नांदेड| शहरातील विष्णूनगर भागातील स्वस्त धान्य दुकान क्र.13 श्री.जोंधळे यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करून सामान्य नागरिकांना नियमित धान्य पुरवठा करण्याची मागणी सामाजीक कार्यकर्ते विलास पंढरीनाथ जाधव यांनी नांदेडचे तहसिलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शासनाने गोरगरीब नागरिकांना वेळेवर धान्य उपलब्ध व्हावे यासाठी स्वस्त धान्य दुकानाची निर्मिती केली होती. मात्र यात गोरगरीबांना धान्य पुरवठा करणे ऐवजी धान्य बाजारात विक्री करून गोरगरीबांच्या तोंडचा घास पळविण्याचे प्रकार सर्रासपणे दिसून येत आहेत. शिधापत्रिका धारकांना वेळेवर व नियमित, ठरवून दिलेला माल, त्याची पावती देण्यासाठी सर्व दुकानदारांना मशिन वाटप करण्यात आल्या. धान्य खरेदी केल्यानंतर आपल्या किती धान्य पुरवठा झाले याचा तपशिलच पावतीवर देण्यात येत होता.
दुकानदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते. त्यावर त्यांनी उपाय म्हणून मशिनमध्ये पावतीचा रोलच टाकणे बंद केले. धान्य दिल्यानंतर पावती येत नसल्याचे लक्षात येत असल्याने शिधापत्रिका धारक पावतीची मागणी केली असता मशिन खराब झाली आहे. पावती मिळणार नाही, अशी युक्ती शोधली. शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे माल न देता पुर्वीप्रमाणेच मोजकेच धान्य देणे व जास्त दर आकारणे असे प्रकार घडत आहेत.
विष्णूनगर नांदेड येथील दुकान क्र.13 वर असाच प्रकार शिधापत्रिका धारकांना अनुभवयास मिळत आहे. मे महिन्यातील मोफत धान्य वाटप सुद्धा मोजक्याच लोकांना करण्यात आले असून अर्धे शिधापत्रिका धारक वंचित आहेत. दुकान वेळेवर न उघडणे, मनाला आले तेंव्हा 1-2 तास चालू ठेवणे, काही मोजकेच शिधापत्रिका घेणे, धान्य कमी देणे, धान्य दिल्यानंतर पावती न देणे असा प्रकार घडत असल्याने सामाजीक कार्यकर्ते विलास जाधव यांनी तहसिलदार नांदेड यांच्याकडे सदरील दुकानरावर कायदेशीर कार्यवाही करण्याचे पत्र दिले आहे. त्यावर कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारासुद्धा देण्यात आला आहे.