मुंबई (नृसिंह न्यूज नेटवर्क) राज्यातील विद्यापीठांना विद्यार्थ्यांसाठी भौतिक सुविधा, संशोधन आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी राज्य शासनाकडून तसेच राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानांतर्गत निधी मंजूर होतो. या निधीतून संबंधित विद्यापीठांना आवश्यक ते बांधकाम करण्यासाठी परवानगीची आवश्यकता असून त्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने विशेष नियमावली तयार करण्याचे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिले.
महाराष्ट्र राज्य ‘रुसा’ कौन्सिलची आढावा बैठक उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत रुसामार्फत राबविण्यात येणारे उपक्रम, योजना, तसेच आतापर्यंतच्या कामांचा आढावा घेण्यात आला. केंद्र शासनाने उच्च शिक्षणाचा दर्जा व गुणवत्ता सुधारण्यासाठी राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान सुरु केले आहे. त्याची अंमलबजावणी करताना या योजनेंतर्गत १८ विविध उद्दिष्टे देण्यात आली असून त्या उद्दिष्टांतर्गत योजनेमधून निधी संबंधित संस्थांना देण्यात येतो. त्यामुळे मंजूर झालेल्या निधीचे अचूक नियोजन करुन वेळेत काम पूर्ण करण्याच्या सूचनाही श्री. तावडे यांनी यावेळी दिल्या.
विद्यार्थ्यांकरिता भौतिक सुविधांची निर्मिती, संशोधन आणि नाविन्यपूर्ण उपक्रम, प्रयोगशाळांचे बळकटीकरण, संगणक प्रयोगशाळा निर्मिती, वसतिगृह नूतनीकरण, ग्रंथालय पुस्तके व ई-सुविधा, इ-कंटेन्ट लर्निंग मोड्युल आणि डिजिटल क्लासरुम आदींची निर्मिती करताना नाविन्याचा वापर करण्याची आवश्यकता असून त्यातून उच्च शिक्षणाचा दर्जा वाढविण्याचे आवाहनही श्री. तावडे यांनी यावेळी केले. केंद्र शासनाच्या मानव संसाधन विकास विभागाने उच्चस्तर शिक्षा योजनेंतर्गत प्रत्येक राज्यात शिक्षणाची गुणवत्ता राखून त्यामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी तसेच निरीक्षण पध्दत सुलभ करण्यासाठी राज्यस्तरीय गुणवत्ता हमी सेल गठित करण्यात आला असल्याचेही उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांनी यावेळी सांगितले. बैठकीस प्रधान सचिव तथा ‘रुसा’च्या राज्य प्रकल्प संचालक मीता राजीव लोचन, राज्यपालांचे सचिव वेणुगोपाल रेड्डी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु एन.आर. करमालकर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास गायकर, अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु एम.जी.चांदेकर, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सहसचिव सिद्धार्थ खरात आदी उपस्थित होते.