दुधड -वाळकेवाडी आज आणि उद्या



तेलंगाना - मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या जंगलाच्या पायथ्याशी दुधड -वाळकेवाडी हे गाव वसलेले आहे. हे गाव हिमायतनगर शहरापासून १९ कि.मी.अंतरावर आहे. हा भाग आदिवासी बहुल भागात येणारा असून, जास्त प्रमाणात आदिवासी बांधवांची संख्या आहे. आदिवासी भागात येणाऱ्या या गावात वीज, पाणी, आरोग्य यासह मुलभुत सुविधांचा अभाव आहे. जवळपास ५० टक्के गावाचे जंगलात विलीनीकरण करण्यात आले आहे. अंतर्गत गावात सांडपाणी समस्या कायम असून, नाली बांधकाम होणे गरजेचे आहे. तसेच छोट्या गावात जाण्यासाठी साधा पक्का रस्ता नाही. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक पशुवैद्यकीय केंद्र, स्मशानभूमी, सरकारी तथा निमसरकारी बैंक यासह शैक्षणिक, सामाजिक, आरोग्याचा अनेक समस्या कायम आहेत.

दुधड गावाच्या गटग्रामपंचायतीत दुधड आबादी, वाळकेवाडी, उखळवाडी, रामनगर, वडाचीवाडी, बुरकुलवाडी, धनवेवाडी अशी छोटी छोटी गावे येतात. यापैकी दत्तक घेतलेल्या वाळकेवाडी या गावाची लोकसंख्या सन २०११ च्या जनगणनेनुसार ३३८६ असून, १६५८ महिला, १७२८ पुरुष असून, येथे एकूण ६३४ कुटुंब वास्तव्य करतात. यापैकी २२० कुटुंब दारिद्र्य रेषेखालील असून, त्यांना शासनाच्या माध्यमातून सर्वाना घरकुलाचा लाभ मिळाला आहे. अशी माहिती विद्यमान सरपंच दिलीप दिगंबरराव धुमाळे यांनी दिली. सध्या गावातील कामे उपसरपंच अवधूत वाळके, पोलिस पाटील पंजाबराव सूर्यवंशी, ग्रामसेवक शैलेंद्र वडजकर, हे गावचे मुख्य कारभारी असले तरी शिवसेना, भाजपाचे कार्यकर्ते मिळून -मिसळून कामे करून आदर्श गाव बनविण्यासाठी धडपड करीत आहेत.

वाळकेवाडी गावात पहिली ते पाचवी पर्यंत जी.प.शाळा असून, मुख्याध्यापक व ४ शिक्षक असे एकूण ५ कर्मचारी कार्यरत असून, २ शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. शाळेत १२२ मुली, १३८ मुले अशी एकूण २६० विद्यार्थी संख्या आहे. भविष्यात या शाळेत इयत्ता सहावी ते सातवी वर्ग चालू करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. शाळेत विद्यार्थ्यांची वार्षिक आरोग्य तपासणी, संगणकाचे ज्ञान पालक वर्गांच्या सहकार्याने दिले जाते आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना तसेच आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या सोयीसाठी शासकीय पोस्ट बेसिक आश्रम शाळा आहे. येथे इयत्ता ५ वि ते १० वि पर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेत असून, २२ अधिकारी - कर्मचारी कार्यरत असून, ७ जागा रिक्त असून, आदिवासी विकास प्रकल्प किनवट अंतर्गत येथील विद्यार्थ्यांना सर्व सोई - सुविधा दिल्या जातात अशी माहिती मुख्याध्यापक श्री नरवाडे यांनी दिली.

गावात तीन अंगणवाड्या कार्यरत असून, यातून बालकांना व गरोदर मातांना पोषण आहार वितरीत केला जात आहे. तसेच गरजेनुसार अंगणवाडी इमारतीचे काम करण्यात आले असून, लवकरच अंगणवाड्यांना आय एस.ओ.चा दर्जा दिला जाणार आहे. त्या संबंधाने गावकरी, नागरिक व विद्यमान पदाधिकारी प्रयत्न करीत असून, मागील महिन्यात संपन्न झालेल्या ग्रामसभेत गावाच्या विकासात लोक सहभागाची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. खा.राजीव सातव यांनी दिलेल्या भेटीत गावकर्यांनी एकजुटीने गावाला आदर्श गाव बनवीत चेहरा - मोहर बदलावा यासाठी लोकसहभाग नोंदविण्याचा संकल्प केला आहे.

या गावाला विकासाची नवी दिशा देण्यासाठी जी.प.मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यु काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता अभियानातून शौच्चालय बांधकाम सुरु आहे. पूर्ववत १२३ खाजगी शौच्चालय असून, ६२७ शौच्चालय काम दीड महिन्यात पूर्ण करण्याचे ध्येय आहे. सध्या परिस्थितीत १५० शौच्चालयाचे काम सुरु असून, गावातील सांडपाण्यासाठी भूमिगत गटारे तथा ६०० शोषखड्डे बांधण्याचे काम सुरु आहेत. गावात कृषी विभागाच्या माध्यमातून पाणलोट विकास कार्यक्रम व त्याअंतर्गत रस्त्याची कामे होणार आहेत.

दुधड - वाळकेवाडी गावातील नागरिकांच्या सोयीसाठी १९८३ साली बांधण्यात आलेली पाण्याची चिरेबंदी टाकी असून, आजघडीला यातून पाणी पुरवठा अपुरा पडतो आहे. येथील पाणी समस्या कामस्वरूपी सोडण्यासाठी नव्याने जी.प.पाणी पुरवठा विभागाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. येथील आराध्य दैवत रामबापू महाराज व संत तुकाराम महाराजांचे पुरातन मंदिर आहे. या ठिकाणी दरवर्षी आठवडाभर उत्सव साजरा केला जातो.

या गावातील प्रमुख समस्या हि पाणी टंचाईची आहे. तालुक्यातील सर्वच गावाप्रमाणे या गावातही भीषण पाणी टंचाई आहे. गावाच्या लगत तलाव असून, यातून मिळणारे पाणी केवळ दुधड गावापुरते मिळते. तर या तलावात मच्छिमार संस्थेच्या वतीने माशांचे उत्पादन घेतले जाते. मात्र यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे तलावातील पाणी साठा मृतावस्थेत आहे. या भागातील सिंचनासाठी उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभागाने कैनोल निर्मित्ती केली नसल्याने शेती कोरडवाहू पद्धतीने केली जाते. बहुतांश शेतकरी कापूस, सोयाबीन, ज्वारी, तूर, चना आदी पिके घेतात. गावात व काही शेतकऱ्यांच्या शेतात असलेल्या विहिरी बोअर ने तळ गाठला असून, परिणामी रब्बी पिकांची अशा मावळली आहे.

या गावात महिला बचत गटांची संख्या भरपूर आहे, त्यांना रोजगार मिळावा व शौच्चालय बांधकाम करणार्यांना तालुका स्थरावरील रास्त भावात साहित्य मिळावे यासाठी याच ठिकाणी दुकान लावण्यात आल्याने बचतगट अधिक सक्षम होत असल्याचे चित्र गावात दिसत आहे.

जिल्हाधिकारी धीरजकुमार, नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे, खा.राजीव सातव यांच्या मार्गदर्शनाखाली या गावाला आदर्श गाव बनविण्याचा आराखडा तयार करण्यात येत आहे. या ग्रामसभेत गावाच्या विकासात लोकसहभागाची भर पडल्याने वाळकेवाडी गाव आदर्श गावाच्या वाटेवर असल्याचे ग्रामसेवक शैलेंद्र वडजकर यांनी प्रस्तुत प्रतिनिधीस बोलताना सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीच्या लाल किल्यावरून जाहीर केलेल्या, खासदार आदर्श गाव योजनेचा शुभारंभ जय प्रकाश नारायण यांच्या जन्मदिनानिमित्त केल्यानंतर हिंगोलीचे खासदार व राहुल गांधी यांचे निकटवर्तीय राजीव सातव कोणते गाव दत्तक घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. सदर योजनेअंतर्गत प्रत्येक खासदाराने गाव दत्तक घेऊन विकसनशील कामे, संस्थात्मक संसाधनांची आणि त्याच्या विकासाची जबाबदारी घेवून अडगळीला पडलेल्या गावाचे आदर्श गावात रुपांतर करावे अशी अपेक्षा आहे.

याबाबत खा.राजीव सातव यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असत संपर्क होऊ शकला नाही.
..... अनिल मादसवार, हिमायतनगर -९७६७१२१२१७, ९७६४०१०१०७

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी