्रीमियम जाफरानी टोबॅको प्रतिबंधित गुटखा अंदाजित किंमत ३२ हजार रु., असा एकूण २ लक्ष रुपये किमतीचा गुटखा साठा अवैद्य विक्री करण्याच्या उद्धेशाने विक्की धाब्यावर आढळून आला.
यावरून स.पो.नि मद्दे यांचे लेखनिक पो.कॉ.साहेबराव जमनाजी सागरोळीकर यांनी सरकार तर्फे माहूर पोलीस स्टेशनमध्ये सादर केलेल्या फिर्यादीनुसार विजय कबीरदास कांबळे वय-४९ विरुद्ध स्टे.डा. क्र.४/२०२१ वर गु.र.न.६०/२०२१ कलम ३२८,२७२,२७३ भा.दं.वी व अन्न सुरक्षा मानके कायदा २००६ चे कलम २६(२)(६),२७,२३,३०(२),(ए),५९(६) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास स.पो.नि. नामदेव मद्दे यांच्या मार्गदर्शनाखाली माहूर पोलीस करीत आहेत.
माहूर पोलिसाची गुटखा विरोधी पहिली मोठी कारवाई स.पो.नि मद्दे यांच्या कालावधीत झाल्याने अवैध व्यवसायिकांचे धाबे दणाणले असून कायदा व सुव्यस्थाप्रेमी नागरीकातून या धडक कारवाईचे कौतुक होत आहे. असे असले तरी गुटखा साठा करून सापडलेला विजय कांबळे हा मोहरा असून त्याच्या मागील गुटखा किंग पर्यंत पोलिसांनी पोहचणे आवश्यक असून सदर गुन्ह्यात कलम 34 चा समावेश करून बडे मासे गळाला लागल्याशिवाय अवैध गुटखा तस्करीला आळा बसणार नसल्याचे बोलल्या जात आहे.