शेतकरी त्रस्त

महावितरणच्या सक्तीच्या वसुलीने शेतकरी त्रस्त... आंदोलनाच्या तयारीत


हिमायतनगर(अनिल मादसवार)महावितरण कंपनीच्या अधिकारी - कर्मचार्याने मुजोरीपनाचा कळस गाठला असून, शेतकऱ्याप्रती शासनाने आपुलकीची भावना ठेवून वीज बिल वसुलीची सक्ती करून नका असे आदेशित केले आहे. मात्र हिमायतनगर तालुक्यात चक्क शासनाच्या आदेशाला न जुमानता शेती पंपाचा वीजपुरवठा बंद करण्यावर भर दिल्याने, सामान्य शेतकरी वर्ग त्रस्त झाला आहे. परिणामी शेतातील रब्बीची पिके वाळू लागली असून, तात्काळ हा प्रकार बंद करून शेतकर्यांना सुरळीत वीज पुरवठा करावा अन्यथा शेतकरी आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.

महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या आदेशानुसार वीज दरवाढ लागू झाल्यानंतर वाढीव रकमेची बिले येण्यास सुरुवात झाली. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांच्या नुकसानीमुळे आर्थिक कोंडीत सापडलेला बळीराजा पुरता खचला आहे. खरीप गेला आता, विहिरी, बोअर, नदीच्या पाण्यावर रब्बीची पिके घेवून नुकसानीतून सावरण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र त्यांच्या या प्रयत्नात आता महावितरण कंपनीच्या मुजोर अभियंत्यांनी देयके वसुलीच्या नावाखाली थेट वीज पंपाचे कनेक्शन बंद करून, शेतकर्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यामुळे अगोदर अवर्षणाने  नुकसानीत आलेला शेतकरी आता महावितरणच्या या सक्तीच्या वीज बिल वसुली मोहिमेने दुहेरी संकटात सापडले आहेत. एकीकडे शासन दुष्काळ जाहीर करून शेतकर्यांना मदत देणे व वीज बिल व कर्ज माफिबाबत सकारात्मक पावून उचलत शेतकर्यांनी धीर सोडू नये सरकार खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभे आहे, असे आवाहन करीत आहेत. परंतु महावितरणाचे काही मुजोर अधिकारी शेतकर्यांना वेठीस धरत असल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. गत तीन दिवसापासून विदर्भ मराठवाड्याच्या सीमेवरील पैनगंगा नदीकाठावरील टाकळीबंधाऱ्यासह अनेक ठिकाणच्या शेतकऱ्यांचे विद्दुत पुरवठा खंडित केला जात आहे. त्यामुळे या भागातील शेतकर्यांनी महावितरण च्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तातडीने वीज पुरवठा पूर्ववत करावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा कोठा, वारंगटाकली, धानोरा, मंगरूळ, बोरगडी, डोल्हारी, सिरपल्ली, हिमायतनगर यासह परिसरातील शेतकर्यांनी दिला आहे. 

शेतकर्यास वेठीस धरल्या जाणार्या या प्रकाराकडे विद्यमान सरकारने लक्ष देवून ओढवलेल्या संकटाला दूर करण्यासाठी प्रथम वीज व कर्ज माफी देवून, सरसकट मदत जाहीर करावी, कापूस व सोयाबीनला हमी भाव द्यावा तरच आगामी रब्बी हंगामात शेतकर्यांना दिलासा मिळून, ओढवले जाणार्या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडेल, अन्यथा शेतकर्यांना आत्महत्येशिवाय दुसर्या पर्याय नाही अश्या संतप्त भावना शेतकर्यांनी व्यक्त करीत आहेत.  

आम्ही टाकळी बंधाऱ्याच्या नियमानुसार पाटबंधारे विभागाला सुधारित पाणीपट्टी कर भरला आहे. मेहनतीने पाणी आम्ही अडविले आता मात्र महावितरणच्या कर्मचार्याने कोणतीही पूर्व सूचना न देता वीज पुरवठा खंडित केला. आम्ही वीजबिल भरण्यासाठी तयार असताना देखील महावितरण असा प्रकार करीत असल्याने आम्हाला आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. - पांडुरंग आडे, शेतकरी टाकळी  

माझ्या शेतातील विद्दुत पुरवठा खंडित झाला आहे, यासाठी संबंधित लाईनमन कर्मचार्यास संपर्क केला असता आम्ही बिल वसुलीची मोहिमेत असल्याचे सांगितल्याने आमच्या रब्बी पिकांना पाणी असून, मिळणे दुरापास्त झाले आहे. -  प्रभाकर मुधोळकर, शेतकरी हिमायतनगर  

कारखान्याच्या आश्वासनाने आम्ही शेतात उस लागवड केली आहे, तसेच जनावरांचा चार्यासाठी ज्वारी टाकली, आणि रब्बीची पिके घेतली. मात्र महावितरण कंपनीचे अधिकारी -कर्मचारी सक्ती करीत असल्याने मोठे संकट उभे आहे. तातडीने वीज पुरवठा सुरु नाही झाल्यास आमची पिके वाळून जातील व चार्याचा गम्बीर प्रश्न उद्भवेल. - आबाराव पाटील, वारंगटाकळी   

वरिष्ठांचे आदेशाने आमचे कर्मचारी काम करत आहेत. वसुली थकविनार्यांचा विद्दुत पुरवठा खंडित करत आहोत. यासंबंधी वरिष्ठांनी आदेश दिल्यास आम्ही पूर्ववत वीजपुरवठा सुरळीत करू. - पी.जी. राठोड, सहाय्यक अभियंता हिमायतनगर 

आम्हाला ०१ एप्रिल ते ३०सप्टेंबर पर्यंत वीज वसुलीचे आदेश वरिष्ठांकडून देण्यात आले आहेत. वसुलीत हलगर्जीपणा करणार्यांवर निलंबनाची कार्यवाही केली जात आहे. त्यामुळे आम्ही आमचे कर्तव्य बजावत आहोत. या बाबत जोपर्यंत वरिष्ठ निर्णय देत नाही तोपर्यंत आमची मोहीम सुरु राहील. - एम.एम.गोपूलवाड, कार्यकारी अभियंता भोकर 

हेड ऑफिस वरून शेतकऱ्यांच्या वीज पुरवठ्या संबंधी आम्हाला कोणतेही आदेश आलेले नाहीत. केवळ वसुली पारदर्शक्तेने अन्यथा वीज पुरवठा खंडित करा अश्या सुचना असल्याने, त्यानुसार आमचे कर्मचारी काम करीत आहेत. - डी.डी.हमंद कार्यकारी अभियंता, नांदेड. 

मराठवाड्यातील शेतकरी अडचणीत आला आहे, त्यांना अश्या वेळी धीर देण्याचा सोडून महावितरण कंपनी सक्तीने वसुली करते हि खेदाची बाब असून, आज रोजी मंत्रालयातील सचिवांना पत्र देवून मराठवाड्यातील  वीज पुरवठा खंडित करू अशी मागणी करीत आहे. आ.नागेश पाटील आष्टीकर, हदगाव - हिमायतनगर      

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी