सर्व्हीस रोडसह उड्डाण पूल बांधण्याची मागणी - डॉ. संतुक हंबर्डे
नांदेड (नृसिंह न्यूज नेटवर्क) नांदेड-लातूर राष्ट्रीय महामार्ग क्र. 361 या महामार्गाचे काम नागपूर, बोरी, तुळजापूर या महामार्गाच्या कामाची सुरूवात झाली असून या महामार्गादरम्यान येणाऱ्या विष्णुपूरी ते मुसलमानवाडी या दरम्यान मोठ्या प्रमाणात शैक्षणिक संस्था असून विद्यार्थ्यांची वर्दळ मोठ्या प्रमाणात आहे व अनेकवळा मोठे अपघात घडले असून यासाठी सर्व्हीस रोडसह उड्डाण पूल बांधण्यात यावा अशी मागणी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. संतुक हंबर्डे यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
नांदेड शहरालगत असणाऱ्या विष्णुपूरी या भागात मोठ्या प्रमाणात शैक्षणिक संस्था आहेत. या मार्गावर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गुरू गोविंदसिंघजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र महाविद्यालय, सहयोग सेवाभावी संस्था, ग्रामीण तंत्रनिकेतन, मातोश्री प्रतिष्ठाण व रत्नेश्वरी तंत्रनिकेतन यासह अनेक शैक्षणिक संस्था या रोडलगत असून याचबरोबर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय याच परिसरात असल्याने विद्यार्थ्यांबरोबरच रूग्णांचीही संख्या याठिकाणी मोठया प्रमाणात आहे. तसेच विष्णुपूरी येथे प्रसिद्ध काळेश्वर मंदिर व कै. शंकरराव चव्हाण जलाशय हे देखील असल्याने भाविकांसह पर्यटकांचीही या ठिकाणी दररोज मोठ्या प्रमाणात गर्दी असते.
मागील काही दिवसांपासून या महामार्गावर प्रचंड गर्दी झाली असून लहान मोठे अपघातही याच परिसरात घडले आहे. रस्ता अरूंद असल्याने वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून व शैक्षणिक संस्था याच परिसरात मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या मार्गावरील विष्णुपूरी ते मुसलमानवाडी या दरम्यान सर्व्हीस रोडसह उड्डाण पूल बांधण्यात यावा, यामुळे भविष्यात होणाऱ्या अपघाताला आळा बसेल व वाहतुकीचा प्रश्नही मोठ्या प्रमाणात सुटू शकतो यासाठी ना. चंदक्रांत पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत या बाबीची शिफारस केंद्र शासनाकडे करण्यात यावी अशी मागणी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. या प्रसंगी संजय कौडगे, प्रवीण साले,विजय गंभीरे, अरुंधती पुरंदरे, राजेंद्रसिंग पुजारी, बालाजीराव देशपांडे, मोतीराम पा मोरे, प्रभू पा इंगळे, महादेवी मठपती, वेंकटेश साठे, बापूराव मरालाकर, नागनाथ घिसेवाड, शंकर मनालकार, आशिष नेरलकर आदींची उपस्थिती होती