उमा भारती, कल्याणसिंह यांनी तात्काळ आपल्या पदाचे राजीनामे द्यावेत.
मुंबई, प्रतिनिधी/बाबरी मशिद विध्वंसप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज दिलेला निकाल स्वागतार्ह असून केंद्रीय मंत्री उमा भारती, राजस्थानचे राज्यपाल कल्याण सिंह यांनी नैतिकतेच्या आधारावर तात्काळ आपल्या पदाचे राजीमाने द्यावेत अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे.
बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत करून चव्हाण म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च
न्यायालयाचा निकाल रद्दबातल ठरवून लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, कल्याणसिंह यांच्यासह 13 जण गुन्हेगारी स्वरूपाच्या कटात सहभागी असल्याचा सीबीआयचा युक्तीवाद मान्य करून त्यांच्याविरोधात फौजदारी कार्यवाही सुरु करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी पुढील न्यायालयीन प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण व्हावी यासाठी सीबीआयने वेगाने पाऊले उचलली पाहिजेत.
सध्या केंद्रात आणि उत्तरप्रदेशात भाजपचे सरकार सत्तेत असल्याने केंद्रीय मंत्रीपदावर असणा-या उमा भारती मंत्रीपदावर राहिल्या तर त्या खटल्याच्या कामकाजावर प्रभाव पाडू शकतात. त्यामुळे उमा भारती यांनी आपल्या केंद्रीय मंत्रीपदाचा तात्काळ राजीनामा द्यावा. तसेच सध्या राज्यपाल या घटनात्मक पदावर असलेले कल्याण सिंह यांच्यावर देखील फौजदारी कारवाई करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत त्यामुळे कल्याण सिंह यांनी पदाचा आधार घेऊन स्वतःचा बचाव करण्यापेक्षा घटनेचा मान राखून आपल्या पदाचा तात्काळ राजीनामा दिला पाहिजे असे खा. चव्हाण म्हणाले.