बडे दलाल मोकाट

हिमायतनगर(अनिल मादसवार)तालुक्यातील स्वस्त धान्याचा २०० कुंटल गहू काळ्या बाजारात जाता असताना भोकर पोलिसांनी पाळज शिवारात सापळा रचून पकडला. या घटनेत चालक व एका मुनिमावर आणि अन्य एकावर कार्यवाही करण्यात आली असली तरी यातील बडे दलाल मात्र मोकाटच आहेत. पोलिसांच्या या कार्यवाहिने साशंकता निर्माण झाली असून, चोर सोडून संन्याश्याला फाशी देण्याचा हा प्रकार असल्याचे धान्यापासून वंचित असलेल्या लाभार्थ्यामधून बोलले जात आहे. 

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, हिमायतनगर शहरात स्वस्त धान्याच्या काळ्याबाजाराचे केंद्र बनले हिमायतनगर, भ्रष्ट राशन दुकानदारांना पुरवठा विभागाचे अभय ... या मथळ्याखाली दि.२० नोव्हेंबर रोजी नांदेड न्युज लाइव्हने वृत्त प्रकाशित करून, जिल्हा प्रशासनाला जागृत करण्याचा प्रयत्न केला होता. याच वृत्ताने धास्तावलेल्या व्यापार्यांनी काही दिवस हा प्रकार बंद करून पुन्हा सुरु केला. तेलंगाना - मराठवाड्याच्या सीमा रेषेवर असलेल्या हिमायतनगर येथे स्वस्त धान्याच्या काळ्या बाजाराचे केंद्र असून, अनेक तालुक्यातील दिवसात धान्याचा माल काही दलाल खरेदी करून गावाबाहेर असलेल्या एका गोडावून मध्ये साठवत असतात. याची खातरजमा अनेकदा पत्रकारांनी करून हा प्रकार उघडकीस आणण्याचा प्रयत्न केला होता. अन्न सुरक्षा योजनेत अनेक सधन कुटुंब दाखवून लाभधारकांची संख्या वाढविण्याचा चमत्कार शहरातील अनेक दुकानदारांनी केल्याचे निदर्शनात आणून देण्याचा प्रयत्न केला होता. परंतु पुरवठा विभागाच्या अधिकारी व अव्वल कारकून यानी दुकानदारांच्या कर्मावर पांघरून घालण्याचा प्रयत्न केल्यानेच दुकानदारांसह दलालांचे फावते आहे. परिणामी अन्न सुरक्षा योजनेतील शिल्लक माल दलालांच्या घश्यात घालण्याचे महापाप करून हेच दुकानदार आपले उखळ पांढरे करून घेत आहेत. 

नुकतेच हिमायतनगर येथून तेलंगणात जादा दराने विक्री करण्याच्या उद्देशाने पाळज शिवारातून २०० कुंटल गहू घेवून जाणारा ट्रक भोकर पोलिसांनी ताब्यात घेतला. हा माल हिमायतनगर शहरातील तीन बड्या स्वस्त धान्य दुकानदारांचा असल्याची माहिती पुढे येवू लागली आहे. आमचा कारभार अगदी धुतल्या तांदळासारखा पारदर्शी आहे, आम्ही उर्वरित माल प्रशासनाला परत करतो. असे तोर्याने सांगणार्या स्वस्त धान्य दुकानदारांच्या कारभारावर मात्र भोकर पोलिसांच्या कार्यवाहिने मुस्कटात मारली आहे. या प्रकरणी भोकर पोलिसांनी हिमायतनगर येथील एका भुसार दुकानदाराच्या मुनिमावर कार्यवाही केली असून, सदरील मुनिमास ताब्यात घेवून पोलिसी खाक्या दाखविल्यास यातील बडे मासे गळाला लागण्याची शक्यता सामान्य नागरीकातून वर्तविली जात आहे. हिमायतनगर तालुक्यातून काळ्या बाजारात पाठविल्या जाणार्या घटनेचा सखोल तपास करून बड्या दलालांच्या मुसक्या आवळणार कि..? थातूर माथुर कार्यवाही करून केवळ चौकशीचा फार्स पूर्ण करणार हे भोकर पोलिसांच्या पुढील कार्यवाहीवरून दिसून येणार आहे. 

दलालांच्या मुसक्या आवळणार - आरदवाड 
---------------------------------- 
या प्रकरणी भोकर पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक व तपास अधिकारी यांच्याशी भ्रमण ध्वनिवरून संपर्क साधला असता ते म्हणाले कि, सदरील माल हा राम - रहिम ट्रेडिंग कंपनी या नावाने नोंदणीकृत असलेल्या दुकानाच्या नावे येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये सदरील मालाची नोंद असल्याचे सांगितले. यातील आरोपी ट्रकचालक फारुख पठाण हा पोलिसांच्या ताब्यात असून, त्याच्या सांगण्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उर्वरित आरोपी दिगंबर देवराव पाटील व प्रभू कल्याणकर हे अद्याप फरार आहेत. आम्ही त्यांचा शोध घेत तपास करण्यावरच असून, लवकरच त्यांना ताब्यात घेवून कसून चौकशी केली जाईल. यातील प्रमुख सुत्रदार कोण ते लवकरच उघड करू असे आश्वासन त्यांनी प्रस्तुत प्रतिनिधीस बोलताना दिले. 

अवैद्य धंद्यासाठीच राम - रहिम ट्रेडिंग कंपनी..? 
------------------------------------ 
वास्तवात राम - रहिम ट्रेडिंग कंपनी हे दुकान हिमायतनगर शहरात अस्तित्वातच नसून, केवळ नोंदणी करून रेशनसह अन्य प्रकारचे अवैद्य धंद्यांना अधिकृत दाखविण्यासाठी राम - रहिम ट्रेडिंग कंपनीची नोंदणी करण्यात आली काय..? असा सवाल सामान्य जनता विचारीत आहे. कारण याच कंपनीचा व अन्य एका ट्रेडिंग कंपनीच्या नावाने आंध्रप्रदेशात विक्रीसाठी जाणारा गव्हाचा ट्रक एका पाठोपाठ दोन वेळा मागील वर्षी सुद्धा भोकर पोलिसांनी ताब्यात घेवून गुन्हा दाखल केला होता. ती चौकशी सुरु करून काही दिवसानंतर गुलदस्त्यात ठेवण्यात आल्याने सध्याच्या घटनेत काय..? कार्यवाही केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये अश्या अनेक ट्रेडिंग कंपन्यांची नोंदणी आहे, ज्या नावाची दुकानेच अस्तित्वात नाहीत, मग यांची नोंदणी कोणत्या आधारावर केली जात असा प्रश्न पुढे येऊ लागला आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी