जमीन घोटाळा आणि नगरसेवकांची चेष्टा प्रकरण मनपा सर्वसाधारण सभेत गाजले


नांदेड(प्रतिनिधी)जमीन घोटाळा प्रकरण तसेच मनपाचा कर्मचारी गजभारे याने नगरसेवकांची सोशल मिडीयावर केलेली क्रूरथट्टा या प्रकरणी तात्काळ कारवाई करण्याची मागणी मनपाचे विरोधी पक्षनेते प्रमोद उर्फ बंडू खेडकर यांनी सभागृहात केली. महापौर शैलजा स्वामी यांनी या दोन्ही प्रकरणात तातडीने निर्णय घेण्याचे आदेश दिले.
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा मनपा सभागृहात आज सकाळी अकरा वाजता सुरु झाली. सुरुवातीला महाड येथील दुर्घटनेच्या संदर्भात मृत्यूमुखी पडलेल्या प्रवाशांना सभागृहाने श्रध्दांजली अर्पण केली. यानंतर मनपा विरोधी पक्षनेते प्रमोद उर्फ बंडू खेडकर यांनी नांदेडच्या वजिराबाद भागातील जमिन घोटाळ्याचे प्रकरण यासंदर्भात प्रशासनाची चालढकल भूमिका याबद्दल प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. सर्व पुरावे देवून जर कारवाई होणार नसेल तर शहरातील सर्व मोकळ्या जागा अशाच बेकायदेशीरपणे बिओटी तत्वावर देवून टाका, असे वैतागाने सांगितले. प्रशासनाकडे याबाबत सर्व माहिती असताना संबंधित सहायक आयुक्त प्रकाश येवले यांच्यावर कारवाई केली जात नाही, असा आरोप केला. आयुक्तांनी यावर थातूरमातूर उत्तरे दिल्याने सभागृह संतप्त झाले. यानंतर दिपकसिंह रावत, बाळासाहेब देशमुख, अशोक पाटील उमरेकर, विनय गुर्रम यांनी हा प्रश्न नेटाने मांडत सभागृह दणाणून सोडले. महापालिकेचा कर्मचारी विलास गजभारे याने नगरसेवकांच्या संदर्भात थट्टा करणारी तसेच त्यांची खिल्ली उडविणारी पोस्ट सोशल मिडीयावर टाकल्याने हा प्रश्न देखील खेडकर, रावत, गुर्रम यांनी उचलून धरला. त्यावर सत्ताधारी कॉंग्रेस पक्षाने देखील शिवसेनेची पाठराखण करत संबंधित कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करा व त्याला निलंबित करा, अशी मागणी केली. आनंद चव्हाण, सरजितसिंघ गील, अब्दुल सत्तार, गाडीवाले यांनीही खेडकर यांच्या या वक्तव्याला दुजोरा देत गजभारे यांना निलंबित करा, अशी मागणी केली. आयुक्तांनी यावर समाधानकारक उत्तर न दिल्याने महापौर शैलजा स्वामी यांनी सभागृहाचे कामकाज संपताच गजभारे यांच्यावर कारवाईचे निर्देश दिले. सभागृहात अभिषेक सौदे, अशोक उमरेकर, श्रध्दा चव्हाण, सरजितसिंघ गील, नवल पोकर्णा, गफार खान, शेरअली यांनी शहरातील विविध समस्या संदर्भात प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. पंधरा दिवसापूर्वी झालेल्या पावसानंतर त्या पाण्याचा निचरा तसेच गिट्टी व मुरुम टाकण्यास प्रशासनाने टाळाटाळ केल्याने नाराजी व्यक्त केली. मात्र यावर महापौर शैलजा स्वामी यांनी आपतकालीन परिस्थितीत योग्य त्या उपाययोजना करण्याचे निर्देश आयुक्तांना दिले. तरोड्यातील विकास कामे, मलनिस्सारणाचा प्रकल्प, रस्त्याचे कामे याबाबतच्या निधी संदर्भात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोपी बाळासाहेब देशमुख यांनी केला. याची चौकशी करण्याची मागणी करुन आयुक्तांना निवेदन दिले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी