घरकुलाचा चौथा हप्त्याच्या निधीवरून श्रेय घेण्यासाठी सोशल मीडियावर चढाओढ

हिमायतनगरातील बोगस कामाचं श्रेय घेण्यास कुणीच पुढं येईना - बालाजी बलपेलवाड 

मागील ५ वर्षात कधी नव्हे तेवढी बोगस कामे करून स्वतःचा विकास करून घेतला 



हिमायतनगर| नगरपंचायतीच्या पंचवार्षिक काळात तत्कालीन सत्ताधार्यांनी शासनाकडून उपलब्ध झालेल्या निधीची पुरती वाट लावली आहे. खरे पहात शहरातील आवश्यक गरजा पूर्ण करणे महत्वाचे असताना केवळ मलिदा लाटण्याच्या माध्यमातून स्वतःचा विकास करून घेतला आहे. नुकत्याच झालेल्या पावसाच्या पाण्याने उघड झालेली बोगस कामे जनतेनी उघड्या डोळ्यांनी पहिली आहेत. सत्तेत असताना जनतेच्या कामाकडे पाठ फिरवायची आणि सत्तेतून बाहेर पडल्यावर माझ्यामुळं हे झालं असे दाखवून दिशाभूल करायची हाच कित्ता हिमायतनगरात गिरविला जात आहे. याचे जिवंत उदाहरण म्हणजे मागील वर्ष भरपासून घरकुल धारकांच्या चौथ्या हप्त्याचा निधीचा प्रश्न ऐरणीवर असताना आमदार-खासदारांनी केलेल्या प्रयत्नामुळे तो निधी उपलब्ध होणार आहे. याचे श्रेयवाद सत्ता भोगून पायउतार झालेले काही लोकप्रतिनिधी घेण्यासाठी धडपडत असल्याचे सोशल मीडियावर पाहावयास मिळते आहे. तश्याच प्रकारे विकास कामाच्या नावाखाली झालेल्या निकृष्ठ दर्जाच्या कामाचे श्रेय कोणताही लोकप्रतिनिधी का घेत नाही ? असा सवाल प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष बालाजी बालपेलवाड यांनी विचारला आहे. निधी कोणीही आणले तर त्यांनी जनतेवर उपकार केलं नाही... जनतेने त्यांना ५ वर्षासाठी याच कामासाठी निवडून दिलेलं आहे. त्यामुळे हे माझ्याच पाठपुराव्यामुळं झालं हे म्हणने चुकीचे आहे. जनतेनं निवडून दिले नसते तर काय भाकरी आणल्या असता काय...? असा खडा सवालही त्यांनी उपस्थित करून तत्कालीन पुढाऱ्यांच्या भूलथापांना ठार देऊन नये. अन्यथा मागील ५ वर्षाच्या काळात झालेल्या बोगस कामाची पुनरावृत्ती होऊन होऊन शहरात वाहणारी गटारगंगा कायम वाहती राहील. आणि भ्रष्टाचारकरणारे मालामाल होतील. यासाठी सक्षम, उच्चशिक्षित, जनतेची इमाने इतबारे काम करणार्यांना नगरपंचायतीच्या खुर्चीवर बसवायला हवं असे मत त्यांनी व्यक्त केलंय.  

शहराला नगरपंचायतीचा दर्जा मिळाल्यांनतर काँग्रेस आणि शिवसेनेने प्रत्येकी अडीच वर्ष सत्ता भोगली दरम्यानच्या पंचवार्षिक काळात कोट्यावधीचा निधी नगरविकास विभागाकडून  विकास कामे करण्यासाठी उपलब्ध झाला. परंत्तू सत्ताधार्यांनी विकास कामाच्या नावाखाली आपलीच तुंबडी भरून घेतली. त्यामुळे आजघडीला अनेक काम अर्धवट तर बहुतांश कामे अल्पवधीतच होत्याची नव्हती झाली आहेत. प्रथम नगराध्यक्षांच्या काळात मोठ्या प्रयत्नाने प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुलाचे प्रस्ताव आणि मुरली बंधाऱ्यावरून कायमस्वरूपी नळयोजनेचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यापैकी १२२५ घरकुल आणि शहराची १९ कोटीची पाणीपुरवठा योजना मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असताना हिमायतनगर नगरपंचायतीत सत्तापालट झाली. आणि मीच घरकुल आणि नळयोजना मंजूर करून आणली असा समाज नागरिकात पसरविण्याचा प्रयत्न नव्याने सत्तेत आलेल्यानी केला. असो ज्यांच्या काळात मंजूर झाले तो श्रेय घेणारच त्यानंतर बहुतांश घरकुलाचे कामे निधीअभावी रखडली जी काही झाली त्या घरकुल धारकांच्या चौथ्या हप्त्याची रक्कम थकल्याने अनेकांच्या हक्काच्या घरकुलाचे स्वप्न धुळीस मिळाले. 

दरम्यान नगरपंचायतीचा कार्यकाळ संपल्याने प्रशासक अस्तित्वात आले. आणि घरकुलाच्या शेवटच्या चौथ्या हप्त्याचा प्रश्न ऐरणीवर आला. घरकुल लाभार्थ्यांच्या मागणीवरून अनेक जागरूक पत्रकारांनी घरकुलाच्या चौथ्या हप्त्याबद्दल वर्तमान पात्रातून वृत्त प्रकाशित केले. याची दखल संबंधित यंत्रणेने घेतली तसेच विद्यमान खासदार आणि आमदार महोदयांनी आपापल्या परीने घरकुलाच्या चौथ्या हप्त्याच्या रक्कमेसाठी म्हाडाकडे आणि संबंधित मंत्र्याकडे पाठपुरावा केला. त्यामुळे महाराष्ट्र सरकारची रक्कम तात्काळ उपलब्ध झाली...मात्र कोरोना महामारीमुळं केंद्राकडून रक्कम उपलब्ध होण्यास उशिरा झाल्याने घरकुल धारकांना चौथा हप्ता वितरित करण्यासाठी अडचण निर्माण झाली अशी माहिती प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी यांच्याकडून सांगण्यात आली होती. दरम्यान नुकतेच केंद्राकडून येणाऱ्या ६ कोटी ६१ लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असून, लवकरच हि रक्कम प्राप्त होणार आहे. केंद्र व राज्य सरकार असे दोघांचे मिळून हिमायतनगर शहरात मंजूर असलेल्या १२२५ घरकुल धारक प्रत्येक लाभार्थ्यांच्या खात्यात वळती होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

हा निधी उपलब्ध झाल्याचे समजताच घरकुलाचा रखडलेल्या चौथ्या हप्त्याचा निधी उपलब्ध करून आणण्यासाठी मीच आमच्या नेत्याच्या माध्यमातून प्रयत्न केले. हे माझ्यामुळे झाल असे दाखवून गरिबांच्या हक्काचे मिळणाऱ्या पैशाचे श्रेय घेण्यासाठी देखील तत्कालीन पदाधिकारी धडपड करताना दिसत आहेत. यावरून केवळ आगामी काळात होऊ पाहणाऱ्या नगरपंचायत निवडणुकीत माझ्याबाजूने जन्मात मिळाव आणि पुन्हा मीच सत्तेचा सारीपाट चालविण्यास योग्य आहे हाच एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेऊन, जनतेची दिशाभूल करण्याचे काम काँग्रेस व शिवसेनेचे काही पदाधिकारी आपल्या समर्थकांकरवी करताना सोशल मीडियावर दिसून येत आहेत. अश्याच प्रकारे सोशल माडीवरून तत्कालीन सत्ताधाऱ्याने आपल्या काळात विकास कामाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात करण्यात आलेल्या बोगस कामाचे श्रेय घेण्यासाठी पुढे यावे म्हणजे जनतेचा मनाभावातून खरोखर पुळका आहे असे सर्वाना वाटेल. असा सणसणीत टोला प्रहार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष बालाजी बलपेलवाड यांनी कोणाचेही नाव न घेता निधी उपलब्ध झाल्याचे श्रेय घेऊन पाहणाऱ्यांना लगावला आहे. 

याबाबत बोलताना बलपेलवाड पुढे म्हणाले कि, ५ वर्षाच्या काळात खुर्चीवर बसलेल्यानी विकास कामाच्या आड कश्या पद्धतीने अंदाज पत्रकाला बगल देऊन शहरातील रस्ते, नाल्या, टैक्स वसुली, स्वच्छेतेच्या बाबतीचा खर्च, मोकळ्या प्लॉटिंगमध्ये झालेली हेराफेरी, पाणी पुरवठ्याचे निकृष्ट काम, टैन्करद्वारे पाणी वितरणात केलेली हात चालाखी, बोअर, विंधन विहिरी दुरुस्ती, मोटारपंप खरेदी दुरुस्ती, स्ट्रीट लाईट, हायमास्क लाईट, सौर पथदिवे, वाहन खरेदी, १४ आणि १५ वित्त आयोगाच्या निधीतून केलेली थातुर-माथूर व बोगस कामे, घनकचरा व्यवस्थापन आणि एकाच कामाची दोन-दोन वेळा बिले अदा करणे आदींच्या माध्यमातून केलेल्या भ्रष्टाचार व निकृष्ट कामाचा पाढाच त्यांनी वाचला. या सर्व कामामध्ये कश्या पद्धतीने अभियंता, मुख्याधिकारी, प्रशासक, लेखापाल याना हाताशी धरून बोगस पद्धतीचे बिले फाईलमध्ये लावून देयके उचलून देऊन शासन व जनतेची दिशाभूल केल्या गेली स्पष्ट व याबाबत परखड मत व्यक्त केले. एवढेच नाहीतर नगरपंचायत निवडणूक जाहीर होऊ द्या तेंव्हा प्रसिद्धी पत्रकं आणि प्रचाराच्या माध्यमातून नगरपंचायतीत ५ वर्षाच्या काळात करण्यात आलेल्या प्रत्येक लहान-मोठ्या कामाची पुराव्यानिशी पोलखोल करून तत्कालीन वॉर्ड सदस्यांना जनतेनी का..? निवडून द्यावे याचा विचार करायला भाग पडणार असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले. यावेळी प्रकारचे तालुकाध्यक्ष व कार्यकर्ते, पत्रकार उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी