हिमायतनगर नगरपंचायतीचा कारभार रामभरोसे..? पाणी टंचाई, अस्वच्छतेचा करावं लागतो सामना - NNL

स्वच्छतेचा उडाला बोजवारा, पावसाळ्यापूर्वीच साथरोग वाढण्याची शक्यता 


हिमायतनगर|
येथील नगरपंचायतीवर प्रशासक लागल्यापासून नगरपंचायतीचा कारभार ढेपाळला आहे. नगरपंचायतीत कार्यरत प्रशासक, प्रभारी मुख्याधिकारी यांच्यासह अनेक विभागाचे अधिकारी - कर्मचारी शहरातून अपडाऊन करून कारभार पाहत असल्याने नागरिकांना पाणी टंचाई, अस्वच्छता, दुर्गंधीसह अनेक नागरी समस्यांचा सामना करावा लागत आहे. यामुळं नगरपंचायतीला कोणी वाली आहे का..? असा प्रश्न नागरीकातून विचारला जात आहे.

हिमायतनगर नागरपंचायतीला ५ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होऊन ४ महिने लोटले आहेत. कोरोना महामारीमुळे नगरपंचायत निवडणुकीचा पर्वकाळ लांबणीवर पडलेला आहे. त्यामुळे येथील नगरपंचायतीचा कारभार सुरळीत चालून शहरातील नगरिकांच्या समस्या सुटाव्यात आणि होणारी होरपळ थांबावी यासाठी नागरपंचायतीवर प्रशासक म्हणून उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर मुख्यधिकारी पदाचा पदभार येथील तहसीलदार डी.एन.गायकवाड यांच्याकडे देण्यात आला आहे. नियुक्तीनंतर सत्कार घेतल्यापासून वरील अधिकारी १५ - १५ दिवस नागरपंचायतीला भेट देत नसल्याने सर्व काही आलबेल सुरु आहे. यामुळे शहरातील नागरिकांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून, नगरपंचायतीने नेमून दिलेल्या विहिरीत पाणी टाकणारे टैन्कर ४ - ४ दिवस येत नसल्याने प्रभागातील नागरिकांवर भटकन्ती करण्याची वेळ आली आहे. 


एवढेच नाहीतर कोरोनामुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने नियमांचे पालन करून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र शहरात संचारबंदीच्या नियमनाचे पालन होताना दिसून येत नाही. नागरपंचायतीवर नियुक्त केलेले अधिकारीच कार्यालयात येत नसतील तर बांधकाम, लेखाविभाग, स्वच्छता, पाणी पुरवठा आदींच्या संबंधितांची आठवड्यातून १ ते २ दिवस सोडले तर इतर दिवशी दांडी मारण्याचा प्रकार सुरु झाला आहे. त्यामुळे शहरात पावसाळ्यापूर्वी स्वच्छतेचे तीनतेरा वाजले आहेत. स्वच्छतेचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराकडून शहर सफाई तर सोडाच पवळ्यागोदर शहरावून घाण पाणी जाणाऱ्या एकही मोठ्या नाल्याची सफाई झाली नाही. त्यामुळे नाल्यामध्ये माणसाएवढी झाडे झुडपी वाढली असून, मोठ्या प्रमाणात गाळ साचून आहे यामुळे डासांची उत्पत्ती वाढली आहे. एवढेच नाहीतर रस्त्याच्या कडेलाच मृत जनावरे टाकली जात असल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी सुटत आहे. परिणामी पावसाळ्यात साथीचे आजार होण्यापूर्वी अगोदरच शहरात साथरोगाचे थैमान माजते कि काय..? अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत.

याच बरोबर नगरपंचायत कार्यालयात नेहमी शुकशुकाट दिसत असून, अधिकारी वर्ग अनुपस्थित राहत असल्याने कार्यालयीन कारभार केवळ येथील कर्मचाऱ्यावर सुरु असल्याचे पाहावयास मिळते आहे. शहरातील जनतेकडून नगरपंचायत लाखो रुपयाचा कर वसूल करत असतांना  पाणी टंचाईच्या समस्यांकडे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे यावरून दिसून येत आहे. खरे पाहत टंचाईच्या काळात मोठ्या प्रमाणात पाणी वितरण केल्याचे दाखवून अनेक बोगस पद्धतीने देयके उचलून शासनाला चुना लावेल जात असताना मात्र शहरातील अनेक प्रभागातील नागरिक पाणी टंचाईमुळे भटकंती करत आल्याचे उदाहरण नगरपंचायतीवर पाण्याचा प्रश्न घेऊन येणाऱ्या महिलांच्या संख्येवरून स्पष्ट होते आहे.


तर लेख विभागाचा कारभारही ढेपाळला असून, दिवाळीच्या काळात नगरपंचायतीने दिलेल्या स्वच्छतेच्या संदेश आणि नागरिकांना दिलेल्या शुभेच्छा जाहिरातीची देयके देण्यास टाळाटाळ चालविली जात आहे. जर देयके द्यायचीच नसली तर नगरपंचायत चांगले काम करते हे दाखविण्यासाठी वर्तमान पात्रातून जाहिराती देऊन दांडोरा का पिटावायचा असा सवाल एका पत्रकाराने उपस्थित केला आहे. एकीकडे आम्ही पारदर्शक व्यवहार करतो असे दाखवून दुसरीकडे मात्र सर्व आंधळा कारभार चालत असल्याची माहिती पाच वर्षाच्या काळात नगरपंचायतीचे नगरसेवक पद भोगलेल्या काहींनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितली आहे. त्यामुळे नगरपंचायत शहरच्या स्वच्छतेवर करत असलेला महिण्याकाठीचा १५ लाखाचा खर्च, पाणी पुरवठ्यासाठीचा खर्च, थातुर माथूर नालीबांधकाम, रस्ते बांधकामाच्या नावाखाली झालेली बोगस कामे, अर्ध्यावर स्मशानभूमी, अग्निशमन इमारत, पाणी पुरवठा नळयोजना, स्वच्छतेचा उडालेला बोजवारा, पहिल्याच पावसात निकृष्ठतेची खुललेली पोल नगरपंचायतीत चालत असलेल्या आलबेल कारभाराची साक्ष देत असल्याचे येथील जनता उघड्या डोळ्याने पाहते आहे. 



हिमायतनगर नगरपंचायतीच्या या बेवारस कारभाराला शिस्त लावण्यासाठी कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांनी येथील आलबेल कारभारावर लक्ष केंद्रित करून प्रशासक, प्रभारी मुख्याधिकारी तसेच विविध विभागाच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांना शिस्त लावून नागरी समस्यांना प्रथम प्राधान्य देण्यासाठी सक्त ताकीद द्यावी. आणि तातडीने येथील पाणी पुरवठा नळयोजनेचे काम पूर्ण करण्याच्या सूचना देत  गेल्या ५ वर्षांपासून येथील नगरपंचायत कार्यालयात ठाण मांडून बसलेल्यांची उचलबांगडी करावी अशी रास्त मागणी विविध समस्यांच्या विळख्यात अडकलेल्या शहरातील नागरीकातून केली जात आहे.  


  

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी