वै‍कल्पिक वाद निवारण केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

वैकल्पिक वाद निवारण पुढारलेल्या  समाजाचे लक्षण - न्या . सुनिल देशमुख 


नांदेड(प्रतिनिधी)वैकल्पिक वाद निवारण हे पुढारलेल्या समाजाचे लक्षण आहे. त्यामुळे नव्या इमारतीच्या सुविधेमुळे नांदेड विधी सेवा प्राधिकरण वैकल्पिक वाद निवारणाच्या कामात यापुढे आणखी आघाडी घेईल असे प्रतिपादन मुंबई उच्च  न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. सुनिल देशमुख यांनी आज येथे केले. येथील न्याय संकुलाच्या प्रांगणातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वै‍कल्पिक वाद निवारण केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन न्या. देशमुख यांच्या हस्ते झाले याप्रसंगी ते बोलत होते. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा न्या‍याधीश द. उ. मुल्लाक होते. व्यासपीठावर जिल्हा अभिवक्ता संघाचे अध्यक्ष अॅड विजयकुमार भोपी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सी. पी. नेरे उपस्थित होते. न्या्. एस. आर. पवार, न्या. मस्के, जिल्हा सरकारी वकील अॅड बालाजी शिंदे, अॅड राजकुमार शुरकांबळे आदींसह विधीज्ज्ञ, न्यायीक अधिकारी उपस्थित होते. पुढे बोलतांना न्या . देशमुख म्हणाले की, वैकल्पिक वाद निवारण पाश्चात्य देशात चांगल्या पद्धतीने रुजू लागली आहे. या वैकल्पिक वाद निवारण पद्धतीतून या पुढारलेल्या देशांच्या  संस्कृंतिचे पुढारलेपण दिसून येऊ लागले आहे. त्या देशातील समाजाला भांडण तंट्यातील वितृष्टाता, निष्फळता लक्षात आली आहे. सामाजिक प्रगल्भताही लक्षात येऊ लागली आहे. नांदेडच्या जिल्हा विधी सेवा प्राधिकरणानेही वैकल्पिक वाद निवारणात उत्कृष्ट काम केले आहे. या नव्या इमारतीमुळे विधीज्ज्ञ आणि पक्षकारांना चांगल्या सुविधा देता येतील त्यामुळे वैकल्पिक वाद निवारण प्रक्रियेत आणखी गती येईल. त्यामुळे या कामात नांदेड विधी सेवा प्राधिकरण आणखी आघाडी घेईल अशी अपेक्षा आहे. 

प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्री. मुल्ला म्हणाले की, या इमारतीत होणारे काम काही कुटुंबांना लागलेले तंटे वादाचे ग्रहण दूर करेल अशी अपेक्षा आहे. तंटे-वादाच्या या ग्रहणातून अनेक कुटुंबांची सुटका करण्यासाठी विधीज्ज्ञ मंडळीनी प्रयत्न करावेत. आपल्या पक्षकाराबरोबर संवाद साधावा. यामुळे त्यांचा न्याय प्रक्रियेवरही विश्वास दृढ होईल. विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री. नेरे प्रास्ताविकात म्हणाले की, वैकल्पिक वाद निवारण प्रक्रियेत दोन्ही बाजुच्या पक्षकारांचा तडजोडीमुळे समसमान विजय होतो. त्यामुळे विधीतज्ज्ञ व पक्षकारांनी प्रलंबीत असे खटले, प्रकरणे निकालात काढण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. यापुर्वीही नांदेड जिल्ह्याचे उत्कृष्ट काम केले आहे. हे काम आणखी चांगल्या रितीने पुढे नेण्यासाठी केंद्राची ही नवी इमारत उपयुक्त ठरेल. 

सुरुवातीला केंद्राच्या नूतन इमारतीचे नामफलकाच्या अनावरणाने व फित कापून उद्घाटन झाले. इमारतीतील संवाद, मध्यस्थ कक्ष व अनुषंगीक सोई सुविधांची मान्यवरांनी पाहणी केली. दीप प्रज्वलाने उद्घाटन सोहळ्यास प्रारंभ झाला. बांधकाम विभागाचे अभियंता गुणवंतराव भांगे यांचा न्या. देशमुख यांच्या हस्ते सत्कार झाला. अभिवक्ता संघाचे अध्य क्ष श्री. भोपी यांचे समयोचित भाषण झाले. अॅड गजानन पिंपरखेडे यांनी सूत्रसंचालन केले. मुख्य न्याय दंडाधिकारी ए. बी. भस्मे यांनी आभार मानले. कार्यक्रमास पक्षकार, नागरीक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी