कर्ज पुनर्गठन - वाटपा बाबत आढावा बैठक संपन्न

जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना
ताबडतोब कर्ज उपलब्ध व्हावे – पालकमंत्री रावते


नांदेड(अनिल मादसवार)पीक कर्जाचे पुनर्गठन आणि नव्याने कर्ज वाटपाच्या प्रक्रियेची सांगड घालून, जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र शेतकऱ्यांना ताबडतोब कर्ज मिळेल यासाठी बँकांनी प्रयत्न करावेत असे निर्देश पालकमंत्री दिवाकर रावते यांनी आज येथे दिले. बँकांनी पिककर्ज आणि पिकविमा यांच्यासाठी शेतकऱ्यांपर्यंत पोहचून  त्यांना आधार द्यावा, असे आवाहनही श्री. रावते यांनी केले. जिल्ह्यातील पीक कर्ज वाटप  आणि  कर्ज पुनर्गठनाबाबतची आढावा बैठक श्री. रावते यांच्या अध्यक्षतेखाली  संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते.

जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील डॅा. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे बैठक संपन्न झाली. बैठकीस सर्वश्री आमदार सुभाष साबणे, डी. पी. सावंत, वसंत चव्हाण, प्रदीप नाईक, प्रताप पाटील-चिखलीकर, हेमंत पाटील, नागेश पाटील-आष्टीकर, जिल्हाधिकारी सुरेश काकाणी, सहायक जिल्हाधिकारी डॅा. राजेंद्र भारूड, प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी बी. एम. कांबळे, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॅा. तुकाराम मोटे, सहकार उपनिबंधक विनायक कहाळेकर, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक बी. यु. वाघमारे,  विविध विभागांचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत, खासगी व्यापारी तसेच सहकारी आदी  बँकाचे अधिकारी प्रतिनिधींची उपस्थिती होती.

जिल्ह्यातील  पीक कर्ज पुनर्गठन व नव्याने कर्ज वाटपाचा पालकमंत्री श्री. रावते यांनी सर्वंकष आढावा घेतला. आढाव्यानंतर मार्गदर्शन करताना व निर्देश देताना श्री. रावते म्हणाले की,  दुर्दैवाने यंदाही पाऊस लांबला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल आहे. मराठवाड्यात आणखी परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज आहे. पावसाकडे आशेने डोळे लावून असणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे. त्यामुळे बँकांनी पीक कर्ज पुनर्गठन आणि नव्याने पीक कर्जाच्या वाटपाबाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. त्यासाठी पुनर्गठनाची प्रक्रिया आणि नव्याने पीक कर्ज वाटप याबाबत सांगड घालण्याची गरज आहे. पात्र शेतकऱ्यांना ताबडतोब कर्ज वाटप व्हावे यासाठी, पुनगर्ठनाच्या प्रक्रिया चालू ठेवून सोबतच शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी मदत व्हावी म्हणून नवीन कर्ज वाटपासाठीही प्रयत्न व्हावेत. पात्र शेतकऱ्यांना टप्प्या–टप्प्याने काही रक्कम उपयोगी पडेल अशा पद्धतीने कर्जाच्या रुपाने वितरीत व्हावी. जेणेकरून त्यांची हंगामासाठीची गरज तातडीने पुर्ण होईल. शेतकरी बँकेत येतील, असा विचार न करता, बँकांनी दत्तक गावात आपणहून पोहचावे. अधिकाऱ्यांना पाठवावे आणि कर्ज प्रक्रिया पुर्ण करून घ्यावी.

यावेळी पालकमंत्री श्री. रावते यांनी कर्ज वाटपात कुचराई करणाऱ्या बँका, तसेच कर्ज आणि पिकविम्याबाबत मध्यस्थ आणि गैरप्रकार यांची गांभीर्याने दखल घेण्याचे निर्देशही दिले. पुनर्गठन आणि नव्याने कर्ज याबाबत आमदार तसेच बँकाचे प्रतिनिधी यांच्यासोबत आठवडाभरात बैठक घेऊन आढावा घेण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार कर्ज पुनर्गठन आणि कर्ज वाटप यांचा आढावा घेण्यात येत आहे. त्याबाबत स्वयंस्पष्ट निर्देश आहेत. त्यामुळे याबाबत  वारंवार आढावा घेऊन आणि कार्यवाही न करणाऱ्या बँकाबाबत त्यांच्या संनियंत्रण यंत्रणांना अवगत  करण्यात  येणार  असल्याचेही  श्री. रावते यांनी सांगितले. बैठकीत उपस्थित लोकप्रतिनीधींनी विविध मुद्दे उपस्थित केले. पुनर्गठन, कर्ज वाटप तसेच पिकविमा यांच्या अनुषंगाने बँकाच्या प्रतिसादाबाबत ताशेरेही ओढले. काही उपयुक्त सूचनाही त्यांना बैठकीत मांडल्या. जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्री. वाघमारे यांनी प्रास्ताविक केले तसेच जिल्ह्यातील पीक कर्ज, विमा आदींबाबत माहिती बैठकीत सादर केली. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी