नांदेड/माहूर| तालुक्यातील माहूर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या विष्णू मुटकुळे या पोलीस हवालदाराने रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कार्यवाही न करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी माहूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नांदेड जिल्ह्यात वाळू माफियांनी हैदोस घातला आहे. उत्खनन आणि साठेबाजी किनाऱ्यावर कारवाई करा असे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दिलेले असताना स्थानिक पोलिस मात्र माफियांना साथ देऊन मोकाट सोडून देत आहेत. असा प्रकार मंगळवार दि.०१ जून रोजी माहूर येथे घडला. माहूर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस हवालदार विष्णू उत्तमराव मुटकुळे याच्याकडे वाळू जप्त केलेले ट्रॅक्टरचा तपास होता. या ट्रॅक्टर मालक व त्याच्या सहकार्यावर कारवाई न करण्यासाठी १० हजार रुपयाची लाच त्याने मागितली होती.
लाच देण्याची इछा नसल्याने तक्रारदार याने दि. १७ मे रोजी नांदेड येथे लाचलुचपात प्रतिबंधक विभागाकडे हवालदार विष्णु मुटकुळेविरुद्ध तक्रार दिली होती. लाचलुचपत प्रतिबंध विभागाने याची पडताळणी करून सापळा लावला. आज हा सापळ्यात १० हजाराची लाच हवालदाराने मागितली. हे निष्पन्न झाल्यानंतर त्याच्यावर माहूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत पोलिस अधीक्षक कल्पना बारवकर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक विजय डोंगरे व त्यांच्या सहकार्यांनी सहभाग घेतला होता.