हिमायतनगर| पैनगंगा नदीकाठावरील रेतीधक्यावरून राजकीय वरदहस्त असलेल्या वाळू माफियांकडून रेतीची उपास करून साठेबाजी व चढ्या दराने विक्री होत आहे. याबाबत कट्टर शिवसैनिक रामभाऊ गुंडेकर यांनी दिलेल्या तक्रारीनंतर उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांनी तहसील प्रशासनाला रेतीसाठे जपत करण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर नदीकाठावरील अनेक धक्क्यावरून साठेजप्तीची कार्यवाही झाली. मात्र अनेक साठे जप्तीपासून दूर ठेऊन प्रशासनातील काही अधिकारी कर्मचाऱ्यांनी वाळूदादाना दुसरा रस्ता उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे जप्तीच्या साठ्यासह इतर जप्तीपासून वंचित राहिलेल्या हजारो ब्रास रेतीच्या साठ्यातून आणि पैनगंगा नदीच्या पात्रातून आता रात्रीला रेतीचे उत्खनन करून विक्री केली जात आहे. हिमायतनगर तालुक्यात सुरु असलेल्या या वाळूच्या गोरखधंद्याकडे जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांनी स्वतः लक्ष देऊन नांदेडच्या धर्तीवर हिमायतनगर नदीकाठावरील अवैद्य रेती साठे जप्त करून विनापवाहतूक करणाऱ्या वाहनांच्या चालक--मालक आणि प्रशासनातील भ्रष्ट अधिकारी - कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करावी अशी मागणी पर्यावरण प्रेमी नागरीकातून केली जात आहे.
विदर्भ - मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीकाठावर असेलेल्या दिघी, कोठा, रेणापूर, घारापुर, वारंगटाकळी, धानोरा, बोरगाडी तांडा, एकंबा, पळसपूर आदी ठिकाणाच्या रेती धक्क्यावरून अनधिकृतपणे उत्खनन करून शासनाला चुना लावण्याच्या प्रकार स्थानिक महसूल प्रशासनाच्या संगनमताने सुरु आहे. असे असताना गेल्या अनेक वर्षपासून येथे तहान मांडून बसलेले नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी यांची चांगलीच मैत्री या वाळूमाफियांसोबत झालेली आहे. याचाच गैरफायदा घेत आपला महिन्याचा हप्ता ठरून घेऊन रस्ते, इमारतीचे बांधकाम करणाऱ्यांना जाडा दराने विक्री करण्याच्या उद्देशाने अवैद्यरित्या मुरूम, रेती, दगड आदीं गौण खनिज उत्खननाला शासनाच्या गौण खनिज अधियमास बगल देऊन खुलेआम छुट दिली आहे. त्यामुळे गौण खनिजाची चोरी करणारे माफिया जेसीबी, टेम्पो, ट्रैक्टर आणि ट्रकच्या साहाय्याने दिवसरात्र गौण खनिजाचे उत्खनन करून कोणताही परवाना आणि लिलाव झालेला नसताना वाहतूक करत आहेत.
त्यामध्ये नदीकाठावरील दिघी, कोठा, धानोरा, वारंगटाकळी, पळसपूर या ठिकाणाहून सर्वाधिक रेतीचा बेकायदा उपसा करून चालक मालकाने वाहतूक आणि साठेबाजीचा गोरखधंदा चालविला आहे. हे सर्व गौण खनिज माफिया जास्तीत जास्त राजकीय नेत्यांचे कार्यकर्ते असल्याने मागील तीन ते पाच महिन्यात लाखो ब्रास रेतीचा बेकायदेशीर उपसा करून शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारून जनतेच्या डोळ्यात धूळफेक करत आहेत. या सर्व रेती घाटाची एटीएस मशीनद्वारे चौकशी करावी, दिघी रेती घाटातून दि. १३,१४, १५ रोजी मध्यरात्रीला दिघी येथून निघालेली पळसपूर चौक ते रुख्मिणी नगर दरम्यानच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून वाहनाचे चालक - मालक यांच्यावर फौजदारी कार्यवाही करावी, ईटीएस मशीन मोजणींनंतर येणारी महसुलाची रक्कम संबंधित मंडळ अधिकारी तलाठी यांचे मिळकतीतून कपात करण्यात यावी, तक्रारीनंतर अल्प साठ्यावर कार्यवाही करून बहूतांश साठे माफियांना मोकळे सोडले याचा अहवाल देण्यात यावा, शासन नियम १९६६ चे कलम ४८(७) चा भंग करत रेती चोरी करणार्यांना अभय देत स्वार्थ साधणाऱ्याची चौकशी करून त्यांना बडतर्फ करावे. अशी मागणी तक्रारकर्ते तथा कट्टर शिवसैनिक रामराव गुंडेकर सरसमकर ता.हिमायतनगर यांनी एका निवेदनाद्वारे केली होती.
या निवेदनाची दाखल घेऊन कर्तव्यदक्ष उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांनी दिघीसह पैनगंगा नदीकाठावरील इतर रेतीघाटाच्या ठिकाणी रेती माफियांनी केलेल्या रेतीच्या साठ्यावर जप्तीची कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे दिघी, धानोरा, बोरगाडी आदी भागातील रेती साठे तहसीलदार, नायब तहसीलदार आणि त्या त्या भागाचे मंडळ अधिकारी, तलाठी, यांनी जप्त केले. मात्र याठिकाणी किती रेतीसाठे जप्त केले याची माहिती तक्र्राकर्त्यास न देता रेती माफियांना अभय देण्यासाठी मोजक्याच साठ्यावर जप्तीची कार्यवाही करून मोठ्या प्रमाणात रेती साठी हलविण्याची एक प्रकारे मुभाच दिली आहे. त्यामुळे दिघी, धानोरा, बोरगडी येथे जप्त करण्यात आलेल्या रेती साठ्यात मोठ्या प्रमाणात हेराफेरी होऊन संबंधित अधिकारी आपला स्वार्थ साधत असल्याची चर्चा वाळू माफ़ियातीच्या गोटातील काही जणांची नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे.
त्यामुळे नुकतेच जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांनी रेतीसंबंधी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक महसूल अधिकारी- कर्मचारी नदीकाठावरील, गावाशेजारील आणि बांधकामाच्या ठिकाणी करण्यात आलेल्या रेतीच्या साठे तपासून दिलेल्या आदेशाचे पालन करून महसूल वाढविण्यात पुढाकार घेतील का..? हे पाहावे लागणार आहे.