15 वर्षे तुम्हीच आमदार रहा, आम्ही तुमच्या सोबत - आ. राजूरकरांचे आ. शिंदे यांना आश्वासन - NNL


नांदेड, अनिल मादसवार|
कंधार - लोह्याचे आ. श्यामसुंदर शिंदे हे महाविकास आघाडीचे सहयोगी सदस्य आहेत. आम्ही एकमेकांच्या पायात पाय घालत नाही तर हातात हात घालून विकासाला साद घालतो. आ. श्यामसुंदर शिंदे यांचे काम अत्यंत चांगले असून पुढील 15 वर्षे त्यांनी आमदार म्हणून राहावे, आम्ही त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहू, अशी निःसंदिग्ध ग्वाही विधान परिषद प्रतोद आ. अमरनाथ राजूरकर यांनी दिली.

लोहा तालुक्यातील कापसी (बु.) येथे 14 व्या वित्त आयोगातून घेतलेल्या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळ्याच्या प्रसंगी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आ. श्यामसुंदर शिंदे, आ.मोहनअण्णा हंबर्डे, महापौर मोहिनी येवनकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेचे शिक्षण व बांधकाम समितीचे सभापती संजय बेळगे, माजी सभापती माधवराव पांडागळे, स्थायी समितीचे माजी सभापती किशोर स्वामी, काँग्रेसचे कोषाध्यक्ष विजय येवनकर, प्रवक्ते संतोष पांडागळे, सरपंच सौ. ललिता आळणे, उपसरपंच सौ.शकुंतला वडवळे यांची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना आ.अमरनाथ राजूरकर म्हणाले की, कापसी व कापसी परिसर हा पूर्वी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या मुदखेड मतदार संघात होता. त्यामुळे या परिसरामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे. आ. श्यामसुंदर शिंदे जरी अपक्ष म्हणून निवडून आले असले तरीही मुळात ते डॉ. शंकरराव चव्हाण यांचे कट्टर समर्थक होते, मधल्या काळात त्यांची गाडी रुळावरून घसरली. पण ते आता योग्य ट्रॅकवर आले आहेत. त्यामुळे त्यांच्या पाठीशी आम्ही भक्कमपणे उभा टाकणार असून पुढील 15 वर्षे या मतदारसंघाचा आमदार म्हणून त्यांनी काम करत रहावे, आम्ही त्यांच्या सोबत आहोत, असा विश्वास आ. राजूरकर यांनी यावेळी व्यक्त केला. 

आ. राजूरकर यांनी स्वतःच्या आमदार निधीतून 5 लक्ष व जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती बेळगे यांच्या निधीतून 5 लक्ष अशा दहा लक्ष रुपयाची घोषणा त्यांनी केली. यावेळी आ. श्यामसुंदर शिंदे यांनी कापसी विभागातील जनतेचे आपल्याशी अतूट नाते असून विकासासाठी त्यांना निधीची कमतरता पडू देणार नाही, असे आश्वासन देतानाच 5 लक्ष रुपयांची घोषणा केली. यावेळी आ. मोहनअण्णा हंबर्डे यांनी आपल्या भाषणातून जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या माध्यमातून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत असल्याबद्दल त्यांचे आभार मानले.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले की, कापसी ग्रामपंचायतने 14 व्या वित्त आयोगाचा निधी आरोग्य सेवेवर वापरल्याबद्दल ग्रामपंचायतीचे अभिनंदन केले. वैद्यकीय अधिकार्‍याच्या निवासाची दुरूस्ती लवकरच करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू पाटील वडवळे यांनी केले.  या कार्यक्रमास उत्तमराव वडवळे, शिवाजी आळणे, संजय वडवळे, किशनराव लोंढे, नागोराव पाटील मोरे, राम सोनसळे, भीमराव कांबळे, शशीकांत कांबळे, हौसाजी कांबळे यांच्यासह गावातील नागरिकांची मोठी उपस्थिती होती. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी