हिमायतनगर, प्रतिनिधी लाखो भाविकांच्या उपस्थितीत पिंपळगाव येथील १०८ कुंडी महायज्ञ, दत्त मूर्ती प्रतिष्ठापना व कलशारोहणाची सांगता काशी विश्वनाथ येथील डॉ. चंद्रशेखर महास्वामीजी यांचा हस्ते सोमवारी सकाळी करण्यात आली. यावेळी लाखो भक्तांचा जनसागर उसळला होता.
नांदेड जिल्ह्यातील हदगाव - भोकर -हिमायतनगर तालुक्याच्या माध्यभागी असलेल्या पिंपळगावच्या दत्तात्रेय मंदिराच्या कळसारोहण व श्री दत्त मूर्ति प्राण प्रतिष्ठापण निमित्त अखंड
हरिनाम सप्ताह व श्री दत्त 108 कुंडी महायज्ञ आणि दत्त कथा महापुराण कथा यज्ञ सोहळ्यास दिनांक 24 एप्रिल रोजी श्रीश्रीश्री 1008 जगद्गुरू राजेंद्रदास महास्वामीजी यांच्या हस्ते सुरुवात झाली होती. सात दिवस दत्ताचा नामजप, सकाळी ५ ते ७ गुरूचरीत्र पारायण व ७ ते ११ श्री दत्त याग महायज्ञ पुजा तसेच ११ ते १ गुरुवर्याचे प्रवचण त्यानंतर दुपारी ३ ते ६ प्रसाद व नंतर रात्री ८ ते ११ भजन - कीर्तन आदींसह विविध कार्यक्रम संपन्न झाले. दरम्यान अनेक राजकीय नेत्यांनी भेटी देऊन दर्शन घेतले. दि.३० एप्रिल रोजी कलशाची टाळ - मृदंगाच्या वाणीत भव्य अशी मिरवणूक गावातील मुख्य रस्त्याने काढण्यात आली होती. रात्री नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जून खोतकर हे नांदेड दौऱ्यावर आले असता पिंपळगावच्या श्री दत्त मंदिरास भेट देऊन होमचे पूजन करून दत्त मूर्तीचे दर्शन घेतले. या ठिकाणी स्थापन करण्यात आलेल्या मुर्त्या ह्या जयपूर येथून आणण्यात आल्या होत्या.
दि.०१ में महाराष्ट्र दिनी सकाळी काशी विश्वनाथ येथील डॉ. चंद्रशेखर महास्वामीजी यांचा हस्ते श्री दत्त मूर्ती, अनुसयामाता मूर्तीची स्थापना होऊन लाखो भाविक - भक्तांच्या उपस्थितीत कलशारोहन कार्यक्रम मोठ्या थाटात संपन्न झाला. त्यानंतर श्री दत्त कथा प्रवक्ते आशीष आनंदजी महाराज यांच्या मधुर वाणीने सप्ताहाची सांगता करण्यात आली. दरम्यान या धार्मिक कार्यक्रमासाठी विदर्भ, मराठवाडा, तेलंगणा, कर्नाटक राज्यातील भाविकांची मांदियाळी जमली होती. काळ्या पाषाणातील देखण्या मुर्त्यांची दर्शन घेऊन अनेकांनी पुण्य प्राप्त केले. यावेळी उपस्थित भक्तांना दत्त मंदिराच्या वतीने महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.