शेतकर्याची आत्महत्या

खरीप पेरणीच्या तोंडावर अल्पभूधारक शेतकर्याची आत्महत्या


हिमायतनगर(अनिल मादसवार)ऐन खरीप हंगामाच्या पेरणीच्या तोंडावर मौजे सिरंजणी येथील परमेश्वर पिराजी सिल्लेवाड या ४० वर्षीय अल्पभूधारक शेतकर्याने नापिकी व कर्जबाजारीला कंटाळून विषारी औषध प्राषण करून आत्महत्या केली. सदर घटना दि.१८ रोजी सकाळी ६ वाजता सिरंजणी शिवारातील शेतातील आखाड्यावर उघडकीस आली असून, या घटनेमुळे तालुका सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, गत वर्षीच्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीने सबंध तालुक्यावर ओल्या दुष्काळाचे सावट निर्माण झाले होते. याचाच फटका हिमायतनगर तालुक्यातील मौजे सिरंजणी येथील मयत शेतकरी परमेश्वर पिराजी सिल्लेवाड वय ४० वर्ष यांनाही बसला होता. नाल्याच्या काठावर असलेल्या शेतीत पाणी जाऊन शेतातील कापूस, सोयाबीन, मुग, उडीद, तूर हि पिके हाताची गेली. उर्वरित पिकांना जागविण्याचा प्रयत्न केला, मात्र अधून मधून होत असलेला पाऊस वातावरणातील दमटपणा त्यामुळे पेरणीसाठी लावलेला खर्चही निघाला नाही. शासनाने मदतीचा हाथभार लावला मात्र तो पेरणीपूर्व मशागतीला सुद्धा कमी पडला. कशी बशी पेरणीची तयारी केली मात्र मृग नक्षत्र लागून दहा दिवस लोटले तरी म्हणावा तसा पाऊस पडला नाही. पाऊस बेपत्ता झाल्याने पेरणीची चिंता सतावत होती. यावर्षी सुद्धा तशीच परिस्थिती उद्भवल्यास कर्ज फिटेल कि नाही..? या चिंतेत तो होता.

त्यामुळे सदर शेतकऱ्याच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा कमी होण्याऐवजी वाढतच गेला आहे. गत वर्षी बैन्केकडून घेतलेले कर्ज व सहुकारी कर्ज वेळेत फेडू शकले नाही. आता २०१४ च्या पेरणीसाठी लागणारे बी - बियाणे कुठून आणणार या विवंचनेत मागील आठ दिवसपासून होता. याच विवंचनेतून परमेश्वर पिराजी सिल्लेवाड वय ४० वर्ष याने मंगळवारी रात्रीला शेतातील आखाड्यावर विषारी औषध प्राषण करून जीवनयात्रा संपविली. ऐन खरिपाच्या तोंडावर त्याच्या या अकाली मृत्यूमुळे कुटुंबीयांवर दुखा:चा डोंगर कोसळला असून, त्यांच्या मृत्यू पश्चात आई , वडील, पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा मोठा परिवार आहे. ऐन खरिपाच्या तोंडावर आत्महत्या झालेल्या शेत्कायाच्या कुटुंबियांना प्रशासनाने तातडीची मदत मिळून द्यावी अशी मागणी शेतकरी, नागरिक व नातेवाइकामधून केली जात आहे.

याबाबत नांदेड न्युज लाईव्हच्या वार्ताहराने मयत शेतकऱ्याच्या घरच्यांची भेट घेऊन विचारपूस  केली असता मयताची पत्नी अंजनाबाई म्हणाल्या कि, माझ्या पतीच्या नावावर गट क्रमांक २६७ मध्ये दोन एकर शेती आहे, मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीच्या पावसाने सर्व काही हिरावून नेले. त्यावेळी हिमायतनगर येथील भारतीय स्टेट बैन्केकडून घेतलेले कर्ज व साहुकारचे देणे ०१ लाखावर गेले आहे. याची परत फेड कशी करावी तसेच मुलीच्या लग्नाची चिंता व मुलांचे शिक्षण या द्विधा मनस्थितीत ते होते. याच विवंचनेत ते आम्हाला पोरके करून गेल्याचं सांगून आता मुलांची जबाबदारी मी कशी पेलू असून म्हणत अश्रुंना वाट मोकळी करून दिली.     

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी