जंगलात घरजावयाचे आढळले प्रेत

दस्तगीरवाडी जंगलात घरजावयाचे आढळले प्रेत.. हत्या कि आत्महत्या..?

हिमायतनगर(वार्ताहर)तालुक्यातील दस्तगीरवाडी जंगलात याच गावातील घरजावई असलेल्या एका २२ वर्षीय युवकाचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. सदर प्रेत हे गत १५ दिवसापासूनचे असावे असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. हि मृत्यूची घटना आकस्मिक कि जाणीवपूर्वक घडवलेली याबाबत उलट - सुलट चर्चेला उधान आले आहे.

या बाबत सविस्तर वृत्त असे कि, विदर्भातील गाव असलेला केशव नारायण मुरमुरे वय २२ वर्ष याचे  हिमायतनगर तालुक्यातील दस्तगीरवाडी येथील मुलीशी गत दोन वर्षापूर्वी लग्न आहे. एकटी मुलगी असल्याने याच ठिकाणी घरजावई मयत केशव शेतात काम करून पोट भरत होता. संसार चांगला सुरळीत चालू असताना, मागील महिन्यातील दि.१४ रोजी जंगलातून जळतनासाठी लाकडे तोडून आणतो म्हणून सकाळी १० वाजता घरच्यांना सांगून गेला होता. त्यानंतर जावई घरी परत आला नाही, म्हणून शोधाशोध केली, काहीच माहिती मिळत नसल्याने कचरु दशरथ वानोळे यांनी दुपारी २ वाजता केशव हरवल्याची फिर्याद हिमायतनगर पोलिस स्थानकात दिली होती. तेंव्हापासून पोलिस सदर युवकाच्या शोधात होते, परंतु कुठेही काहीच ठाव - ठिकाण लागला नाही. अचानक काल दि.०१ डिसेंबर रोजी याच गावाशेजारील जंगल परिसरात त्याचा मृतदेह आढळून आला. याची माहिती मिळताच तातडीने पोलिस पथक घटनास्थळी रवाना झाले. घनदाट झाडा - झुडपातून मार्ग काढीत गेल्यानंतर छिन्न - विच्छिन्न अवस्थेत मृतदेह दिसला. आजच्या स्थितीत मयताचा चेहरा ओळखणे अवघड होते, तर संपूर्ण शरीर काळे - कुट्ट व दुर्गंधीयुक्त झाले होते. अश्याच परिस्थितीत नाकाला सुगंधी द्रव्याचा रुमाल बांधून पोलिसांनी पंचनामा केला. रात्री ९ वाजता युवकाचा मृतदेह सरसम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आला. परंतु त्याचे नातेवाईक येथे पोंचू शकले नसल्याने दि.०२ रोजी प्रेताचे शव विच्छेदन करण्यात आले. या बाबत सासर्याने दिलेल्या फिर्यादीवरून सध्या तरी युवकाच्या मृत्यू बाबत कलम १७४ सी.आर.पी.सी.अनुसार आकस्मिक नोंद  करण्यात आली आहे. मात्र युवकाच्या मृत्यूचे नेमके कारण समजले नसल्याने परिसरात उलट - सुलट चर्चेला उधान आले आहे. सदर घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक अनिलसिंह गौतम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुशील चव्हाण व त्यांचे सहकारी करीत आहेत.

मागील अनेक वर्षापासून पवना परिसरातील जंगलात प्रती वर्षाने एका तरी युवकाची अथवा इसमाचा मृत देह सापडण्याची घटना घडते, हे पोलिस दप्तराच्या नोंदीवरून दिसून येते. मात्र अद्याप याचे नेमके कारण काय..? याचा शोध मात्र कधीच घेत्याल्या गेला नाही. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी