नांदेड(प्रतिनिधी)शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी सुरु करण्यात आलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर गुणवत्ता विकास अभियानांतर्गत येत्या शनिवार दिनांक 30 ऑगस्ट रोजी सर्व शाळांमध्ये वर्गा-वर्गात स्वतंत्र पालकसभा घेण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांनी दिल्या आहेत.
शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी जुन 2016 पासून
डॉ.बाबासाहेब आंबेडकर गुणवत्ता विकास अभियानाचा दुसरा टप्पा सुरु करण्यात आला आहे. डिजिटल शाळा, ज्ञानरचनावादी शाळा, ज्ञानरचनावादानुसार रंगरंगोटी, लक्षवेधी नमस्कार, रात्री सात ते नऊ टिव्ही बंद मोहिम प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश दिले आहेत. नांदेड जिल्हयात शैक्षणीक गुणवत्ता वाढीसाठी सकारात्मक प्रयत्न केले आहेत. यातून जिल्हयात मोठया प्रमाणावर लोकसहभागातून शाळा समृध्द करण्यात येत आहेत. पालकांनीही मुलांचा अभ्यास घेणे, रात्री सात ते नऊ टिव्ही बंद करणे यासाठी सहभाग द्यावा. इयत्ता पाचवी व आठवीच्या पटावरील सर्व विद्यार्थी शिष्यवृत्ती परिक्षेस बसणार असून शंभर टक्के किमान पास होतील अशी तयारी पालक व शिक्षकांनी करावयाची आहे. दिनांक 30 ऑगस्ट रोजी जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये पालकसभा आयोजित करावी. प्रत्येक वर्गात विद्यार्थ्यांचे पालक व संबंधित शिक्षक पालकांसोबत चर्चा करतील. तसेच विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता पाहतील. सर्व पालक सहभागी होण्यासाठी मुख्याध्यापकांनी नियोजन करण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के यांनी केले आहे.
एकीकडे गुणवत्ता वाढविण्यासाठी पालक सभा घेण्याच्या सूचना दिल्या परंतु जिल्हाभरातील शाळांमध्ये असलेल्या शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यास टाळाटाळ केली जात आहेत त्यामुळे गुणवत्ता विकासाला हरताळ फसला जात असून, यास शिक्षणाच्या रिक्त जागा कारणीभूत असल्याचा आरोप हिमायतनगर तालुक्यातील शालेय व्यवस्थापन समितीसह पालक वर्गातून केला जात आहे.