भाषाविकासासाठी मराठीचे सामाजिक स्थान बळकट होणे महत्त्वाचे
मराठी भाषेचा विकास व्हायचा असेल तर तिचे समाजव्यवहारातील स्थान बळकट झाले पाहिजे. त्यामुळे एकाचवेळी स्थानिक बोली व प्रमाणबोली यांची जोपासना करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांनी केले.
मराठी भाषादिनानिमित्त स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या भाषा वाङ्मय व संस्कृती अभ्यास संकुलात आयोजित कविसंमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी कुलगुरू बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रसिध्द कवी जगदीश कदम होते तर यावेळी दै. उद्याचा मराठवाडाचे संपादक राम शेवडीकर, देविदास फुलारी, डॉ. रमेश ढगे, डॉ. केशव देशमुख यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरूवातीस आर.आर. पाटील, गोविंद पानसरे, इसाक मुजावर, रमेश राऊत यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. विनायक येवले यांच्या ‘ठसे बदललेल्या मुक्कामावरून’य कवितासंग्रहाचे व डॉ. पृथ्वीराज तौर यांनी संयोजन केलेल्या दै. उद्याचा मराठवाडाच्या ‘मराठी भाषा विशेष’पुरवणीचे प्रकाशन कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.
पुढे डॉ. विद्यासागर म्हणाले, मराठी भाषेमध्येही विज्ञानासहित सर्व शिक्षण घेता येते. तरीपण मराठीत शिक्षण घेने ही कमीपणाची भावना आपल्या मराठी मानसाच्या मनात घर करून बसली आहे. त्यामुळे इंग्रजी माध्यमातून आपल्या पाल्यास शिक्षण देऊन समाजामध्ये आपली खोटी प्रतिमा जपण्याचे काम आपल्याकडून होत आहे. मराठीत शिक्षण घेतल्यामुळेच आपली संस्कृती टिकेल व जोपासली जाईल.
आपल्या पाल्यांच्या उज्वल भविष्यासाठी मराठी भाषेतूनच शिक्षण घ्यावे, असे अवाहनही यावेळी त्यांनी केले.
मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित कविसंमेलनात देवीदास फुलारी, महेश मोरे, सुचिता खल्लाळ, मनोज बोरगांवकर, अदिनाथ इंगोले, अशोककुमार दवणे, प्रकाश मोगले, विनायक पवार, वैजनाथ अनमुलवाड, विनायक येवले, योगिनी सातारकर, शंकर राठोड, राजाराम झोडगे, अंकुशकुमार दवणे यांनी सहभाग घेतला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पी. विठ्ठल यांनी केले तर कविसंमेलनाचे सूत्रसंचालन विनायक पवार यांनी केले. प्रास्ताविक डॉ. केशव देशमुख यांनी केले तर आभार डॉ. भगवान जाधव यांनी मानले. कार्यक्रमास डॉ. वैजयंता पाटील, डॉ. शैलजा वाडीकर, अनिकेत कुलकर्णी, डॉ. राजेंद्र गोणारकर, जनसंपर्क अधिकारी अशोक कदम, झिशान अली, निना गोगटे, एन. एल. भंडारे, रमेश कदम, सरिता यन्नावार यांच्यासह मोठया संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.