नांदेड,प्रतिनिधी/ तालुक्यातील पेठवडज रस्त्याला जोडणार्या सिरसी (बु) ते गणपती मंदिर रस्त्याच्या डांबरणाचे निकृष्ट दर्जाचे काम होत आहे. सदर काम थांबवून अंदाज पत्रकाप्रमाणे करुन डांबरीकरणाचा दर्जा राखावा अशी मागणी वडार समाज संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. साहेबराव बेले यांनी केली आहे.
जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग अंतर्गत येणारे सिरसी (बु) ते गणपती मंदिर रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम चालू आहे. सदर कामावर संबंधीत कंत्राटदार व उपअभियंता बसवदे यांचे कोणतेही नियंत्रण नाही. या कामासाठी वापरण्यात येत असलेला मुरुम व डांबर दर्जाहिन आहे. त्यामुळे रस्त्याचे होत असलेले काम जास्तकाळ टिकणारे नाही. निव्वळ डागडुजी करुन निधी हडप करण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप वडार समाज संघाच्यावतीने मुख्यकार्यकारी अधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात प्रा. साहेबराव बेले व व्यंकटी जाधव यांनी केला आहे. ग्रामीण भागातील जनतेसाठी दळणवळणाचा महत्त्वाचा मार्ग असलेल्या या रस्त्याचे काम अंदाज पत्रकाप्रमाणे करुन दर्जा राखावा अन्यथा गावकर्यांकडून आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.