३० वरून १०० खाटांच्या मान्यतेस मंजुरी
उमरखेड| हिंगोली लोकसभा मतदार संघातील उमरखेड येथील कुटीर रुग्णलयाचे उपजिल्हा रुग्णालय करण्यास खासदार हेमंत पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मंजूरी मिळाली आहे .तसेच खाटांची क्षमता सुद्धा ३० वरून १०० करण्यात आली आहे. एक महिन्यापूर्वी खासदार हेमंत पाटील यांनी उमरखेड येथे कोविड सेंटरच्या उदघाटन प्रसंगी उपजिल्हा रुग्णालयासाठी पाठपुरावा सुरु असल्याचे सूतोवाच केले होते.सोबतच येथील रुग्णालयात पदे भरण्यास सुद्धा मंजूरी आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे .
मतदार संघातील उमरखेड तालुक्याचा आवाका पाहता २०१३ मध्ये शासन निर्णयानुसार ३० खाटांचे कुटीर रुग्णालय स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली होती. ८ वर्षाच्या कालावधीनंतर तालुक्यातील वाढती लोकसंख्या आणि आरोग्य यंत्रणेवर पडणारा ताण यामुळे कुटीर रुग्णालयाची यंत्रणा पुरेशी होत नव्हती, यामुळेच उमरखेड तसेच महागाव तालुक्याची गरज लक्षात घेऊन खासदार हेमंत पाटील यांनी कुटीर रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर करण्यासंदर्भात पाठपुरावा सुरु केला होता. त्याकरिता शासन स्तरावर पत्रव्यवहार सुद्धा करण्यात आला होता. नुकतेच मे महिन्यात झालेल्या उमरखेड येथील एका कार्यक्रमात खासदार हेमंत पाटील यांनी याबाबत सूतोवाच करून सांगितले होते कि, येथील उपजिल्हा रुग्णालयाचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे आणि अवघ्या एक महिन्याच्या आत या कामास मंजूरी मिळाली आहे.
हिंगोली जिल्हा आणि मतदारसंघातील आरोग्य यंत्रणा सक्षम राहावी सर्व सामान्य जनतेला आरोग्याच्या मूलभूत गरजा पूर्ण व्हाव्यात, वेळेत उपचार मिळावेत याकरिता खासदार हेमंत पाटील सदैव दक्ष असून कोरोनाच्या काळात कोरोनाग्रस्तांना तात्काळ उपचार, ऑक्सिजन बेड , प्रतिबंधात्मक लस, ऑक्सिजन पुरवठा आरक्षित करून ठेवला होता . तसेच ज्या ठिकाणी मनुष्यबळाची कमतरता आहे. त्याठिकाणी मनुष्यबळ भरतीबाबत शासनाकडे पाठपुरावा सुद्धा केला होता. त्याच अनुषंगाने उमरखेड येथील उपजिल्हा रुग्णालयास मंजूरी आणि मनुष्यबळ भरती करण्यास मंजूरी देण्यात आले आहे. यामुळे उमरखेड सह महागाव, पुसद, तालुक्यांना याचा लाभ होणार आहे .