अहंकार बळ आणि बुद्धीच्या विकासातील अडथळा
नांदेड(अनिल मादसवार)रामभक्त हनुमान हे बळ, बुद्धी आणि ब्रह्मचार्याबाबत आपल्या आध्यात्मिक इतिहासात प्रचलीत आहेत. अवघ्या डोंगराला उचलण्याचे सामर्थ असलेला आणि रावणासारख्या बुद्धीमान राजालाही आपल्या बुद्धीचातुर्याच्या बळावर नामोहरम करणारा हनुमान श्रीरामासमोर मात्र नतमस्तक होतो. कारण हनुमानामध्ये आपल्या बुद्धीचा आणि बळाचा कोणताही अहंकार नव्हता, अशी हनुमान महती प्रसिद्ध गायक सरदार लख्खासिंग यांनी आपल्या भजनसंध्या कार्यक्रमात व्यक्त केली.
येथील सालासर भजन मंडळाच्या वतीने मागील दहा दिवसांपासून श्रीराम चरित्र आणि भजनसंध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. हनुमान जयंतीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात रामभक्त हनुमानाची महती गाताना सरदार लख्खासिंग बोलत होते. यावेळी व्यासपीठावर रामेश्वर तिवारी, दडू पुरोहित, स. रणजिसिंह चिरागिया, रमेश मंत्री, कैलास शर्मा, गणपत पुरोहित ओम इन्नानी, विष्णु मानधने, बालाप्रसाद पारिख, डॉ. सुनिल मुंदडा, सुनिल काकानी, संतोष मानधने, नगरसेवक किशोर यादव, भगवान मानधने यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. शेवटच्या दिवशीच्या भजनसंध्यामध्ये पंजाबचे प्रसिध्द गायक स. लख्खासिंग यांच्या भजनाचे आयेाजन करण्यात आले होते.
आपल्या भजनामध्ये श्रीरामभक्त हनुमानाची महती गायली,
रघुकुलरीत सदा चली आयी
प्राण जाये पर वचन ना जाये
श्रीरामांनी आपल्या कार्याप्रति सदैव निष्ठा ठेवली होती. त्यांनी दिलेला शब्द पाळला, आपल्या आई-वडीलांनी दिलेला 14 वर्षे वनवासाचा आदेश देखील शिरसंवाद्य मानून वनवास पूर्ण केला. श्रीराम हे एक आदर्श व्यक्तीमत्त्व असून राजा कसा असावा, पुत्र कसा असावा आणि आपल्या भक्तांची काळजी घेणारा भक्तवत्सल गुरू कसा असावा, याबाबत एक आदर्श आहे. त्याचबरोबर एक आदर्श भक्त कसा असावा, याचे उदाहरण घ्यायचे असेल तर श्रीरामभक्त हनुमान हे आहे, आपल्या पित्याचे राज्य सोडून गुरू श्रीरामाची सेवा करण्याकरिता हनुमानाने हे कष्ट घेतले, ते श्रीरामचरित्रात उल्लेखनिय आहेत, असेही ते म्हणाले.
‘साज ताकद पर किसको नाज है
एक सितारा असमा का किसके पास है
मेरे बजरंगबली जैसा इस जहॉ मे कौन है’’
रामचरित्रात श्रीरामभक्त हनुमानाने अत्यंत महत्त्वाची भुमिका बजावली असून हनुमानाचे रामचरित्रातील आगमन रामचरित्राला एक वेगळी दिशा देणारे आहे. या भजनसंध्येमध्ये त्यांनी भक्ती कशी असावी, याबाबत हनुमानाचे उदाहरण दिले. आपण आपल्या दिवसाच्या 24 तासापैकी किमान 24 सेंकद तरी भगवंताचे भजन गायले पाहिजे. या भजनसंध्येला नांदेडसह ग्रामीण भागातून हजारो भाविक भक्तांनी उपस्थिती नोंदविली होती.